(गीति)
गिरिजेसहीत गिरिवरि, क्रीडेमध्यें निमग्न ते गिरिश ।
गेलीं सहस्त्र वरुषें, पुत्र नसे त्यां म्हणून सुर-ईश ॥१॥
चिंतेंत मग्न झाले, प्रार्थिते ते अग्निलागीं प्रेमानें ।
मदनें मोहित केलें, केलें हें कार्यही स्वयें त्यानें ॥२॥
(भुजंगप्रयात्)
तसें तूंहि मित्रा करीं कार्य आतां ।
करी शंकरा सूचना तूंच आतां ।
करीं गोष्ट ही पूर्ण जाणून साची ।
अम्हां भीति ही वाटते पूर्ण त्यांची ॥३॥
सुरांची विनंती करी मान्य वन्ही ।
नटे वीतरागी फिरे त्याच चिन्हीं ।
पुकारी शिवाच्या गृहीं माइं भिक्षा ।
ध्वनी ऐकुनी ऊठली शीवदाक्षा ॥४॥
शिवाचें घरी अंजुलीं वीर गौरी ।
त्वरेनें दिलें याचका भीक्ष-ओरीं ।
त्यजी भूवरी दग्ध होईल भू ती ।
म्हणूनी स्वयें ऊदरीं वस्तु घे ती ॥५॥
पुढें राहिला अग्नि गर्भार देखा ।
जनां दाखवायास लज्जीत मूखां ।
लपूनी बसे गुप्तशा ठायिं ऐसा ।
पुढें जाहलें काय तें ऐक व्यासा ॥६॥
(इंद्रवज्रा)
कार्तीकमासीं नदीच्या तिरासी ।
नारी सहा अग्नि बघे तयांसी ।
येती तिथें स्नान करावयासी ।
अग्नी निघे वेळ बघून ऐसी ॥७॥
गंगेंत टाकी शीववीर्य तूर्ण ।
होईल तेथें बहु शांत पूर्ण ।
गंगा असे शंकरपत्नि साची ।
वीर्यास धारण करी बळेंची ॥८॥
(गीति)
ऐसे मनांत आणुन, अग्नीनें सोडिलें जळीं वीर्य ।
झाले भाग सहा ते, मुरलें साहीजणींत शिववीर्य ॥९॥
पाहति पती तयांना, अंतरदृष्टी करुन गर्भवती ।
तुम्हीं गर्भ त्यजावा, नंतर यावें गृहास ते म्हणती ॥१०॥
ऐकुन भाषण त्यांचें, ललना गेल्या नदीतिरीं साही ।
त्यजिलें वीर्य तयांनीं, गंगा जन्मे सुपुत्र-मुख पाही ॥११॥
बालक षण्मुख झाला, पाहत नारद तिरास गंगेच्या ।
गेले कैलासीं ते, म्हणती शंभू बघा सुता तुमच्या ॥१२॥
नारद-मुख-वार्ता ही, ऐकुन तोषित समस्त सुर मुनि ते ।
ऐके कथा अशी हे, व्यासां विपिनीं नृपास भृगु कथिते ॥१३॥
(दिंडी)
ऐक व्यासा हें कथन कार्तिकेय ।
शीवगौरी पातली सवत-माय ।
गृहीं जन्मे सूत तया घेती ।
परत कैलासीं उभय तिथें येती ॥१४॥
कडे घेई पार्वती तया सूता ।
फुटे पान्हा ती पाजितसे माता ।
तया वेलीं ती पातली तिथें गंगा ।
मदिय सूतासी देइ उमारंगा ॥१५॥
अणिक येती त्या कृत्तिका सहा नारी ।
अग्नि बोले कीं मदिय सूत गौरी ।
कलह ऐकुन ते पार्वतीस कोड ।
बघुन वाटे तें चित्तिं तिच्या कोड ॥१६॥
स्वयें शंकर तो बालकास अंकीं ।
बहुत प्रेमानें घेति हें विलोकीं ।
वन्हि गंगाही कृत्तिका परत गेली ।
अशा त्यांची अफल अशी झाली ॥१७॥
नामकरणासी आणिले ब्रह्मदेव ।
तसे गुरुही आणिती सदाशीव ।
तिथें सर्वांनीं बालकास नांवें ।
दिलीं ऐकावीं शुद्ध मनोभावें ॥१८॥
(गीति)
कार्तिकमासीं जन्में, यास्तव त्या ’कार्तिकेय’ हें नांव ।
’पार्वति-नंदन’ म्हणुनी, ’पार्वतिनंदन’ द्वितीय तें नांव ॥१९॥
गंगानदींत टाकी, शरतृण होतें तयांत तो प्रसवे ।
यास्तव सूता तिसरें, ’शरजन्मा’ नाम हें असे पावे ॥२०॥
माता सहा म्हणूनी, ’षण्मातुर’ हें चतुर्थ अख्यात ।
तारक वधील सुत तो, नामें होईल तारका-जीत ॥२१॥
सेनापति देवांचा, होईल नामें प्रसिद्ध सेनानी ।
असती सहा मुखें त्या, वदती ’षण्मुख’ अशाहि नांवांनीं ॥२२॥
रेत त्रिवार गळलें, यास्तव त्या नाम देति हें ’स्कंद’ ।
ऐसा विधी तिथें कीं, चालत असतां सुरांस तो मोद ॥२३॥
इंद्रादि देव आले, स्तविलें त्यांना बहूत भक्तीनें ।
सेनापत्य तयाला, दिधलें सत्वर तयास बहुमानें ॥२४॥
षण्मुख लहान असतां, चंद्रा धरिलें करुन उड्डाण ।
होता पराक्रमी बहु, मूर्ति लघु कीर्तिवंतही सुगुण ॥२५॥
विधिनें शशीस मुक्तचि, केलें तेव्हां शिवासुता करिंच ।
मतिनें बृहस्पतीला, स्वबलें इंद्रा अजिंक्य हा साच ॥२६॥