श्रीकृष्णाचीं पदें - पदे १ ते १०
मध्वमुनीश्वरांची कविता
पद १ लें
आनंद जाला । देवकीउदरा देवचि आला गे ॥१॥
हरि खेलीं मायबापें ठाईंच्या ठाईं करपलीं महापापें ॥२॥
वर्षती सुर सुमनें । योगीश्वर हर्षती सुरसुमनें ॥३॥
नारद तुंबर गे । जयजयकारें नाचति सुंदर गे ॥४॥
दुंदुभि वाजविती । मध्वनाथा देव नवाजविती ॥५॥
पद २ रें
घेउनि पंजकनयना । दशशतफणिवरशयना ॥ जातो व्रजपती अयना । इतरांचें मज भय ना ॥१॥
माया तूं माझी यमुना । तव पदीं वाहिन सुमनां ॥ होउनि स्वानंद भरिता । द्विधा जाली सरिता ॥२॥
मध्वमुनीश्वर संगीं । असतां राखे प्रसंगीं ॥ म्हणोनि अंतरंगीं । भाव धरा श्रीरंगीं ॥३॥
पद ३ रें
धन्य ते गोकुळ धन्य ते मथुरा । धन्य यशोदादेवी चतुरा ॥ध्रु०॥
नंदाघरीं अवतरला कान्हा । द्वारीं वाद्यें वाजती नाना । गर्जती घंटा जगट झणाणा ॥ गंधर्व गाती करिती तनाना ॥१॥
गौरवी गोपति दीना दरिद्रा गोवळ सिंपिती दधी हरिद्रा । अभ्यंग करूनी लाउनि मुद्रा । पाहती परमानंदसमुद्रा ॥२॥
पूजुनि ब्राह्मण त्या नंदानें । दानें दिधलीं आनंदानें । गौळणी घेती देती मानें । वाटिती साकर फिकलीं पानें ॥३॥
साधक सांडुनि देती भुक्ती । परिसती गोपिकांच्या उक्ती । तार्किकांच्या न चलती युक्ती । नाम स्मरतां चार्ही मुक्ती ॥४॥
गोकुळगांवीं प्रगटली कमळा । दिनमणितनया वाहे विमळा । कुंजवनीं मधु मन्मथ जमला । मध्वमुनीश्वर ज्या स्थळीं रमला ॥५॥
पद ४ थें
पाहुं दे वो बाई तुझा कान्हा ॥ध्रु०॥
उपजला मज स्नेहो । पायरव यासी न हो । न धरत आला पयपान्हा ॥१॥
यासी झणिं लागो दिठी । नामरूपीं पडो मिठी । गुणवंत आहे भला तान्हा ॥२॥
सांवळें हें जावळाचें । बाळ बहू नवसाचें । यासि परब्रह्म ऐसें माना ॥३॥
आंगीं शोभें आंगलें वो । माथां कुंची चांगलें वो । मध्वनाथ आणी यासी ध्याना ॥४॥
पद ५ वें
तूं नंदगोपा संसारीं धन्य धन्य रे ॥ध्रु०॥
त्रिभुवनीं तूंचि श्लाघ्य । उदित तुझेंचि भाग्य ॥ गेलें दिगंता दुःखदैन्य रे ॥१॥
स्मरणें तुझ्या बापा । ठाव नुरेचि पापा ॥ धाकें निमालें दैत्यसैन्य रे ॥२॥
यशोदेसी मायबाई । म्हणतो क्षीराब्धिशायी ॥ त्यासी पाजी निज स्तन्य रे ॥३॥
मध्वनाथा आळवितें । वोसंगा खेळवितें ॥ काय वर्णूं मी तिचें पुण्य रे ॥४॥
पद ६ वें
पावन गुणगण हरिचे गाई रे ॥ध्रु०॥
हलधर गिरिधर गोकुळीं जाले । बाळक नंदाघरिंचे ॥१॥
उद्धरिले हरिनें पशुपक्षी । तरुवर यमुनातीरिंचे ॥२॥
मध्वमुनीश्वर म्हणतो मनुजा । वर्णि तूं नाना परिचें ॥३॥
पद ७ वें
ब्रह्मसनातन ब्रह्मसनातन ब्रह्मसनातन शौरी ॥ध्रु०॥
जाईल तो दुरि म्हणोनि यशोदा । पायांसि बांधिते दोरी ॥१॥
निर्गुण व्यापक नित्यमुक्त मूर्ति । पाहाते गोरीमोरी ॥२॥
स्वयंतृप्त जरि म्हणवितो तर्ही । करितो गोरस चोरी ॥३॥
स्वनन्द ईश्वर अवाप्तकाम तो । चाळवी गौळ्यांच्या पोरी ॥४॥
नित्य सदोदित नाम रूपातीत । आवडे राधा गोरी ॥५॥
मध्वमुनीश्वर दिसतो लहान । कोण जाणे त्याची थोरी ॥६॥
पद ८ वें
नंदनंदन गोविंदा । दावी तव पदअरविंदा । मानस मधुकर मकरंदा । सेविल सुखकर मुकुंदा ॥१॥
मारिसी माउसी विवसीला । अधरीं धरिसी वंसीला । पावन जाणुनि कुळशीला । भावें भुलली तुळशीला ॥२॥
कुंजवनीं श्रीगोपाळा । देखुनी कदंब झोपाला । तेथें बांधुनी चौपाळा झुलविती गोपी कृपाळा ॥३॥
हरिसी संचित गोरसा । हरि तूं न दिससी चोरसा । गोपीस त्राससी किशोरसा । मध्वमुनीश्वर थोरसा ॥४॥
पद ९ वें
सोडी तूं सावळ्या मैंदा । जनमनमोहना राजीवनयना नंदा रे ॥ध्रु०॥
अलगटा गोवळा बाल मुकुंदा । नेणें कंदुक मी गोविंदा रे ॥१॥
निर्दय माझ्या सासानणदा । देरभावे करिती निंदा रे ॥२॥
बाहेरख्याली हा वोंगळ धंदा । मी त्या जाउनि सांगतें नंदा रे ॥३॥
कांरे दाटुनी भोगिली वृंदा । कोण दंडील पैं तुज लौंदा रे ॥४॥
मध्वमुनीश्वर सच्चिदानंदा । तुझ्या वंदितें चरणारविंदा रे ॥५॥
पद १० वें
हाले किसना सावल्या । ताक पीला बावल्या ॥ वेले वेले चाल कलिसी का ले वाकुलपावल्या ॥१॥
आम्ही काली बलवंता । काले वोल्हिसी पलवंता ॥ देखल सासू कपाल फोलिल हातीं घेउनि बलवंता ॥२॥
आंत बाहेल हिलवा तूं । दिससी बीदमिलवा तूं ॥ गोल्या भुलक्या पोली भुलविसी आहेस भोंदू बलवा तूं ॥३॥
बोले खोबलें खालका । म्हणसी आम्हां फाल खा ॥ मध्वमुनीश्वर गलजू होसी बिजवल नवल्यासारखा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 27, 2017
TOP