मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १०१ ते ११०

श्रीकृष्णाचीं पदें - पदे १०१ ते ११०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद १०१ वें
सोडी सोडी रे कान्हा सोडी ॥ ध्रु०॥
सारी रात्र मजला जागरण झालें ॥ अझुनि सुटेना गोडी ॥१॥
ऐसी वार्ता कळेल पतिला ॥ मारील मजला छडी ॥२॥
मध्वमुनीश्वरस्वामी रमापति ॥ अनन्यभावें हात जोडी ॥३॥

पद १०२ वें
बहु प्रीतीनें विनोदानें राधा काय बोलली ॥ मला भासतें हरि तुम्हापासून आज कांहीं गोष्ट घडली ॥ कांहो तुमचा नूर उतरला मुखावर पिवळकी चढली ॥ डोळे लावून शब्द बोलतां अशी अवस्था कां घडली ॥ कोण परनारी तुम्हीं भोगिली तुमची परीक्षा मज कळली ॥ हरि तुम्ही मनचे कपटी सांगत नाहीं बुद्धि आपुली ॥ चोरून मसी आणिकेसी भले खेळतां रंगढंगा ॥ मुखचंद्र तुमचा सुकून गेला हरि मजप्रति सांगा ॥१॥
म्हणे राधिका यदुनायका तुम्ही ऐका श्रीरंगा ॥ध्रु०॥
ऐक ऐक राधिके आतां मी खरें सांगतों तुजजवळी ॥ वनीं गोधनें चारुनि आलों मी घरासि संध्याकाळीं ॥ तशांत माझी गाय चुकली तिचें नांव धिकापोळी ॥ एकरात्र पाहात हिंडलों गांवामध्यें आळोआळीं ॥ नाहीं तिळभर पहा गवसली म्हणून सुरत जहली पिवळी ॥ जागृतीच्यामुळें डोळे झांकती गे वेल्हाळी ॥ उगाच लटका भ्रम धरुनी रुसूं नको आपुले जागा ॥२॥
म्हणे सुंदरी ऐका हरि बोलते भीड सोडून ॥ पीतांबराच्या निर्‍या आतां ह्या कां गेल्या मोडून ॥ सुगंधाचा वास कशाचा येतो तुम्हांकडून ॥ गालाला काजळ लागलें पाहा डोळे उघडून ॥ गोपीचंदनामधें थोडेसें कुंकू राहिलें जोडून ॥ कसें हरि तुम्हीं नाहीं म्हणतां घेऊं सिकला पाडून ॥ कोण्या नारीसी दिधलें चुंबन दिसती खुण तुमच्या आंगा ॥३॥
काल जाईच्या झाडांस बसलों होतों राधिके ॥ फूल आंगावर गळून पडलें ग येक ॥ पितांबराचा सोगा गुंतला निर्‍या मोडल्या त्या देख ॥ कानांत लेखणी खोविली शाई लागली तेव्हां कीं ग ॥ गोपीचंदनामध्यें तांबडी अक्षत आहे देख ॥ कांहो खोटा उगाच बट्टा बोलतां तुम्ही अनंता ऐकावें ॥ मोहनमाला उरास रुतली प्रत्यक्ष नयनीं पाहावें ॥ पाठीला बांगड्या रुतल्या कोठवर मजला सांगावें ॥ आतां इतकें राहिलें हरि वोढुन दुसर्‍या दावावें ॥ कांहो खोटा असा जबाब सवाल लागो द्याना आपलें आंगा ॥४॥
हरि संपादणी करुनि बोलतां तुम्ही अनंता ऐकावें ॥ मोहनमाला उरास रुतली प्रत्यक्ष नयनीं पाहावें ॥ पाठीला बांगड्या रुतल्या कोठवर मजला सांगावें ॥ आतां इतकें राहिलें हरि वोढुन दुसर्‍या दावावें ॥ कांहो खोटा असा जबाब सवाल लागो द्याना आपले आंगा ॥५॥
ऐक ऐक राधिके मघा एकासी झोंबी मज लागली ॥ त्याचे गळ्यामध्यें होती कंठी गे ती माझे उरास रुतली ॥ त्या गड्यानें बहु बळानें मजला कव घातली ॥ त्याचे हाताध्यें होतें कडें ते खुण पाठिसी उमटली ॥ मध्वनाथ रंगीं रंगला भगवच्चरणीं श्रीरंगा ॥६॥

पद १०३ वें
जय जय मंजुल मुरलीधारिन् । कंजदलेक्षण कुंजविहारिन्‍  ॥ध्रु०॥
केशव माधव वामन विष्णो । कृष्ण कपालय पालय जिष्णो ॥१॥
नृहरे नरकासुरभयकारक । नारायण नरकार्नवतारक ॥२॥
गोवर्धनश्वर गोकुलपालक । गोपवधूजनमानस चालक ॥३॥
मदनमनोहर श्रीजलशायिन् । मध्वमुनीश्वरप्रिय वरदायिन् ॥४॥

पद १०४ वें
अनंतकोटि ब्रह्मांडचालक । तो हा जाला नंदाचा बाळक ॥ यमुनेच्या डोहांतील कालिक । मर्दुनि म्हणवी गोकुलपालक ॥१॥
पहा वो बाई कैसें हें नवल । परब्रह्म जालें हें गोवळ ॥ गोवळांचें उच्छिष्ट कवळ । खाउनि न म्हणे सोवळें वोवळें ॥२॥
क्षीरसागराचा जो जांवई । दहीं दूध चोरितो हें पाही ॥ गोपियांसी कवळीतो बाहीं । मध्वनाथ जाणें याची घाई ॥३॥
 
पद १०५ वें
मुक्त पुरी द्वारका त्रिभुवनतारका । नाहीं दयाळ कृष्णासरिखा ॥१॥
परिसे रे सखया ॥ध्रु०॥
गोमतींत तनु हे तिंबो । मनमोहन हृदयीं बिंबो ॥ करुणेचा पूर मजवरी तुंबो ॥परि०॥२॥
चक्रतीर्थी पडतां अस्थी । वैकुंठीं घडते वस्ती ॥ शंखचक्र जडती हस्तीं ॥परि०॥३॥
पुण्यप्रत शंखोद्वार । जेथें वसे दामोदर ॥ मुक्तिदानीं परमोदार ॥परि०॥४॥
धन्य देश गुर्जर । स्तविताति निर्जर ॥ भजनें हरती त्रिविध ज्वर ॥परि०॥५॥
करितांचि तुझें स्मरण । हरपतें जन्ममरण ॥ तो तूं माझा रुक्मिणीरमण ॥परि०॥६॥
धन्य क्षेत्र प्रभास । अविनाश श्रीनिवास ॥ पहातां हरपे चिदाभास ॥परि०॥७॥
मध्वनाथ जयजयकार । करितांचि येकवार ॥ वृत्ति जाली चिदाकार ॥परि०॥८॥

पद १०६ वें
भज भज मनुजारे । शासन करि जो दनुजा रे ॥ध्रु०॥
शंखासुर वधी होउनि मासा । तो सहकारी श्रीहरि माझा ॥१॥
मंदर धरुनी वांटी सुधेतें । सूकरदांतीं धरि वसुधेतें ॥२॥
संकट नानाविध निरसी हा । अंतरीं ध्याई श्रीनरसिंहा ॥३॥
वामन होउनि बळिला ज्याची । न कळे महिमा निगमा ज्याची ॥४॥
दुर्मद क्षत्रियवंशज जाळी । भार्गवरोषहुताशनजाळी ॥५॥
दशरथनंदन भवभयहारी । दिव्य अयोध्यानगरविहारी ॥६॥
निर्मळ ज्याचीं नामें गावीं । तो अवतरला गोकुळगावीं ॥७॥
बौद्ध दयानिधि वर्णि अहिंसा । मारुनि म्लेंच्छा अंतरि हिंसा ॥८॥
मध्वमुनीश्वर तो अवतारी । धर्म स्थापुनि त्रिभुवन तारी ॥९॥

पद १०७ वें
कृष्णा कृतघ्न तूं होसी । तुज येवढा नाहीं दोषी ॥१॥
येवढ्य रचुनि असत्या । करिसी चराचर हत्या ॥२॥
चोरजारशिरोमणी । कोण तुझे दोष गणी ॥३॥
तुज अधर्म्याचें नांव । घ्यावें त्यानें जीवें जावें ॥४॥
मध्वनाथ म्हणे पाही । तुझी सद्गति होणें नाहीं ॥५॥

पद १०८ वें
बहुतांचे तळतळाट । होती जेव्हां येकवाट ॥१॥
त्याचें फळ आतां हरि । देखसील हातावरी ॥२॥
तुझ्या पापें बुडेल गांव । यादवांचें नुरेल नांव ॥३॥
पायां लागुनिया बाण । अवचित जाईल प्राण ॥४॥
म्हणे नाथ अवधूत । मग होसील मद्भुत ॥५॥

पद १०९ वें
लेक तुझा अनिवार । बाइल फिरते दारोदार ॥१॥
करुनि मेहुण्याचा नासु । आंगाखालीं घातली सासू ॥२॥
पर्णियली गोत्रजीण । वृंदा म्हणवी बहीण ॥३॥
फजितीचा तो संसार । करितां न लाजसी फार ॥४॥
आंगीं साहेबीचें वारें । नाथ म्हणे कळलें सारें ॥५॥

पद ११० वें
ज्यासी होईल अनुताप । त्याचें जाईल महापाप ॥१॥
त्यासी दिल्या प्रायश्चित्त । शुद्ध होईल निश्चित ॥२॥
तुझी चौघां पडली चिंता । तिहीं सांगितलें संतां ॥३॥
देव आहे हृदयशून्य । त्यासी कैचें पापपुण्य ॥४॥
मध्वनाथें धरिलें मौन । अवघें मानियलें गौण ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP