मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ७३

उपासना खंड - अध्याय ७३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

शूरसेनानें इंद्रास पूशियेलें ।

कार्तवीर्याचें जनन कसें झालें ।

प्रभू तोषित हो कृतवीर्य व्रतायोगें ।

भाग्यशाली हो तनय तपायोगें ॥१॥

शक्र सांगे त्या शूरसेन राया ।

त्वदिय पुत्राची नवलयुक्त काया ।

वदन सुंदर हें तेजयुक्त त्याचें ।

हस्तपादांविरहीत वपू त्याचें ॥२॥

अशा पुत्रासी पाहुनी करी शोक ।

सती तेव्हां समवेत भृत्यलोक ।

सकल नारीही करिति दुःख राया ।

स्वयें येई कृतवीर्य तया ठाया ॥३॥

बघुनि पुत्रासी कृतवीर्य करी खेद ।

जनन उत्सव तो राहिला अती खेद ।

नगर सारें उद्विग्न दिसे साचें ।

करिति मंत्री ते शांत सुमन त्यांचें ॥४॥

(शार्दूलविक्रीडित)

राजा शोक करुं नको फुकट कीं होणें चुकेना कधीं ।

होई त्या प्रभुची कृपा अजुनही काया तयाची सुधी ।

होई हें समजून शांत करणें भूपा मनासी अतां ।

वृक्षांसी फलं पुष्पं हीं न रुजती एकाकिंही तत्त्वतां ॥५॥

होतां त्या प्रभुची कृपा अजुनही कल्याण होई सुता ।

ऐकूनी नृपती प्रधानवचसा शांती धरी तत्त्वतां ।

पत्‍नीची मग शांतवी हि मनसा विप्रांस तो आणवी ।

आरंभीं प्रभुपूजनास करुनी ज्योतीषही वर्तवी ॥६॥

दानें देउन भूपती तदुपरी हत्तीवरी बैसुनी ।

वांटी साखर ही सुता तपदिनीं नांवास तो योजुनी ।

होतां द्वादश अब्द एक दिवशीं श्रीदत्त त्या भेटती ।

ठेवी भूपति कार्तवीर्य म्हणूनी ऐकें कथा शांत ती ॥७॥

(गीति)

कृतवीर्य करीं चरणीं, साष्टांगें बहुत आदरें प्रणती ।

विधियुक्त पूजनासी, मुदित असे जाहले तया वदती ॥८॥

अद्‌भुत पुत्र बघाया, ऐकुन वृत्तास पातलों राया ।

ऐकुन उद्वेगानें, भृत्यांकरवीं अणी तया ठायां ॥९॥

त्याचें स्वरुप पाहुन, दत्तात्रय झाकिती निमिष नयन ।

जाणति अंतर्यामीं पुत्राचें पूर्वकर्म हें जनन ॥१०॥

वदती कृतवीर्याला संकष्टीच्या व्रतांत जागरणीं ।

येतां जांभइ तेव्हां, आचमिलें बा नसेच तूं पाणी ॥११॥

यास्तव अंगावांचुन, झाला हा पुत्र जाण कीं भूपा ।

ऐकुन भाषण त्याचें, मानवलें सत्य सत्य तें भूपा ॥१२॥

विनयें भूप तयांना, अंगासाठीं उपाय सांगा जो ।

प्रार्थीतसें सुविनयें, करिन म्हणें मी सुदेह सुत साजो ॥१३॥

विज्ञापना तयाची, ऐकुन पुत्रास मंत्र उपदेश ।

सांगोपांग कथुनियां, एकाक्षरि मंत्र-राज जगदीश ॥१४॥

म्हणती या मंत्राचें, द्वादश वर्शे सु-भाव आचरण ।

करितां गणेश पावे, बघतां प्रभु ये तयास करचरण ॥१५॥

येणेंपरी तयांना, अत्री-सुत सांगुनीहि अदृष्ट ।

झाले पित्यास सुत तो, आज्ञा मागे तपास तो इष्ट ॥१६॥

पोंचवि वनीं सुताला, निर्मुनियां तेथ एक पर्णकुटी ।

राहे तींत तपासी, करितो त्या कार्तवीर्य प्रभु-निकटीं ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP