मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पद ६१ ते ७०

श्रीरामाचीं पदें - पद ६१ ते ७०

भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला


अभंग ६१ वा
देवा आदि देवा लक्ष्मीनारायणा ॥ परिसे क्रियाहीना वचन माझें ॥१॥
कोणें देवें तुला दिली द्वैतौद्धि ॥ जीवशिवउपाधी वाढविली ॥२॥
उपाधीच्या योगें सळिसी तूं आम्हां ॥ बरें सर्वोत्तमा आरंभिलें ॥३॥
तुम्ही आम्ही पूर्वीं होतों जे एकत्र ॥ मध्यें हें चरित्र रचिलें कां ॥४॥
समर्थाचीं बाळें लाविलीं भिकेसी ॥ बरवें हृषिकेशी नांव केलें ॥५॥
अक्षई आमुचें बुडलें ठेवणें ॥ आम्हांसी मीपणें भुलवुनी ॥६॥
ब्रह्मारण्यामध्यें भुरलें घाली मैंद ॥ तैसा तूं गोविंद भेटकासी ॥७॥
मध्वनाथ म्हणे घेई माझा जीव ॥ तुज काय कींव भाकूं आतां ॥८॥

अभंग ६२ वा
कांरे मजसी तां धरिला अबोला ॥ मैंदा बाहेर भोळा दिसतोसी ॥१॥
ऐसा काय माझा आहे अपराध ॥ सांगे निर्विवाद विचारूनि ॥२॥
सत्यवादी तुझा पिता दशरथ ॥ तयाची शपथ घातली हे ॥३॥
मनामध्यें कांहीं धरूं नको गूढ ॥ रुसले जडमूढ समजवावें ॥४॥
रीण वैर हत्या न सुटे कांहीं केल्या ॥ सळिती जिता मेल्या बहुतांसी ॥५॥
थोद्या बहुतानें आम्हांसी संतोष ॥ करितों कंठशोष द्वारापुढें ॥६॥
जळो कळंतर आग लागो आतां ॥ मुद्दल येवो हातां येकदाचें ॥७॥
मध्वनाथ म्हणे लौकिक न करी ॥ उमज श्रीहरी घरामध्यें ॥८॥

अभंग ६३ वा
दीनबंधु तुझें नाम दयानिधि ॥ बिरुदें व्यर्थ पदीं वागविसी ॥१॥
अनाथाचा नाथ पतितपावन ॥ हें करी जतन नांव आधीं ॥२॥
समर्थासी लाज आपुल्या नांवाची ॥ नांवासाठीं वेंची सर्वस्वही ॥३॥
कोटिध्वजाचिये घरीं कय उणें ॥ सदावर्तीं दुणें पुण्य जोडी ॥४॥
समर्थाच्या नांवें तरती पाषाण ॥ प्रत्यक्ष पुराणें गाही देती ॥५॥
चोरटा चांडाळ गणिका अजामेळ ॥ नांवेंचि केवळ मुक्त केलीं ॥६॥
काशीविश्वेश्वर सांगती नेटकें ॥ तें तुवां लटिकें आरंभिलेम ॥७॥
मध्वनाथ म्हणे कलिचा महिमा ॥ उरली नाहीं सीमा बोलायाची ॥८॥

अभंग ६४ वा
येवढा कांरे माझा तुझा वैराकार ॥ मारेकरी फार घातले तां ॥१॥
वाघाचे जाळींत बांधुनिया गाय ॥ पाहातोसी काय कृपावंता ॥२॥
लांडग्यासी तान्हें वांसरूं निरवीलें ॥ पारणें करविलें त्याचे हातीं ॥३॥
हिंसकासी दिल्ही पोसणितां सेळी ॥ त्यानें पुरती केली गती तीची ॥४॥
जीवनावेगळा तळमळी मेन ॥ बगळ्याआधीन केला जैसा ॥५॥
मांजराच्यापुढें टाकुनी मूषक ॥ पाहसी कौतुक दुरूनियां ॥६॥
पहिल्यापासुन तुझा स्वभाव निश्चळ ॥ परदुःख शीतळ भाग्यवंता ॥७॥
मध्वनाथ म्हणे न कले तुझी माव । विउनी खाते लांव लेकुरांसी ॥८॥

अभंग ६५ वा
मागें चाळविले बाळेभोळे लोक । तैसा मी सेवक नव्हे तुझा ॥१॥
तुझीं वर्में कर्में आहेत मज ठावीं । ते तां आठवावीं रामचंद्रा ॥२॥
दाशरथि राम म्हणविसे नेटका । मारिली ताटिका बायको ते ॥३॥
सुबाहू मारूनि यज्ञ सिद्धि नेला । पुढें घात केला मारीचातें ॥४॥
गौतमाच्या रांगें निजली होती शीळा । पाय लाउनी तिला जागें केलें ॥५॥
विश्वामित्राचें तां म्हणविलें शिष्य । मोडिलें धनुष्य जुनाट तें ॥६॥
काकतालन्यायें मेळविली सीता । प्रणिली दुहिता विदेहाची ॥७॥
मध्वनाथ म्हणे आलें होतें झट । परसरामभट दबावीलें ॥८॥

अभंग ६६ वा
रामराज्य व्हावें कौसल्या नवसी । उठविली विवसी घरामध्यें ॥१॥
कांहीं केल्या तुझें राज्य नये योगा । तूंही काय भोगा करिसील ॥२॥
कैकयीनें राज्य घेतलें हिरूनी । पडली फिरूनि अवघी तुज ॥३॥
मायबापीं तुला घातलें बाहेरी । तधींचा श्रीहरि नव्हेसी तूं ॥४॥
समागमें होता सेवक लक्ष्मण । त्यानें संरक्षण केलें तुझें ॥५॥
जानकीं घेऊनि गोसावी झालासी । परदेशीं आलासी गंगातीरा ॥६॥
ग्म्गातीरीं होता गूहक माझा गडी । त्यानें पैलथडीं पावविलें ॥७॥
मध्वनाथ म्हणे उगा राहे चप । मारूं नको गप मजपुढें ॥८॥

अभंग ६७ वा
मागें दशरथा दिल्हें बहु दुःख ॥ परतुन त्याचें मुख न पाहिलें ॥१॥
चित्रकुटीं त्याचा ऐकुन समाचार ॥ वनामध्यें फार शोक केला ॥२॥
कंदें मुळें फळें आणुन गोमटीं ॥ केलें गंगातटीं पिंडदान ॥३॥
जिवंत असतां नाहीं दिल्ही भेटी ॥ मेल्या पूर लोटी आसुवांचे ॥४॥
समजावया आले भरत भावंड ॥ तेथेंचि फावंड रचिलें तां ॥५॥
शत्रुघ्नासहित केलें वेडें पिसें ॥ त्यासी चौदा वर्षें भांबाविलें ॥६॥
डोईवरी हात ठेउनि गेले गांवा ॥ रडे जेव्हां तेव्हा नंदिग्रामीं ॥७॥
मध्वनाथ ह्मणे मनामधें कुडें ॥ तुझें तुजपुढें निवेदितों ॥८॥

अभंग ६८ वा
भरतासि केली अयोध्या पारखी ॥ होणारासारखी बुद्धि तुझी ॥१॥
सुमित्रेसहित रडविली माय ॥ मोकलित धाय घरा गेली ॥२॥
कांहीं केल्या तुझें द्रवेना तें मन ॥ अयोध्येचे जन रडविले ॥३॥
माय बाप सखा बंधु सहोदर ॥ त्यासि टाकुन दूर गेलासी तूं ॥४॥
जनस्थानीं दिव्य पाहून पंचवटी ॥ तेथें पर्णकुटी बांधिली तां ॥५॥
जानकीच्या बोलें धाउन मृगापाठीं ॥ वेड्या थोड्यासाठीं नाश केला ॥६॥
आपली ते हाणी जगाची मरमर ॥ आश्रमीं तस्कर संचरला ॥७॥
मध्वनाथ म्हणे भूमीचें ठेवणें ॥ तें नेलें रावणें उचलूनी ॥८॥

अभंग ६९ वा
ठेवण्याच्यामुळें बहुतांचा नाश ॥ रोकडी निरास झाली तुझी ॥१॥
पूर्वीं आम्हांसि तां केलें होतें कष्टी ॥ त्याचें फळ दृष्टि देखियलें ॥२॥
कांरे जटायूचे उपडविले पंख ॥ त्याची केली राख आपल्या हातें ॥३॥
अंजनीचें वज्रफळ जगजेठी ॥ त्यानें केली हेटी सुग्रीवाची ॥४॥
सुग्रीवाचा भाऊ मारियला बाणें ॥ तुहें काय त्यानें केलें होतें ॥५॥
येकाची वनिता घालिसी येकापुढें ॥ हेंही तुझें कुडें जाणतों मी ॥६॥
आपल्या कामासाठीं करसी मनधरणी ॥ सत्वर तरुणी भेटवावी ॥७॥
मध्वनाथ म्हणे दिससी परमार्थी ॥ आहेसि कार्यार्थी गोडबोल्या ॥८॥

अभंग ७० वा
गोड बोलुनियां घ्यावें त्याचें काज ॥ रीसाहातीं माज बांधविला ॥१॥
वान्नरांचे शिरीं वाहविले दगड ॥ केला तो अवघड शिळासेतु ॥२॥
बिभीषण न येतां शरण ॥ रावणाचें मरणें कळतें कैसें ॥३॥
नाहीं तरी तुझ्या देवासी अटक ॥ लंकेचें कटक ऐसें होतें ॥४॥
अष्टदश पद्में होमिलीं दुर्बळ । बंधुचीही बळ दिल्ही होती ॥५॥
काय मारुतीचा होसील उतराई ॥ त्यानें तुहा भाई उठविला ॥६॥
रावण मारुनि विजयी झालासी ॥ वांचुनी आलासि आमुच्या भाग्यें ॥७॥
मध्वनाथ म्हणे विचारी तूं आज ॥ केलें रामराज्य भक्तजनीं ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP