(गीति)
सतिला मुनि सांगे तें, गर्वानें काय जाहलें जनका ।
ऐकें सुभगे कथिं मी, नारद गेले त्वरीत प्रभुलोका ॥१॥
नमिती गजाननाला, स्वागत केलें मुनीस आनंदें।
प्रेमभरें मुनि सांगे, देवा मी नवल सांगतों श्रुति दे ॥२॥
मिथिलानगरीं राजा, राज्य करी जनक दात गुण मुख्य ।
याचक जनांस देतो, दान तयांना मुदीत मन आख्य ॥३॥
दातेपणांत वेंची, बहु धन परि तें न हो कधीं कमती ।
यांतील मुख्य मर्मा, कळण्यासाठीं धरुन हीच मती ॥४॥
जनका धन्य असे तूं, जें जें वांछीत तें मनीं पूर्ण ।
श्रीमद्गणेश करितो, वाटतसे हें मला तरी पूर्ण ॥५॥
तेव्हां तो गर्वानें, त्रैलोक्याचा धनीच मी आहें ।
ब्रह्मस्वरुप आहें, कर्ता कारण समस्त मी आहें ॥६॥
गर्वाचें भाषण हें, ऐकुन मी मग तयास हें वदलों ।
ईश्वर एक असे बा, त्रिजगीं मोठा दुजा नसे वदलों ॥७॥
भूपा तें गर्वानें, वदसी हें योग्य नाहिं बाबा रे ।
याचें फल तुजसी तें, पावे सत्वर खरोखरी बा रे ॥८॥
इतुकें वदून इकडे, आलों सत्वर तुम्हांस सांगाया ।
परिहार करी गर्वा, कार्य असें हें तुम्हांस सांगाया ॥९॥
ऐसें कीलक केलें, गेले नारद तिथून हरिलोकीं ।
प्रभुंनीं विचार केला, पारख करणें खरोखरी हें कीं ॥१०॥
(कामदा)
त्वरित विप्र हो श्रीगजानना । कुरुप सत्य हें शीघ्र घेउन ।
गमन तो करी मिथिलपुरा । जनक बैसला राजमंदिरा ॥११॥
झडकरी तिथें येतसे तरी । बघुन शंकला भूप अंतरीं ।
क्षणिंच तो वदे विप्र आपण । श्रवण जाहले दांत आपण ॥१२॥
उदर पूर्ण हो घालि भोजना । करितसे स्वयें हीच याचना ।
शतक यज्ञ तें पुण्य लाभसी । करित याचना पूर्ण ती अशी ॥१३॥
(साकी)
याचकवचना ऐकुन जनकें पाक-सदनीं त्या नेलें ।
संख्या शंभर लोकांइतुकें झडकरि अन्ना केलें ॥१४॥
धृ० ॥ सुन सुन कीं ललने पावन हो कथनानें ।
पाहुन बल्लव वदती भूपा विप्र नसे हा साच ।
ऐकुन वाटे राक्षस आहे वार्ता ही तीच ॥१५॥
कोठीमधली धान्यें सारीं पाकगृहासी नेलीं ।
भक्षण केलीं सत्वर त्यानें मात अशी ही कळली ॥१६॥
नगरामधलीं आणुन धान्यें पाठवि त्वरीत भूप ।
भक्षुनि विप्रें क्षणांत तेव्हां लज्जित झाला भूप ॥१७॥
यापरि त्याचा गर्व हरुनी नगरीं मागे भिक्षा ।
नगरीचें तें धान्य संपलें मिळत नसे त्या भिक्षा ॥१८॥
तदुपरि तेथें विरोचनानी त्रिशिरा नामें एक ।
देवभक्त तें कुटुंब होतें जाई सदनीं ऐक ॥१९॥
पुढिल वृत्त तें पुढिल प्रसंगीं सांगतसें कीं खास ।
चित्त देउनी श्रवण करावें ऐकें त्या कथनास ॥२०॥