श्रीरामाचीं पदें - पद ५१ ते ६०
भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला
पद ५१ वें
बालम बालम बालम मोसो बोलोजी प्यारे बालम ॥ध्रु०॥
हु भई कमरी चरणकी दासी । धुंडत फिरती अलम ॥१॥
निसीदिन तेरे दरशनको प्यासी । जबी रहे सजनको जालम ॥२॥
मध्वमुनेश्वर तिहारे मिलनकु । खेलत पवनकी तालीम ॥३॥
पद ५२ वें
देवा गर्वाचा रावणाचा पर्वत रावण रे ॥ध्रु०॥
पंचवटीमधें गोदातटीं जेणें । हरिलें जानकीकारणें रे ॥१॥
कुंभकर्ण ज्याचा भाऊ दळाधिप । जैसा मदोन्मत्त रावण ए ॥२॥
मंत्रशास्त्रें अति प्रविण म्हणविती । जाणती जारण मारण रे ॥३॥
आह्मी रणांगणीं मारूं दोघाजणां । करूं भूताहातीं पारण रे ॥४॥
रामा तुझें बळ पाहावया जाणें । धाडियले शुकसारण रे ॥५॥
मध्वनाथा तुम्ही अवतार धरुनी । सर्वहि जग तारण रे ॥६॥
पद ५३ वें
रावण म्हणे जानके । आतां अंतरला राम वो ॥ध्रु०॥
समुद्राचे परतीरीं राक्षसांनीं । त्याचें पुरतें केलें काम वो ॥१॥
लक्ष्मणाची पुरती केली पाठी दुमती । त्याचें काढियलें चाम वो ॥२॥
वानर येथें आलें होतें एक वेडें । त्याचें तोंड झालें शाम वो ॥३॥
लंकेमध्यें अलौकिक राज्य भोगीं । तुझें सुवर्णाचें धाम वो ॥४॥
मध्वनाथ स्वामीमहाराज । त्याचें येथें घेऊं नको नाम वो ॥५॥
पद ५४ वें
लंकापति रावण धरी आतां बरवा धीर ॥ध्रु०॥
काळाभि हा रुद्ररूपी रामराजा । तुझा भाजिल हिरवा हीर ॥१॥
पिसाळलें सुनें आलें यज्ञशाळे । त्याला प्राप्त कैची खीर ॥२॥
सेतुबंधीं रामेश्वरीं कीर्ति केली । जाला महोदधि थीर ॥३॥
वानरांचें बळवंत दळ भारी । यांत दोघे वीर भारी ॥४॥
राजपुत्र तपोनिधि ब्रह्मचारी । योगी पांघरले चीर ॥५॥
कुंभकर्ण इंद्रजित मारितील । तेव्हां नयना येईल चीर ॥६॥
पद ५५ वें
वणवण कां रे करितोसि बापा ॥ध्रु०॥
जो करकमळीं धरी शरचापा । तो भज रघुवीर सोलीव चांपा ॥१॥
या विषायांचा वोंगळ वाफा । त्यांत किती तूं पेरिसि पापा ॥२॥
न करी कांहीं व्रततपजापा । येक पुरे तो गुरुनामाछापा ॥३॥
मध्वनाथा धरी अनुतापा । भवजळीं तारी नरदेहतापा ॥४॥
पद ५६ वें
श्रीरामाचें स्वरूप आधीं चिंती । तेणेंकरुनी कामादिक वैरी जिंती ॥ हेंचि पुण्य कामासी येईल अंतीं । हाच पूर्वीं उपाय केला संतीं ॥१॥
ऐकें ऐकें सावध हरिकथा । वय जाऊं देऊं नको वृथा ॥ येणें तुझी हरेल भववेथा । क्षणभरी आठवी रघुनाथा ॥२॥
गर्भवासीं सोशिले बहु क्लेश । विषयांमध्यें कैंचा तो सौख्यालेश ॥ मूढा करितों उपदेश । मध्वनाथां न सोडी जगदीश ॥३॥
पद ५७ वें
श्रीरामाचें स्वरूप आधीं चिंती । तेनेंकरुनी कामादिक वैरी जिंती ॥ हेंचि पुण्य कामासी येईल अंतीं । हाच पूर्वीं उपाय केला संतीं ॥१॥
ऐकें ऐकें सावध हरिकथा । वय जाऊं देऊं नको वृथा ॥ येणें तुझी हरेल भववेथा । क्षणभरी आठवी रघुनाथा ॥२॥
गर्भवासीं सोशिलें बहु क्लेश । विषयांमध्यें कैंचा तो सौख्यलेश ॥ मूढा तुज करितों उपदेश । मध्वनाथा न सोडी जगदीश ॥३॥
पद ५८ वें
करो मन राघोजीसे प्रीत ॥ध्रु०॥
तात मात सुत बंधु वनिता । इनकी उलटी रीत ॥१॥
जो कोई आपनो आपनो गरजी । कोन कोईको मीत ॥२॥
कहत माधोनाथ गुसाई । करले आपनो हीत ॥३॥
पद ५९ वें
रामाचें करूं ध्यान । मनामध्यें रामाचें करूं ध्यान ॥ध्रु०॥
मानसपूजा ऐसी आहे तीचें हेंच विधान ॥ रम्य अयोध्यानगरीमध्यें पुष्पक दिव्य विमान ॥१॥
नंदनवन उपमेस न राजे कामाचा अपमान ॥ मंद सुगंध सुशीतळ निववी शरयूचा पवमान ॥२॥
कर्पूराचे दीपक जळती वरता श्वेत वितान ॥ सिंहासनी रघुवीर विराजे दाशरथे भगवान् ॥३॥
चंदनचर्चित नील कलेवर पीतांबर परिधान ॥ मुगुट मनोहर कवच धनुर्धर तरकसी कांचनबाण ॥४॥
श्रीवनमाळेवरते मधुकर कवच धनुर्धर ॥ कविगुरुंमध्यें मंगळ तैसे कुंडलमंडिते कान ॥५॥
प्रसन्न देखुनि राममुखाला हिमकर जाला म्लान ॥ रघुनाथाची शोभा विलसे दिनकरकोतिसमान ॥६॥
भरत सुलक्षण सानुज लक्षण जानकिचें सन्निधान ॥ छत्रें चामरें मेघडमरें मोर्छल सूर्यापान ॥७॥
सुग्रीवादिक सेवक उभे सन्मुख तो हनुमान ॥ ज्याचें दर्शन होतां नाहें मुक्तिस तें अनुमान ॥८॥
धन्य वसिष्ठ पुरोहित ज्याचा तो यजमान । कांचनपात्रीं वाढि अरुंधती सुंदर तें परमान्न ॥९॥
सुरवर किन्नर आळविती स्वर दाविति तालज्ञान ॥ तुम्ग मृदंगध्वनि मृदुमंजुळ रंजवि पंचम मान ॥१०॥
राजांगणीं करी कीर्तन नारद वाल्मिक दे अवधान ॥ शुकसनकादिक सादर करिती रामकथारसपान ॥११॥
रघुपति विष्णुदासालागीं देत असे वरदान ॥ रामउपासक राजद्वारीं पावति ते सन्मान ॥१२॥
मंगल आरति करिती त्याचा देवाला अभिमान ॥ घणघण घंटा त्या बरवंटा गाजत भेरी निषाण ॥१३॥
जयकारें गर्जती वानर नाचत जांबवान ॥ अबीरगुलालें पालटवीला गगनाचा तो वान ॥१४॥
वाजंत्र्यासम दुंदुभि वाजती मांगल्याचें निदान ॥ नाम स्मरतां कळिकाळानें खालीं केली मान ॥१५॥
विश्वेश्वर निजहृदयीं जपतो रामाचें अभिधान ॥ अंतकाळीं उपदेशी तो तारक मंत्र प्रधान ॥१६॥
रामार्चनविधिपद्धति पाहुनि केलें म्यां व्याख्यान ॥ मध्वमुनीश्वर म्हणतो माझा सद्गुरु सौख्यनिधान ॥१७॥
पद ६० वें
कोदंडपाणि लवकरि येई ॥ध्रु०॥
तळमळ करितो जीव तुझ्या वियोगें । दर्शन देउन मजला सद्गति देई ॥१॥
अनुदिनें हृदयीं रामा नामासि जपतो । मध्वनाथा आपुले जाणुनी नेई ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2017
TOP