श्रीरामाचीं पदें - पद ९१ ते १००
भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला
अभंग ९१ वा
शुकसरिका डोलती ॥ नाम रामाचें बोलती ॥१॥
त्यांचा न दिसे उद्धार ॥ नामें मुक्तीचा उद्धार ॥२॥
मुक्ति होणें नाहीं नेमें ॥ नामें आळवावें प्रेमें ॥३॥
माझ्या अनुभवा आलें ॥ चित्त नाहीं राम जालें ॥४॥
राम नाम जपे सती ॥ तीसी काय होते गती ॥५॥
तिचा जीव प्राणनाथ ॥ त्याचा धरूनी गेली हात ॥६॥
पाहाती कौतुक जे लोक ॥ तेही करिती तिचा शोक ॥७॥
म्हणती धन्य पतिव्रता ॥ जैसी रामाची जे सीता ॥८॥
त्यासी न येती विमानें ॥ गेलें नामाचें महिमान ॥९॥
उत्तरेचा जो प्रणाम ॥ त्यासी म्हणती रामराम ॥१०॥
तेही कांहो नुद्धरती ॥ सांगा खरें रघुपती ॥११॥
मध्वनाथ म्हणे रामा ॥ तुझ्या स्मरेना मी नामा ॥१२॥
अभंग ९२ वा
तुम्हीं उद्धरिला गांव ॥ मुक्तत्रिभुवन नांव ॥१॥
हाही अनर्थ आघवा ॥ कळूं आला जी राघवा ॥२॥
नामें तारिली गणिका ॥ गोष्टी सांगाव्या आणिका ॥३॥
अजामेळ पुत्रनांवें ॥ स्मरतां वैकुंठासी जावें ॥४॥
याही गोष्टीचें हीनत्व ॥ गेलें नामाचें महत्त्व ॥५॥
येक नांव दोघांजणा ॥ पाचारितां तर्के शहाणा ॥६॥
हें तों तुम्हांसी कळेना ॥ बुद्धियोगासी मिळेना ॥७॥
स्मरतां वज्री रवि फणी ॥ धाऊनि यावें तिघांजणीं ॥८॥
हें तों न पडे उचितांत ॥ गोष्टी समजावी चित्तांत ॥९॥
आम्ही जाणुनी म्हणतों ॥ भवचक्रांत शीणतों ॥१०॥
ऐसें तुम्हां न पाहिजे ॥ धरुनि अबोला राहिजे ॥११॥
परिसा देवाजी सर्वज्ञा ॥ येईल घडोनी अवज्ञा ॥१२॥
जीवेंभावें जगन्नाथा ॥ द्यावें अज्ञान माझ्या माथां ॥१३॥
तुम्हीं नामरूपातीत ॥ तेथें कैचें जी पतीत ॥१४॥
मध्वनाथा नलगे मुक्ति ॥ द्यावी सद्गुरुची भक्ति ॥१५॥
अभंग ९३ वा
चित्रकार लिहितो चित्रें । नाना अवतार चरित्रें ॥१॥
त्यासि कांहो नव्हे गति । सत्य सांगा रघुपति ॥२॥
स्मरण मानसाचा धर्म । चितार्याचें शुद्ध कर्म ॥३॥
नामस्मरण ऐलिकडे । सोपें सुगम पक्षी पढे ॥४॥
आम्ही करितों वर्णोच्चार । नेणों प्रेमाचा विचार ॥५॥
नामस्मरणाची किल्ली । नाहीं माझ्या हातीं आली ॥६॥
नुघडे मुक्तीचें कवाड । फिरतों मायेच्या पडद्याघाड ॥७॥
मध्वनाथ म्हणे देवा । न कळे प्राक्तनाचा ठेवा ॥८॥
अभंग ९४ वा
अनंत पातकी मोडुनि घडिले । बाहेर दवडिलों प्रायश्चित्तीं ॥१॥
माझ्या पदरीं पुण्य असतें उत्तम । तरि मी तुझें नाम आठवितों ॥२॥
रामनामीं रत तो नर विरक्त । म्हणती जीवन्मुक्त संत त्यासी ॥३॥
नामासि विन्मुख तो महापातकी । विश्वासघातकी अमंगळ ॥४॥
माझ्या पातकाचा मातंगसंभार । करूं त्याचा संहार नामसिंह ॥५॥
मदोन्मत्त गज वैरिया पाचारी । मग काय संहारी सिंह त्यासी ॥६॥
जो ज्या स्वभाव तो नव्हे अन्यथा । गुरुमुखें मध्वनाथा कळलें ऐसें ॥७॥
अभंग ९५ वा
नाममहिमा लटिका म्हणे । त्याच्या पूर्वजांसी उणें ॥१॥
जेथें उच्चारिती नाम । तेथें प्रगटे श्रीराम ॥२॥
धन्य धन्य साधु संत । ज्यांसी भेटे भगवंत ॥३॥
नामासरसीं वाजे टाळी । होते पातकांची होळी ॥४॥
एका पायाळाच्या गुणें । दिसतीं पाताळींचीं धनें ॥५॥
तैसें सद्गुरुच्या संगें । निवतीं साधकांचीं अंगें ॥६॥
नाथ म्हणें अनुतपें । नाम स्मरतां जातीं पापें ॥७॥
अभंग ९६ वा
दाता सकळांचा म्हणवितो आपणां । सदावर्ती जाणा दुकळांत ॥१॥
दारापासी नाहीं कोणासी आडकाठी । आपल्या हातें वांटी अन्नोदक ॥२॥
तेथें येक आलें भुकेलें भिकारी । अधीर हांका मारी पोटासाठीं ॥३॥
सांडून सर्व काम आधीं द्यावें त्यासी । दीन उपवासी चरफडी तें ॥४॥
न देतां तयासे करील अमर्यादा । धाल्या स्तुतिवादा करील ते ॥५॥
मध्वनाथ म्हणे हेचि माझी दशा । तुम्हांसी जगदीशा कळों द्यावी ॥६॥
अभंग ९७ वा
जरी महापुरीं बुडतां चांडाळ । देखुनि दयाळ उडी घाली ॥१॥
लाउनियां कासें देउनियां धीरा । नेतो पलतीरा दीनबंधु ॥२॥
तैसें तुझें नाम तारक उदार । तरी माझा उद्धार करूं देवा ॥३॥
परि मी तयाचें करीना स्मरण । आलिया मरण एक वेळे ॥४॥
मध्वनाथ धरुनिया माझ्या कंठा । मज ने वैकुंठा बलात्कारें ॥५॥
पद ९८ वें
रामउपासक धन्य सजणी रामउपासक धन्य ॥ध्रु०॥
पुनरपि जननीजठरीं रिघे ना । प्राशन न करी स्तन्य ॥१॥
तन मन धन जन तृणवत मानी । शरण गुरूसि अनन्य ॥२॥
नाम जपे निज पुण्यतपें करि । मारि यमाचें सैन्य ॥३॥
ऐशा नराच्या दर्शनमात्रें । गेलें दिगंता दैन्य ॥४॥
मध्वमुनीश्वर म्हणतो त्याचें । काय वदों सौजन्य ॥५॥
पद ९९ वें
पहा रे जन हो रमणीय रूप रामाचें ॥ध्रु०॥
दुस्तर तरले प्रस्तर भारी । सामर्थ्य हें नामाचें ॥१॥
किंकर होउनि शंकर जपतो । निःकामाच्या कामाचें ॥२॥
नारद तुंबर सादर गाती । कीर्तनछंद सामाचें ॥३॥
मध्वमुनीश्वर पूजुनि मागे । दास्य मेघश्यामाचें ॥४॥
पद १०० वें
जन मूढ तूं भज राम रे ॥ मानवी तनु पावलासि विमळ हे अभिराम रे ॥ध्रु०॥
नयन झांकुनी काय घोरसी स्मरुनी कामिनीकाम ॥ उठुनी सत्वर होईं सावध विझवी जळतें धाम रे ॥१॥
जप सदा रघुनाथजीचें पतितपावन नाम ॥ सगुण सुंदर मध्वनाथा ध्याई जळधरश्याम रे ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2017
TOP