मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ९१ ते १००

स्फुट पदें - पदे ९१ ते १००

मध्वमुनीश्वरांची कविता


अभंग ९१ वा
सविकार ज्याची दृष्टी । त्यासि भासे द्वैतसृष्टी ॥१॥
ते काय होय जी प्रमाण । येक असतां दिसतें आन ॥२॥
येक्या वल्लभाच्या ठाईं । पतिव्रतेस लाभ काई ॥३॥
दोघे मिळुनि ते येक । डोळे झांकुनि घेती सुख ॥४॥
जेथें जालें साम्य । तेथें कैचें तारतम्य ॥५॥
म्हणे मध्वनाथदेव । द्वैत भ्रांतीचें वैभव ॥६॥

अभंग ९२ वा
आम्ही सर्व कर्मभ्रष्ट । आम्हां दिसतें जें तें नष्ट ॥१॥
आम्ही लटक्याचे साक्षी । आमुची मुद्रा विरूपाक्षी ॥२॥
आत्मस्तुती परनिम्दा । करितां पावतों आनंदा ॥३॥
आधीं करुनि जीवहत्त्या । मग पावलों त्या सत्या ॥४॥
मध्वनाथ पुण्यव्म्त । मान्य करिती अवघे संत ॥५॥

अभंग ९३ वा
द्वैतसिद्धांताची युक्ति । परिसावी जीवन्मुक्तीं ॥१॥
बुद्धिबळाचा तो खेळ । आली जिंकायाची वेळ ॥२॥
प्यादा घोडा उंट हस्ती । काष्ठीं कल्पना ते नुसती ॥३॥
दोही दळांत आगळे । राजा वजीर वेगळे ॥४॥
प्यादा होउनि प्रधान । राहील राजा संन्निधान ॥५॥
सार्वभौमाची विश्रांती । प्यादा पावेना कल्पांतीं ॥६॥
ऐक्यमता जोडुनि हात । केली प्याद्याची ते मात ॥७॥
आदिअंतीं द्वैतसिद्धी । उडविली सोऽहं बुद्धि ॥८॥
मध्वनाथाचा अनुभव । जीव होईना तो शिव ॥९॥

अभंग ९४ वा
श्रावणांत आला पूर । गंगा चालली भरपूर ॥१॥
कांहो तुम्हांसी नावडे । होऊं नका कानवडे ॥२॥
घेउनि संगें आगमासी । पाहूं गेली उगमासी ॥३॥
तेचि पश्चिमवाहिनी । जाली सद्गतिदायिनी ॥४॥
गुरुपुत्रासि आवडे । जीवलग जे साबडे ॥५॥
तैसी माझी द्वैतगंगा । जाउनि अद्वैत्यांसि सांगा ॥६॥
उडती लाटा उफराट्या । तैशा गोष्टी या मठ्या ॥७॥
मध्वनाथ मीनमार्गी । पोहतसे दोही भागीं ॥८॥

पद ९५ वें
आत्माराम मी गगनाचा बाप । माझ्या आंगीं कैचें पुण्यपाप ॥१॥
गुरुरायें केलें भाग्यवान । पूर्णबोधें नेलें जगद्भान ॥२॥
मिथ्या स्वर्गनरकाची वार्ता । माझ्या स्वरूपीं पाहातां परमार्था ॥३॥
मृगजळ उतळ किंवा खोल । सूर्यापुढें बोलणें तें फोल ॥४॥
मध्वनाथासन्मुख सर्वांसम । जाला तेव्हां कोठें अंधतम ॥५॥

पद ९६ वें
चिन्मय येकरसा सहसा न पडे द्वैतठसा ॥ध्रु०॥
सूतचि तें उघडें त्याला म्हणताती लुगडें ॥ मातीविरहित कोण्या सुघडें घडणें ते सुगडें ॥१॥
लाउनि गगनीं सुरंगा सोडुनि आणा सूर्यतुरंगा ॥ पाणी गाळुनि पाजा तरंगा स्मरूनी श्रीरंगा ॥२॥
जैमिनीला दमुनी तार्किक वादाला शमुनी ॥ श्रीशुकयोगींद्राला नमुनी वदतो मध्वमुनी ॥३॥

पद ९७ वें
आवरूनी करणें मी निश्चय हा करणें ॥ध्रु०॥
सद्गुरूच्या स्मरणें निरसा जन्म जरा मरणें ॥ विषयासाठीं व्यर्थचि भ्रमणें विष्णुपदीं रमणें ॥१॥
संशय कां धरणें उठवा ममतेचें धरणें ॥ दुस्तर संसारांबुधि तरणें आपणा उद्धरणें ॥२॥
मानस आवरणें छेदुनि विक्षेपावरणें ॥ मध्वमुनीश्वर वाक्यश्रवणें त्या मुक्ताभरणें ॥३॥

पद ९८ वें
परिसे गिरजे डोळसे । माझे बोल खोलसे ॥ अभाग्याला दिसतें धन । सर्प विंचु कोळसे ॥१॥
नयनीं ल्याला ज्ञानांजन । त्यासी अवघे निरंजन ॥ अज्ञानाला स्वप्नामध्यें । न दिसे जनीजनार्दन ॥२॥
रज्जुवरी जैसा व्याळ । स्वरूपीं तैसें मायाजाळ ॥ जैसीं बाळें गगनावरता घालिती नीलमेचा आळ ॥३॥
शंकर पार्वती संवाद ऐकुनि । तुटला द्वैतवाद ॥ चिन्मयमकरंदाचा । मध्वनाथ जाणे रसास्वाद ॥४॥

पद ९९ वें
तो ज्ञानी न दिसे अभिमानी । सर्वही ब्रह्म मानी परम समाधानी ॥ स्वरूपीं समरस होउनि गेला त्याला कोण वानी ॥१॥
तो साधु न कळे त्याचा शोधू । गेला भेदाभेदू ॥ कोणी वंदो कोणी निंदो अगाध त्याचा बोधू ॥२॥
तो जाणा योगी राजसवाणा । साधकांचा राणा ॥ जीवेंभावें वोवाळावें अपुल्या पंचप्राणा ॥३॥
तो स्वामी त्याचे सेवक आम्ही । तोचि गरुडागामी ॥ नेईल निजसुखधामीं सद्गुरुकृपें मध्वनाथी भासे अंतर्यामीं ॥४॥

अभंग १०० वा
कोठें कांहीं कोठें कांहीं । अवघें कैचें येके ठाईं ॥१॥
जरी सुगंध चंदन । त्यासी भुजंग बंधन ॥२॥
जरी सिंधु रत्नाकर । तर्‍ही त्याचें उदक क्षार ॥३॥
मध्वनाथाचे अंतरीं । येक निर्दोष श्रीहरि ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP