(गीति)
कृतवीर्यजनक यासी, विधि सांगे सुरसही कथा ऐक ।
कैसें महत्त्व आहे, श्रवण करीं चित्त देउनी ऐक ॥१॥
श्रीमद्गणेशदेवा, तिथिमाजी आवडे तिथी चौथी ।
यास्तव गणेश पावे, व्रत करितां सर्व मासिंच्या चौथी ॥२॥
नभ मास शुद्धपक्षीं, व्रत करण्या योग्यशी तिथी चौथ ।
एतद्विषयीं तुजला, सांगे दृष्टान्त ऐक तूं येथ ॥३॥
(वसंततिलका)
एके दिनीं सहज मी शिवदर्शनासी ।
कैलासिं नारद मुनी फिरत स्थलासी ।
आले अधीं फल अपूर्व असे शिवासी ।
अर्पून तोषित करी प्रभु शंकरासी ॥४॥
शंभू समीप सुत कार्तिक नी गणेश ।
होते तदा सुफल पाहति ते फलेश ।
दोघे परस्पर फलास्तव भांडती ते ।
पाहून हें शिव करी मग चिंतनातें ॥५॥
मातें पुसे शिव कुणा फल देउं सांगे ।
स्कंदास देइ फल हें शशिउत्तमांगें ।
ऐकून वाक्य मम हें फल कार्तिकेया ।
देई तदा शिव तया फल कार्तिकेया ॥६॥
देखून हें मग गजानन तप्त झाले ।
माझेवरी धरित रोष बहूत कालें ।
दावी स्वरुप मम उग्र धरुन भीती ।
भ्यालों म्हणून शशि हास्य करी अरीती ॥७॥
पाहून हें शशिस शापित वक्रतुंड ।
मूर्खा मला हससि यास्तव शाप-दंड ।
कोणी कधीं हि तुजसी नच पाहतील ।
पाहे जरी हि तुजसी तरि पापतील ॥८॥
ऐसी वदून शशिसी प्रभु शाप-वाणी ।
गेले गजानन पुढें घडली विदाणी ।
झाला शशी तदुपरी हिन-रुप-वाणी ।
बैसे लपून मग तो अति-दीनवाणी ॥९॥
(गीति)
श्रीमद्गणेश शापें, शशि लपला त्यास दीनता आली ।
कळली मात सुरांना, ऐकुन मति खेदयुक्तशी झाली ॥१०॥
जमले सारे सुर ते, गेले सत्वर गजाननापाशीं ।
नमित झाले मग ते, शसिसाठीं विनत होति चरणांसी ॥११॥
प्रार्थुन चंद्राकरितां, पुसते झाले उपाय त्या प्रभुला ।
जाणुन भाव सुरांचा, देई उश्शाप सांगतों तुजला ॥१२॥
नभ मास शुद्ध चौथी, चंद्राला देखतीच जे लोक ।
जाणुन किंवा नेणुन, जे जे बघती तयांस हो शोक ॥१३॥
श्रीमद्गणेश देवें, युक्ती कथिली पसंत ती त्यास ।
वंदुन तयावरी ते, करिते झाले सुपुष्पवृष्टीस ॥१४॥
अभिवंदन ही केलें, स्वस्थलिं गेले शशीस आणविती ।
श्रीमद्गणेश यांची, खोडी केली म्हणून जाणविती ॥१५॥
गणपति प्रसन्न व्हावा, यासाठीं त्यास सांगती देव ।
एकाक्षरमंत्राचा, जप करण्यास्तव सुबोधिती देव ॥१६॥
गंगानदीतटाकीं, दक्षिणभागीं जपास आरंभ ।
एकाग्र मनें त्यानें, द्वादश वर्षें करुन हेरंब ॥१७॥
मग तो प्रसन्न झाला, वर देई चंद्रमास तो ऐक ।
पूर्वस्वरुप तुजला, येइल चंद्रा त्वरीत हा एक ॥१८॥
वद्यचतुर्थी दिवशीं, दर्शन पूजन त्वदीय भक्तीनें ।
केल्याशिवाय चंद्रा, माझी पूजा पुरी न हो आनें ॥१९॥
नभ मास शुद्ध चौथी, ये दिवशीं जे तुला किं बघतील ।
शाप तयांना बाधे, अंतर नाहीं चिरायु होईल ॥२०॥
भूषण मानुन चंद्रा, एक कला मी शिरीं धरीं तुष्ट ।
त्वदिय कलेला नमिती, शुद्ध बिजेला समस्त जन सुष्ट ॥२१॥
एणेंपरी वरांनीं, चंद्राचें बिंब जाहलें धवल ।
स्थापी सत्वर तेथें, वरदाची मूर्ति ही तशी धवल ॥२२॥
शिरसीं कला तियेच्या, स्थापुनियां भालचंद्र नाम असें ।
ठेवून चंद्र तेथें, वसवी पुरे हें नदीतटीं खासें ॥२३॥
सिद्धिक्षेत्र म्हणूनी, ठेवियलें त्या पुरास नाम असें ।
कृतवीर्यजनक यासी, विधिनें कथिलें सुरम्य वृत्त असें ॥२४॥