मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ५६

उपासना खंड - अध्याय ५६

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(पृथ्वी)

गणेशव्रत हें असे बहु प्रभाव ये प्रत्यया ।

कु-बुद्धि सरली असें म्हणुन सोडिती राजया ।

भुजंगतनया तया विनत आदरें प्रार्थुनी ।

दुकूल-वसनें तशीं बहुत भूषणें अर्पुनी ॥१॥

अणीक दिधला यथा गमन जो करी वारु तो ।

निरोप दिधला करीं फिरुन भूपती येत तो ।

पुराजवळ जो असे जलसमूह तो सुंदर ।

उदीत मधुनी तयाजवळ वृक्षही सुंदर ॥२॥

तयास हय बांधिला त्वरित नित्य-कर्में करी ।

तिथें जनहि पातले वळखिलें नृपा सत्वरीं ।

मुदीत मग जाहले नृपवरास आलिंगिलें ।

नृपास सतिचें तिहीं सकल वृत्त सांगीतलें ॥३॥

पुरांत जन येति ते कथित वृत्त ये भूपती ।

पती परत येति ते कुशल ऐकिते ती सती ।

मुदीत बहु होतसे कळत गूढ जें योगियां ।

तसा तिजसि होतसे बहुत मोद ऐकूनियां ॥४॥

(गीति)

स्वागत करण्यासाठीं, आज्ञा केली अमात्य सेनेसीं ।

सत्वर पुरास शोभित, करिते झाले समस्त पुरवासी ॥५॥

इंदुमतीही घेउनि, पंचारति ती पतीस आणाया ।

निघती झाली सत्वर, सेनेसह पातली तया ठायां ॥६॥

देवालयांत गेली, चंद्रांगद ते सहीत लोकांस ।

पाठवणी मग झाली, शिबिका आली समोर भूपास ॥७॥

शिबिकेमाजी बैसुनि, राजा देवालयांत तो गेला ।

द्वादश वर्षें झालीं, यास्तव सारी यथाविधी विधिला ॥८॥

गणेशपूजन केलें, शिव पूजी मग तसेंच विप्रांस ।

श्रीफल फोडुन मग तो, पाहे सतिच्या क्षणेक वदनास ॥९॥

पतिला सुवासिनींसह, ओवाळी आरती सती राणी ।

नंतर पतीस भेटे, चंद्राला रोहिणी जशी रमणी ॥१०॥

दंपत्यावरि लाह्या, पुष्पेंही उधळतांच नरनारी ।

नगरीं प्रवेश केला, बसुनी उभयें सुवर्णअंबारीं ॥११॥

(शार्दूलविक्रीडित)

दंपत्यें रजनीस येति शयना आलिंगिती प्रीतिनें ।

झालें वृत्त तदा कथीत उभयें एकाग्र तींहि मनें ।

झालीं तल्लिन तीं गणेशयजना वर्णून सांगे सती ।

भक्तीनें करि हें गणेशव्रत ती ऐके मुली पार्वती ॥१२॥

(वसंततिलका)

एणेंपरी परिसुनी करि भाव पूर्ण ।

नेमें करी व्रत तदा गिरिजाहि तूर्ण ॥

प्राशीतसे पय करीत गणेशसेवा ।

केली समाप्त विधियुक्त सशास्त्र सेवा ॥१३॥

झाले सदाशिवहि चंचल फार मोहें ।

नंदीवरी बसुन जात सवेग पाहे ॥

कांता करी व्रत जिथें सदनास आले ।

पाहे पतीस मन हर्षित फार झालें ॥१४॥

 

(गीति)

गिरिजा गिरीश गिरिवरी, भेटी झाली समस्त सुरगण हे ।

पाहति निराळ-गमनी, उभयांवरि करिति पुष्पवृष्टी हें ॥१५॥

दुदुंभि वाजति नाना, करिती स्तवना गजानना नामीं ।

सुरवर सदाशिवासह, उत्साहें करिति घोषणा नामी ॥१६॥

शंकर भवानिसह ते, नंदीवर बसुन जात कैलासीं ।

मंदिरप्रवेश करिती, जयजयकारें करुन गिरि-वासीं ॥१७॥

मंदार-पर्वतावरि, त्रिपुरभयानें वियोग जो होत ।

तेव्हांपासुन हिमवति, राहे सदनीं हिमाद्रि जो तात ॥१८॥

गिरिवर मुलीस सांगे, गणपति-पूजन करीं प्रकार असे ।

तैसेंच पूजनाचे, प्रकार सांगे बहूत नेम असे ॥१९॥

आणिक नभ मासांतिल, व्रत सांगे तो गणेश चौथीचें ।

एतद्विषयीं सांगे, कर्दम नळ वृत्त हें सुधा साचें ॥२०॥

आणखि चंद्रांगदही इंदुमतीची कथा तिला सांगे ।

करवी व्रतास तेव्हां, गणपतिसेवेस ती सदा लागे ॥२१॥

हिमनग हिमवति यांचा, झाला संवाद भेटही झाली ।

विधिनें व्यासां कथिली, ती भृगुंनीं सोमकांत या कथिली ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP