मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ५४

उपासना खंड - अध्याय ५४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

हिमनग मुलीस सांगे, आर्या वृत्तांत माळवा प्रांत ।

तेथें भूपति होता, चंद्रांगद नाम हें असे प्रथित ॥१॥

इंदुमती नांवाची, पत्‍नी त्याची पतिव्रता होती ।

श्रीमद्गणेशव्रत हें, आचरती उभयतां अती प्रीती ॥२॥

यास्तव लाभ तयांना, झाला तो सांगतों मुली ऐक ।

चंद्रांगद राजानें, केले बहु यज्ञ धर्म बहुतेक ॥३॥

राजसभा ही पाहुनि, इंद्र-सुधर्माख्य ती सभा ऊन ।

भासे भूपति ऐसा, वैभवशाली तसेंच थोर मन ॥४॥

कांता पतिव्रता ती, आनंदें करित देवता यजन ।

अतिथीस देव मानुनि, पूजितसे तीच भावना धरुन ॥५॥

(साकी)

एके समयीं अमात्य येउनी भूपाला विनयानें ।

मृगयेसाठीं जावें वाटे म्हणती ते बहुमानें ॥६॥

धृ० ॥ सुन सुन हे गिरिजे । वृत्त ऐक गे कथिजे ।

अमात्य-वचनें ऐकुन नृपती मृगयेसी अनुसरला ।

मृगयेकरितां कृष्णवर्ण तो पोशाकीं सजला ॥७॥

सेनेसह तो सत्वर जाई कांतारीं भूपाळ ।

मृगया करुनी पुढती जाई सेनेसह तत्काळ ॥८॥

इतुक्यामध्यें पुढती दिसली असुरांची टोळी ।

पाहुन सेना भयभित झाली कांपतसे त्या वेळीं ॥९॥

दरिसम वदना कुपसम नयनां पाहुन कीं ती भ्याली ।

कांहीं मेली मूर्च्छित झाली मृत्युमुखीं पडली ॥१०॥

टोळीमाजी राक्षसबाई पाहे चंद्रांगद तो ।

कामें मोहित होउन चुंबुन ठेवी भूपृष्ठीं तो ॥११॥

नंतर बाई सेनेला त्या भक्षितसे अवडीनं ।

ऐशी संधी साधुन नृपती वापितळिं हो मग्न ॥१२॥

जाई तेथें तेव्हां होत्या नागकन्यका आल्या ।

क्रीडेसाठीं बहु प्रीतीनें तीरावरि त्या बसल्या ॥१३॥

इतुक्यामध्यें त्यांना दिसलें राजरत्‍न हें नामी ।

कवळुनि धरुनी पाताळीं तें नेलें आपुले धामीं ॥१४॥

तेथें त्याचा नागकन्यका करिती बहु सत्कार ।

पूर्ववृत्त हें पुशिलें त्यांनीं वदति त्या मग चतुर ॥१५॥

मालवनाथा आतां तुम्हीं व्हावें अमुचे नाथ ।

म्हणजे अपुलें पूर्ण करुं हो इच्छित तें येथ ॥१६॥

ऐकुन वचना चंद्रांगद तो वदतो त्यांना रीती ।

सोमवंशिंचे राजे सारे एक-पत्‍नि-व्रति असती ॥१७॥

परधन आणी परदारा तो तिसरा परस्त्रीद्वेष ।

अमुचे वंशज करिती नच ते धर्मांतिल उद्देश ॥१८॥

वेद-पठनही यजिन दानां रक्षण शरणार्थाचें ।

निषिद्ध कर्मे सोडून आम्ही अचरुं विहीत साचें ॥१९॥

अतिथीसत्काराची आम्हां आज्ञा ती धर्माची ।

यापरि वागुन आतां तुम्ही इच्छुं नका भलतेंची ॥२०॥

अतिथी आहे तुमचा म्हणुनी दुःख न देणें उचित ।

ऐकुन भाषण मग त्या झाल्या खिन्न अशा तेथ ॥२१॥

प्रियकर कांतेसाठीं अमुचा धिक्कार कायसा केला ।

कांतावियोग व्हावा यास्तव बंदिंत ठेवू तुजला ॥२२॥

(गीति)

राजा तळ्यांत शिरला, यास्तव राक्षस जलास पीतात ।

जलचर सारे प्राणी, भक्षुनी कीं त्या तळ्यास अटितात ॥२३॥

गेलेल्या सेनेनें, भूपति धरिला असूर बाईनें ।

कथिलें वृत्त असें तें, ऐकुन विव्हळ सुजाण शोकानें ॥२४॥

इंदुमती ही वार्ता ऐकुन मूर्च्छीत तशीच अनिवार ।

पुरवासी जन सारे, करिती सावध वदून दे धीर ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP