स्फुट पदें - पदे १२१ ते १३०
मध्वमुनीश्वरांची कविता
अभंग १२१ वा
जैसें सुवर्णाचे असती अलंकार । पितळ्याचे प्रकार करिती तैसे ॥१॥
वजनीं उतरती मोलानें अधिक । घेती गिर्हाईक पारखूनि ॥२॥
ताई घाई कसीं उतरे जें बरें । म्हणती त्यासि खरे पंधरें तें ॥३॥
मध्वनाथ म्हणे पितळ्याचा कलंक । काढिल्या कनक तेंचि होतें ॥४॥
अभंग १२२ वा
कागदाचीं करिती चतुर फुलझाडें । भ्रमर तयांकडे न पाहती ॥१॥
चित्रकार लिही अवतारचरित्र । परि नव्हे पवित्र चित्त त्याचें ॥२॥
जोहरी विकीती शाळीग्राममूर्ति । आपली उदरमूर्ति करावया ॥३॥
महाभारताच्या करूनि चित्रकथा । मिरविती सर्वथा हरिदास ॥४॥
तैसें कवित्वाचें भरितां काबाड । लटिकें बा हाड धातुविद्या ॥५॥
मध्वनाथ म्हणे परिसाची परीक्षा । पालटवी दीक्षा लोखंडाची ॥६॥
अभंग १२३ वा
देखोदेखीं लोक करिती कवित्व । परि नये महत्त्व महंतांचें ॥१॥
तिथें पुण्य जाय आंगीं जोडे पाप । अंतरीं संताप होय तेणें ॥२॥
विष्णुपदाची त्या करितां नक्कल । हांसती पूर्वज सकळ ते ॥३॥
तेथें पिंडदान केल्या कोण फळ । म्हणती गयावळ अवघें व्यर्थ ॥४॥
मध्वनाथ शरण विष्णुपदा गेला । अक्षई तो केला गदाधर ॥५॥
अभंग १२४ वा
देवाच्या प्रतिमा वोतिती वोतारी । तेणें काय तारी देव त्यांसि ॥१॥
तैसे कवित्वाचे रचितां प्रबंध । न तुटती बंध संसाराचे ॥२॥
शृंगारिक प्रवीण विषयीं रसिक । नटवे आवश्यक मानिताती ॥३॥
मध्वनाथ म्हणे वागेसरीपुढें । सोनें बरवें कुडें निवडतें ॥४॥
अभंग १२५ वा
पिंपळाचा पार हिंसकाचे द्वारीं । तेथें सोमवारीं जाऊं नये ॥१॥
अंत्यजाचा जेथें पाणवथा जाणा । तेथें गंगास्नाना जाऊं नये ॥२॥
श्वानाचे अस्थीचें जालें चक्रांकित । शाळीग्रामासहित पूजूं नये ॥३॥
अमंगळ स्थळीं तुळसीचें झाड । नाहीं त्याची चाड वैष्णवांसी ॥४॥
तैसे हीन जाति वदती ब्रह्मज्ञान । शास्त्रज्ञांसमान मानूं नये ॥५॥
गुडगुडीचें पाणी नव्हे मंदाकिनी । जरि मेरुवरूनि उतरलें ॥६॥
अपवित्र गांजातंबाखूचा धूम । धूपारतीसम लेखूं नये ॥७॥
मध्वनाथ म्हणे तोहि चंद्रमौळी । त्यास पुष्पांजुळी कोण वाहे ॥८॥
अभंग १२६ वा
कोळसा म्हणे मी कोकिळासारिखा । वसंतीं पारखा कंठ माझा ॥१॥
बेटकुळी म्हणे मी गर्व्हार सुंदरी । मुख्य मंडोदरी सवत माझी ॥२॥
ऐरावतासम म्हणेल कोण गा । पोसला टोणगा उदंडचि ॥३॥
तयाच्याहि माथां देखोनिया चांद । चकोरा आनंद होईल काय ॥४॥
मध्वनाथ म्हणे तोहि चंद्रमौळी । त्यास पुष्पांजुळी कोण वाहे ॥५॥
अभंग १२७ वा
सांडुनि मच्छरा मदास । तोचि स्वच्छ रामदास ॥१॥
हनुमंतासि आश्चर्य । ऐसें ज्याचें ब्रह्मचर्य ॥२॥
जिंकी मनाची उर्मी जी । तेंच पागोटें हुर्मुंजी ॥३॥
उपडुनि लाजेची मेखला । ल्याला शांतीची मेखला ॥४॥
हातीं वैराग्याची छडी । कामक्रोधादिकां छडी ॥५॥
संतांघरीं भिक्षा मागे । ऋद्धीसिद्धी लागती मागें ॥६॥
जवळी कामधेनु माय । जिच्या पोटांत सर्व माय ॥७॥
संत सनकादिक जेविं । तेविं ब्रह्मारण्यीं जेवी ॥८॥
जें जें सांगितलें ग्रंथीं । तोचि अर्थ बांधी ग्रंथीं ॥९॥
करी श्रीरामनवमी । म्हणे श्रीराम नवमीं ॥१०॥
गुरुदर्शनीं पुण्यतिथी । मध्वनाथ पूजी अतिथी ॥११॥
अभंग १२८ वा
हिरव्या घागरीचें पाणी । पाझरत होते हानी ॥१॥
तैसे नरदेहीं आयुष्य । जातें नमुजे मनुष्य ॥२॥
जळीं पडला लवणरवा । हातां न ये जेंवि बरवा ॥३॥
चोरा धावत्या पाउलीं । सूळ येतसे जवळीं ॥४॥
दुष्ट हिंसक कान सेळी । धरुनि मारावया नेली ॥५॥
तर्ही मे मे मे मे करी । गळा दाटिल्याही सुरी ॥६॥
जन नमुजे जाल्यां घात । म्हणे साधक मध्वनाथ ॥७॥
अभंग १२९ वा
कडू भोपळ्याची खीर । त्यांत घातल्या साकर ॥१॥
तर्ही न लागे जी गोड । न पुरे रसनेचें कोड ॥२॥
तैसें संसाराचें दुःख । मेळविल्या विषयसुख ॥३॥
तर्ही विश्रांती वाटेना । भवभ्रांति पालटेना ॥४॥
जैसी बचनागाची कांडी । गोड गुळचट लागे तोंडीं ॥५॥
परिणामीं प्राणघात । म्हणे साधक मध्वनाथ ॥६॥
पद १३० वें
अरिषडवर्गीं जिंकिलें काय सांगूं । आतां कैसा परमार्थरंगीं रंगूं ॥१॥
माझ्या मजला नावरती षडही उर्मी । हरिजागरणीं येते घुर्मी ॥२॥
निस्पृह म्हणतां वाटतें कानकोंडें । विषयतृष्णासर्पिण डंखी तोंडें ॥३॥
लौकिकलज्जा रक्षुनि काळ कंठी । हुतुतु घाली प्रपंचवाळवंटीं ॥४॥
मध्वनाथ सांगे रे सद्गुरुराया । कैसी तुझी निस्तरूं दुस्तर माया ॥५।
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017
TOP