(गीति)
प्रायोपवेशनासी, रुक्मांगद बैसला असे जेथें ।
आले बहुतां दिवशीं नारद-मुनि त्या समीप ते तेथें ॥१॥
केला प्रणाम त्यांना, कथिला त्यांना समग्र वृत्तान्त ।
सांगति नारद त्याला, देखियला जो प्रकार अद्भूत ॥२॥
वैदर्भ देश आहे, कदंब नामें प्रसिद्ध पुर त्यांत ।
तेथें सुंदर मंदिर, गणपतिमूर्ती सुपूज्यशी त्यांत ॥३॥
चिंतामणि मूर्तीसी, नाम असे त्या समोर कुंड तिथें ।
तेथें गजाननाचीं, उठलेलीं पाउलें प्रचीत तिथें ॥४॥
(शार्दूलविक्रीडित)
कोणी शूद्र असे वयें जरठ तो कायें महाकुष्ट तो ।
यात्रा तो करितो कदंब नगरा आला असे पाहतो ।
कुंडीं स्नान करी निघे वर तदा पाहे शरीराकडे ।
काया दिव्य दिसे विलोकित तदा सेवेकरी त्याकडे ॥५॥
नेती त्या मनुजा गणेशनगरा आकाशयानांतुनी ।
पाहें मी नयनीं प्रकार असला सांगें स्थिती पाहुनी ।
जाईं तेथ झणीं करीं स्नपन तूं होशी त्वरें चांगला ।
ऐसें नारद सांगता मुदित हो रुक्मांगदें ऐकिला ॥६॥
(गीति)
नंतर पूजन केलें, नारदमुनिचें यथाविधी भावें ।
पुशिलें स्नानमहात्म्या, सांगे नारद नृपास ऐकावें ॥७॥