मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
गणपतीचीं पदें

मध्वमुनीश्वरांची कविता - गणपतीचीं पदें

भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला


१ पद
ये गणराया मंगळमूर्ति ॥ध्रु०॥
पतितपावन दीनदयाळा । त्रिभुवनीं सोज्वळ तुझी कीर्ति ॥१॥
कीर्तनरंगीं नृत्य करी रे । संगीताची मिळवुनि पूर्ति ॥२॥
मध्वमुनीश्वर म्हणतो मजला । दे वर्णाया निर्मळ स्फूर्ति ॥३॥

२ पद
गजवदना रे गदवदना रे । गजवदना रे नमितों ॥ध्रु०॥
तुजविण आना । आणिना मी ध्याना । नाम संकटीं तें दुजे वदना रे ॥१॥
गौरीहरप्राणा । लंबोदरध्राणा । हातीं धरितोसी दिव्यरदना रे ॥२॥
ब्रह्माविष्णु ध्याती । योगी भोगी गाती । यांच्या करितोसी दुःखकदना रे ॥३॥
सिद्धीबुद्धी अंकी । त्रिभुवन जिंकी । ऐसें सामर्थ्य त्या देसी मदना रे ॥४॥
मध्वनाथचित्तीं । वाटे तुझी खंती । येसी धांवोनिया राजसदना रे ॥५॥
नमितों तुजला गजवदना रे ॥

३ पद
अरे हा देव गजानन रे । अंबानंदनु हा दे ॥ध्रु०॥
आनंदमंदिर वंदि पुरंदर । चर्चुनी सिंदुर सुंदर उंदिरवाहन रे ॥१॥
तुंदिलमंडित तांडवपंडित । धुंडुनि दानव दंडित खंडित त्रासुनि रे ॥२॥
मध्वमुनीश्वर कीर्तनिं तत्पर । देखुनी सत्वर धांवत संकटनाशन रे ॥३॥

४ पद
अंबा येकविरा जे । याला जननी येक विराजे ॥ध्रु०॥
कंठीं पदक विराजे । ज्याचे वंदिती पद कविराजे ॥१॥
जो म्हणवी सेंदुरवाला । तो राहातो सेंदुरवाला । ज्याला सेंदुर वाल्हा । त्याला वाहणेसे दुरवाला ॥२॥
धरी मस्तकीं भ्रमरांसी । नासी समस्त कीं भ्रमरासी । मध्वनाथमुनि अमरासी । पाळी तारी पामरासी ॥३॥

५ श्लोक ( कामदा )
शूक सांगतो शौनकाप्रती । या कथेसि जे नित्य ऐकती । देव देतसे त्यांसि सन्मती । सत्समागमें होय सद्गती ॥१॥
उत्तरेकडे देवतागिरी । दक्षिणेकडे गौतमी बरी । सिंदुरासुरें मेदिनीवरी । स्थापिली पहा दिव्य ते पुरी ॥२॥
राज्य मांडिलें उग्र सिंदुरें । देवतालयें पाडि सुंदरें । स्वर्गिंच्या नृपें श्रीपुरंदरें । त्यासि दीधलीं दिव्य मंदिरें ॥३॥
दानवेश्वरें शब्द अंबरीं । अक्षरें खरीं ऐकिलीं बरीं । शत्रु वाढतो अंबिकोदरीं । शंभुच्या घरीं खूण हे धरी ॥४॥
सिंदुरासुरें ग्राम सांडिला । शंभुच्या घरीं द्वेष मांडिला । अंबिकोदरीं गर्भ खांडिला । श्रीमुखेंदु तो दूर धाडिला ॥५॥
नर्मदाजळामाजि तो पडे । देव सर्वही तेथिचे खडे । त्यांचि अर्चना ज्यासि हो घडे । तोचि मुक्तिच्या मस्तकीं चढे ॥६॥
पर्यळीमधें अंबिका वसे । कर्दळीवनीं निद्रिता असे । निर्दळी सुरा दुष्ट मानसें । गांजिली शिवा त्याचि तामसें ॥७॥
निद्रिता असे अंबिका घरीं । वायुरूप तें दैत्य तो धरी । नासिकापथें जाय अंतरीं । गर्भिंच्या शिरे छेदना करी ॥८॥
स्वस्थळाप्रति दैत्य पातला । घेऊनी सुरा फार मातला । निर्जरा स्त्रिया त्यांसि रातला । मूळ धर्म तो बंदिं घातला ॥९॥
श्रीशिवालयीं पुत्र जन्मला । वक्त्रहीन तो देखिला भला । पार्वती म्हणे बाळा चांगला । त्यासही कसा दोष लागला ॥१०॥
अंबिका वदे शंकराप्रती । छेदिला तुम्ही भारतीपती । दुष्ट कर्म तें भोगुनी किती । लेकरासि तों जाळि हे गती ॥११॥
त्या चतुर्भुजा देखतां शिवा । दुःख वाटलें तीचिया जिवा । हा कसा कुळीं जन्मला दिवा । कायसी वदूं श्रीरमाधवा ॥१२॥
श्रीशिवाज्ञया नंदिकेश्वरें । देव बाहिलें सर्व आदरें । वक्त्रहीन तों बाळ शंकरें । दाविलें तया चंद्रशेखरें ॥१३॥
शंभुपार्वती पावलीं भया । देव सर्वही पूजिती तया । आमुची मुला येउं दे दया । दुष्ट विघ्न हें जाउं दे लया ॥१४॥
सूत सांगतो शौनकाप्रती । या कथेसि जे नित्य ऐकती । देव देतसे त्यांसि सन्मती । सत्समागमें होय सद्गती ॥१५॥
भूतळीं असे एक भूपती । श्रीमहेश हे त्यासि बोलती । शांभवामधें जो सदा व्रती । त्याचिया घरा ये बृहस्पती ॥१६॥
पूजिला नृपें श्रीबृहस्पटी । तोषलों म्हणे तो महामती । ऐक उक्ति हे दिव्य भूपती । वंद्य होसि तूं निर्जराप्रती ॥१७॥
श्रीमदें महेशासि व्यापिलें । नारदें तयालागि शापिलें । भोगिशील तूं कर्म आपुलें । शंभुहस्तकें जासि कापिले ॥१८॥
भूप पावला ते क्षणीं मृती । पर्यळीवनीं घेत संसृती । कुंजरास्य तो मानवाप्रती । अंतरीं करी शंकरस्मृती ॥१९॥
त्या गजासुरें युद्ध मांडिलें । शंभुनें तयालागिं ताडिलें । छेदुनी बरें चर्म काढिलें । चंद्रशेखरें तेंचि वेढिलें ॥२०॥
वारणानना शंभु पूजितो । धूप दीप नैवेद्य योजितो । जो जसा मनीं भक्त भावितो । देवही तसा त्यासि पावतो ॥२१॥
बाळ बोलिलें नारदाप्रती । शापिला तुम्ही भक्त भूपती । पर्यळीमधें तो गजाकृती । शंभुहस्तकें पावला मृती ॥२२॥
बोलिला मुखें जें बृहस्पती । वंद्य होसि तूं निर्जराप्रती । तें करीन मी सत्य श्रीपती । अंगिकारि तूं हेंचि सांप्रती ॥२३॥
श्रीमहेश हें नाम आवडें । आळवा मला भक्त साबडे । जो वदेल तो मत्पदीं चढे । मी वधीन त्या सिंदुरा पुढें ॥२४॥
श्रीविरंचिच्या वक्त्रिं जन्मला । त्याचिया वरें फार मातला । गभिं येऊनी छेदिलें मला । मी वधीन तो दैत्य येकला ॥२५॥
निर्विकार तो देव मी खरा । सांगतों तुम्हां योग हा बरा । मारिलें शिवें ज्या गजासुरा । अंगिकारितों त्याचिया शिरा ॥२६॥
ज्यासि देखतां काम लाजती । आयुधें करीं चारि साजती । घागर्‍या बर्‍या पायिं वाजती । दुंदुभिध्वनी दिव्य गाजती ॥२७॥
ज्यासि चिंतितां दोष वारती । तो प्रगटला दिव्यसा रथी । श्रीउमेश त्या मुख्य भारती । इंदिरा करी मंगलारती ॥२८॥
सांग देखिला देव जेधवां । हर्षले मुनी सर्व तेधवां । शुक्लपक्षिंचा मास भादवा । पुत्रसौख्य दे श्रीउमाधवा ॥२९॥
मध्वनाथ हे सांगतो कथा । श्रीचतुर्थिची नाहिं अन्यथा । जन्ममृत्युची नाशुनी व्यथा । देव देतसे मुक्ति सर्वथा ॥३०॥

६ श्लोक ( अनुष्टुप् छंद )
योऽसौ निरंजनो देवः परमत्मा सनातनः । स एव द्विजरूपेण ह्यवतीर्णो गजाननः ॥१॥
गजाननः क्षेत्रवासी भृशुंडी वा परो ऋषिः । अत्रागम्यानुगृण्हातु मामिदानीं दयानिधिः ॥२॥
क्षेत्रज्ञरूपी भगवान् परमात्मा निरंजनः । करोतु पावनं क्षेत्रं मदीयं पादपांशुभिः ॥३॥
इष्टमन्नं क्षुधार्तस्य तृशितस्य जलं यथा । तथा त्वद्दर्शनाकांक्षी सीदत्येकोमुनीश्वरः ॥४॥
निरंजनस्य देवस्याशिषः संति दयालवः । तेषां मध्वमुनींद्रोऽस्मि अस्त्वेकोहि दयालवः ॥५॥
गजाननवरेण्यस्य संवादस्थलमद्भ्तं यत्र वैनायकं नाम तीर्थ कैवल्यदायकं ॥६॥
तत्क्षेत्रे गुरुणा दिव्यं स्वप्ने मह्यं प्रदर्शितं । यदुक्तं राजसदनं तदिदं च न संशयः ॥७॥

७ पंचरत्नगणपतिश्लोक ( अमृतध्वनिवृत्त )
सिंदुरासुर मर्दिला द्विजदाननें निजविक्रमें । गुप्त ते क्षिति व्यक्ततेप्रति पावली करुणाक्रमें । दर्शनें मंगलधनें अद्य काय सिंदुरवाड कीं । नांदतो गणनाथ तो भुवि रम्य सिंदुरवाडकीं ॥१॥
विघ्नवारणदारण प्रभु वारणानन राजतो । दारुणाघनिवारणोद्यत् धारणागणराज तो । वंदिता अभिवंद्यतासुख देतसे सुरनराकी ॥नां०॥२॥
गौतमीतटिं उत्तरस्थित क्रोशपंचकमध्यकीं । क्षेत्रराजविराजितक्षिति निर्जराप्रति वंद्य कीं । तीर्थ आणिक सिद्धिदायक साम्यतेस अपार कीं ॥नां०॥३॥
घृष्णेश्वरदेवताचळ पूर्व पार्श्वपदेशम् । सत्कमळुजा नदी तटीतही शोभमान महेशभू । सेवितां अघभाक् दूरग होय जेथें निवाड कीं ॥नां०॥४॥
श्रीगणेशपुराणसम्मत बादरायण बोलिला । मध्वनाथ मुनीश्वरावरि सद्गुरुघन वोळला । पांडुरंगसमेत विश्रुत तैंहुनी करुणार्द्र कीं ॥नां०॥५॥
श्रीविघ्नराजस्तुतिपंचरत्नें । मनोभिलाषप्रद अप्रयत्नें । मनोहरें लब्ध दयार्णवोघें । धरा बरीं हृत्पदकीं अमोघें ॥नां०॥६॥

८ पद
मोरया माहेरिया माझ्या मंगळमूर्तिं ॥धृ०॥
तूं येक विश्वाधार करितोसि दीनोद्धार । कत्याणदायक तुझी निर्मळ कीर्ति ॥१॥
जपतांचि तुझें नाम । पुअरती मनाचे काम । तत्काळ मावळते अविद्यास्फूर्ति ॥२॥
जयजयजी वक्रतुंडा । सिंदुरचर्चितशुंडा । श्रीमध्वनाथा देई गुरुभक्तिपूर्ति ॥३॥

९ पद
देवा गणाधीशा देवा गणाधीशा ॥ध्रु०॥
मोरेश्वरा दयानिधी वारी भवपाशा ॥१॥
मध्वनाथ म्हणे माझी पुरविली सर्व आशा ॥२॥

१० हेरंभस्तोत्र
सकळाआधीं पूजा करिती जन ज्याची । ज्याच्या नामें नासति विघ्ने सकळांचीं ॥ भजतां वारी जो भक्तांचें भवओझें । त्याच्या चरणीं निश्चळ राहो मन माझें ॥१॥
शुंडादंडें करितो खंडण दैत्यांचें । दंताघातीं दळ संहारी कुजनांचें ॥ माथा शेंदुर वरि दूर्वांकुर साजे । त्याच्या चरणीं निश्चळ राहो मन माझें ॥२॥
ज्याचें आखूं वाहन शोभे रणरंगीं । देवासाठीं जो असुरांचें बळ भंगी ॥ येवो वाचे चवदा भुवनें जो गाजे । त्याच्या चरणीं निश्चळ राहो मन माझें ॥३॥
ज्याच्या कानें चंचळतेचा बहु चाळा । ज्याचे कंठीं शोभति मुक्ताफळमाळा ॥ हातीं पाशांकुशवैभव साजे । त्याच्या चरणीं निश्चळ राहो मन माझें ॥४॥
ज्याच्या पोटीं चवदा भुवनें हीं वसती । वेदीं शास्त्रीं ज्याला लंबोदर म्हणती ॥ मांदे कांसे पीत पीतांबर । त्याच्या चरणीं निश्चळ राहो मन माझें ॥५॥
ज्याच्या उरू जानू वर्तुळ पोटरिया । ज्याच्या चरणीं पुष्कळ घुळघुळ घागरिया । थयथय शब्दें नाचतसे जो निजबोधें । त्याच्या चरणीं निश्चळ राहो ॥६॥
ज्याच्या सत्तें शंकर जाले त्रिपुरारि ॥ ज्याच्या सत्तें विष्णु भवभंजनकारी ॥ ज याच्या सत्तें ब्रह्मा भुवनें हीं करितो । ज्याच्या सत्तें शेण शिरिं धरणी धरितो ॥७॥
ज्याच्या सत्तें गिरिजा महिषासुर मारी । ज्याच्या सत्तें मन मुक्तिसि अधिकारी ॥ ज्याच्या सत्तेवांचुनि कांहींही नुमजे । त्याच्या चरणीं निश्चळ राहे मन माझें ॥८॥
विघ्नईशा, विघ्नविनाशा, विबुधेशा । शेंदुर वाढे हेरंबा तूं जगदीशा ॥ भक्ताधीना भक्तवत्सला, गणराया । सिद्धीबुद्धीप्राणनाथ, वंदूं पाया ॥९॥
आज्ञा द्यावी मध्वमुनीश्वर कविवीरे । हेरंबस्तोत्र जपाया मत्तमयूरे । अर्चन करितां सिद्धीसह जो गण नाचे । त्याच्या चरणीं निश्चळ राहो मन माझें ॥१०॥

पद ११
गुण गावेम तुझे गणराया ॥ध्रु॥
अंबुजलोचन शंभुसुता तुज । देखुनियां मन लोभो ॥१॥
कुंदसुधाशरदिंदुसमद्युति । सुंदर तो रद शोभे ॥२॥
सिंदुरचर्चित उंदिर वाहन । साजतसे तुज देवा ॥३॥
रूप निरंतर पाहिन अंतरीं । वाटतसें मनिं हेवा ॥४॥
मध्वमुनीश्वर मागतसे तुज । पाव तूं विघ्न हराया ॥५॥

१२ श्लोक मोहत्कटाचे
नमस्कार केला मुनि येकदंता । तया नंतरें सद्गुरु साधुसंता । जया नावडे लेशही ते अहंता । म्हणोनी मुनी वंदितो त्या महंता ॥१॥
रतीचा पती जीववीला तयानें । तिची राखिली संकटीं लाज यानें । स्वभक्तांसि जो देता राज्ययानें । करावें जनस्थानिंचें राज्य यानें ॥२॥
जनस्थानिंचा देव तोषी जयासी । झुगारूनि दे मोदकाच्या ढिगासी । स्वयें उद्धरी जो खगांसी मृगांसी । मना मुक्त होसी जरी त्यासी गासी ॥३॥
गणाधीश जो हा भृगुक्षेत्रवासी मनातीत तो सर्व विघ्नें विनासी । स्वभक्तासि जो देतसे जीवरासी । करी मुक्त संसारिंच्या जीवरासी ॥४॥
युगें लोटलीं आजि आला घरासी । पुन्हा आजि सांभाळिली लाज कैसी । जया चिंतितो देव कैलासवासी । पहा दारणेच्या तटीं चिद्विलासी ॥५॥
पहा गौतमीच्या तटीं मोरयासी । कसें शोभतें आसन मोर यासी । सदा ..... चिंतिती थोर यासी । म्हणोनी भजा त्या सख्या सोयर्‍यासी ॥६॥
भजा रे भजा मूर्ति चिंतामणीची । त्यजारे त्यजा व्यर्थ चिंता मनींची । क्षुधाबाप हा मुख्य गोवर्धनींची । दयापूर्ण होईल त्या स्वर्धुनीची ॥७॥
फिरे नित्य बैसोनिया नीळकंठीं । सुखें त्रिस्थळीमाजि त्या काळ कंठी । करीं साखळ्या शोभते माळ कंठीं । कवी त्यापुढें नाचतो वाळवंटीं ॥८॥
जर्‍ही जन्मले लोक या कलींत । तर्‍ही फार होती सुखी त्रिस्थळींत । भवाब्धीसि घेऊनियां अंजुळींत । पिती मान्य होतील मुक्तावळींत ॥९॥
गणेशासि वाहीन गंगाजळासी । समर्पीन सिंदूर दूर्वादळासी । तयाला उणें काय त्या मंगळासी । म्हणे नाथ तो मान्य भूमंडळासी ॥१०॥
मध्वनाथ कवि सादर वर्णीं । आयको कपिल सर्वहि कर्णी । ज्यासि आवडि बहू शमिपर्णी । तो कृपा करू सुधाकरवर्णी ॥११॥

१३ श्लोक
श्रीमध्वनाथाभिधदीनबंधो । अनंत कल्याण गुणैकसिंधो ॥ विनायकाधीश्वर सुप्रसिद्ध । हेरंब लंबोदर मां प्रसीद ॥१॥
हेरंब लंबोदर भालचंद्रा । विनायका तूं गुणरत्नसांद्रा ॥ श्रीमध्वनाथा करुणासमुद्रा । शोभे तुझी मंगलरूपमुद्रा ॥२॥
भोगूर गोवर्धन नासिकीं हो । या त्रिस्थळीमाजि निदासकी हो ॥ घेऊनियां अंक्कुश पाश कींहो । करीतसे संकत नाश कींहो ॥३॥
गोदावरीच्या तटिं दिव्य हस्ती । गोवर्धनीं नांदत पद्महस्ती ॥ जो वंदीला देवगणीं समस्तीं । तो पूजीला म्यां कमळीं प्रशस्तीं ॥४॥
विनायकें आणुनि स्वस्थळासी । तोडूनियां संशयशृंखलासी ॥ पाजूनियां गौतमिच्या जळासी । दिलें मला चिन्मय त्या फळासी ॥५॥
तपोवनाच्या अति संनिधी हो । भोगूरिंचा देव दयानिधी हो ॥ जो दुष्ट दैत्यांस बळें वधी हो । दासा न दे अंतर तो कधीं हो ॥६॥
तपोवनीं नांदत रेणुका हे । जे भक्तवत्साप्रति धेनुकाहे ॥ ते शारदा शांहवि अंबिका हे । प्रसन्न जाली कवि त्रिंबका हे ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP