(गीति)
व्यास म्हणे विधि देवा, केला जर मदन तो शिवें खाक ।
अद्यापवरि तरि तो, छळितो कैसा समस्त हे लोक ॥१॥
विधि हें कथीत व्यासां, ऐकुन शोकित रती शिवापाशीं ।
आली नमीत शिरसा, स्तवन करी ती शिवास कीं मुखिंशी ॥२॥
शंभू प्रसन्न झाले, वदले तिजला स-इच्छ वर मागे ।
ऐकुन रती म्हणालीं, ममसम सुंदर नसे जगीं आंगें ॥३॥
ऐसें असून मजला, वैधव्यानें जगास हें वदन ।
दाखविण्यासी वाटे, लाज मला हो खचीत ती म्हणुन ॥४॥
माझा पती मला हो, द्यावा दानें करुन वर हाच ।
वांचविं जिवास देवा, आन नसे मागणें वदे साच ॥५॥
शंभू म्हणे तियेला, हे कल्लयाणी नको करुं चिंता ।
स्मरसी जईं पतीला, भेटे तेव्हां खचीत हो वदतां ॥६॥
यास्तव नांव ’मनोभू’ होइल कीं प्राप्त हें रती बाळे ।
ऐकें पुढील कथना, सावध होऊन सुखें रतीं बाळे ॥७॥
आणखि कांहीं कालें, विष्णूपासून लक्षुमी उदरीं ।
प्रद्युम्न अशा नामीं, जन्मा येई तुझा पती नारी ॥८॥
नंतर रती शिवाला, नमन करुनियां निघून ती गेली ।
स्मरला पती तियेनें, प्रकटे भेटे मुदीत ती झाली ॥९॥
दोघें पुन्हां शिवाच्या, भेटीला प्राप्त जाहलीं व्यासा ।
शंभूला मदन वदे, पुत्रासाठीं हरीत मी तपसा ॥१०॥
तारक पीडित होता, वध त्याचा करिल सूत हेतूनें ।
देवांच्या इच्छेनें, तपसा भंगोन टाकिली स्वमनें ॥११॥
यास्तव आपण माझें, अपराधाविण करुन भस्म असें ।
हा काय न्याय अपुला, प्रेतासम दिवस कंठणें शिव से ॥१२॥
यास्तव कृपा करुनी, करणें देवा अनुग्रहा आधीं ।
ऐकुन शिवें हराया, एकाक्षर मंत्र दीधला आधीं ॥१३॥
शंभर वर्षे मदनें, केलें तप पावला गणाधीश ।
ऐकुन वृत्त वदे वर, देहीं सुंदर करीत जगदीश ॥१४॥