(गीति)
स्कंद प्रचंड जोडी, दुसरी नंदी बरोबरी चंड ।
शिववीर पुष्पदंता, यासी तो भीमकाय ही जोड ॥१॥
भृंगी बरोबरी भट, त्रिपुराचा कालकूट नेमियला ।
तैसाच वीरभद्रा, यासी तो वज्रदंष्ट्र योजियला ॥२॥
इंद्रासि युद्ध करि कीं, त्रिपुराचा मुखमंत्रि बहु शूर ।
जोडी जयंत यासी, त्रिपुराचा पुत्र योजिला वीर ॥३॥
गुरु शुक्र जोड युद्धा, साठीं ती नेमिली असे खाशी ।
ऐसे अनेक योद्धे, लढती त्या वर्णुं मी किती राशी ॥४॥
(उपजाति)
प्रचंड सोडी नव सायकांस । मध्येंच तोडी शिवसूत त्यांस ।
पुढेंच सोडी शिवसूत पांच । प्रचंड मूर्च्छीत पडे तसाच ॥५॥
तसेच नंदी शर पांच सोडी । चंडास केलें हतवीर्य कोडीं ।
त्यजीत तेव्हां दशबाण काया । निचेष्ट केली शिवदंत काया ॥६॥
पुढेंच दंतें शरिं तीन काया । घायाळ केली अवनीस काया ।
पराभवीलें त्रिपुरास शैवें । पाहे असें हें मग तो स्वभावें ॥७॥
शंभू गणांनीं त्रिपुरासुराचा । युद्धांत पळवी दळभार साचा ।
करीत योद्धेगण पाठलाग । पाहून येई त्रिपुरास राग ॥८॥
(गीति)
त्रिपुरें शिवाबरोबरी, केलें कीं अस्त्रयुद्ध नेटानें ।
योजी वारुणअस्त्रा, शिव सोडी वायवास वेगानें ॥९॥
शिव तों पन्नग-अस्त्रा, सोडी पुढती त्वरीत मुर अग्नी ।
ज्वालांतूनी निघे मग, भीषणसा भव्य पुरुष तो अग्नी ॥१०॥
भक्षी देव-दळाला, उच्छ्वासें वहनं उडवितो पुरुष ।
भ्याले देव तयाला, लपती ते पृष्ठभागिं शिव-पुरुष ॥११॥
देवांस धीर देउन, शंभू सोडी त्वरीत मेघास्त्रें ।
एका बाणें पुरुषा, लोळविलें शंकरें किं तें शस्त्रें ॥१२॥
पुरुषां निचेष्ट केलें, परि उठला तो त्वरीत सुर भक्षी ।
शिवगण पळून गेले, उरला समरीं महेश हा साक्षी ॥१३॥
(शार्दूलविक्रीडित)
संग्रामीं शिव एकटा म्हणुनियां त्यासी कसा तो जय ।
लाभे यास्तव तो रिघे गिरि-गुहेमाजी बसे आजय ।
राहे एकटि पार्वती म्हणुनियां मंदारमार्गें त्वरें ।
चाले तो त्रिपुरासुरासह तया पाहे भवानी त्वरें ॥१४॥
आली जो अपुला पिता हिमगिरी भेटे भवानी तया ।
तीतें पाहुनियां तिला लपविलें एकांत गुफेंत या ।
शोधीलें त्रिपुरें तिला परि नसे हातीं तया लागली ।
तेजस्वी प्रतिमा सुभूषित अशी चिंतामणी दीसली ॥१५॥
आनंदें प्रतिमा करीं उचलुनी तो घेउनी चालिला ।
जातां ती प्रतिमा करीं निसटली साश्चर्य तो जाहला ।
झाला हा अपणां शकून कु असा खिन्नत्व आलें पुरें ।
जायी तो त्रिपुरासुरासह अतां घेऊन तीन्ही पुरें ॥१६॥