स्फुट पदें - पदे ५१ ते ६०
मध्वमुनीश्वरांची कविता
पद ५१ वें घनाक्षरी ( काव्यपाठकी )
पढोनी छंदोरत्नाकार । जाणे शिखरिणी सधर । मुखरणिचा अधर । चुंबूं लागे नेटका ॥१॥
काव्यपाठक कुशल । मुग्धांगनेसी रुसेल । नृत्यांगनेसी पुसेल । कांहीं देउनी टका ॥२॥
शकुंतला प्रहसन । याचें लागलें व्यसन । नाटकाचें अभ्यासन । करूं जाणे चेटका ॥३॥
इतएं पढुनी चतुर । पंडीत जाला कामातुर । मध्वनाथा आहे दूर । जीवन्मुक्त तोटका ॥४॥
पद ५२ वें घनाक्षरी ( पंडित )
गेला सक्षेपें काशीस । राहोनिया दोन दीस । कांहींयेक वादार्थ दहा वीस । पाठ करुनी निघाला ॥१॥
देशा आलासे पंडीत । गर्वताठा अखंडीत । भाग्यवंतासी धुंडीत । त्याचे घरीं पागिला ॥२॥
करी अर्थाचा अनर्थ । जन्म गमांविला व्यर्थ । आपुल्याहुनी जे समर्थ । छळूं यास लागला ॥३॥
मध्वनाथ म्हणे फार । पंडीत हे अनिवार । आपला पोसितो परिवार । प्रतिग्रहीं चांगला ॥४॥
पद ५३ वें घनाक्षरी ( पुराणीक )
गीता भारत रामायण । केलें त्यांचें पारायण । कळला नाहीं नारायण स्वामी कोण कायसा ॥१॥
अवींस देखुनी कावकाव । तैसा दावी हावभाव। भोगी अमंगळ ठाव । जैसें ध्यान वायसा ॥२॥
चहूं आश्रमा अवतंस । करुनी संसाराचा ध्वंस । ते येक धन्य परमहंस । सेविती जे पायसा ॥३॥
मध्वनाथी प्रमाणीक । श्रीशुकयोगी पुराणीक । वरकड आहेत जे आणीक । त्यांची व्यर्थ वयसा ॥४॥
पद ५४ वें घनाक्षरी ( नैयायिक )
नैयायिकाचा अभिमान । देवाविषयीं अनुमान । ऐसा वादी बैमान । नाहीं दुसरा देखिला ॥१॥
पदार्थाचें विचारण । शोधी घटाचें कारण । अंतर्यामीं नारायण । जैसा तैसा लेखिला ॥२॥
धुरें भरले लोचन । न करी आपलें मोचन । तर्कवादें त्रिलोचन । पर्वतावरी टाकिला ॥३॥
ऐसा पंडीत मशक । कोण मानी आवश्यक । जीवन्मुक्तिविनाशक । मध्वनाथीं ठोकिला ॥४॥
पद ५५ वें घनाक्षरी ( मीमांसक )
कर्मकुशल मीमांसक । स्वर्गांगनाउपासक । साधन संपत्तिनाशक शुद्ध निरीश्वरवादी ॥१॥
आंभोनी ज्योतिष्टोम । ऋत्विज करिताती होम । शेवटीं प्राप्त नाहीं रोम । विधिनिषेध बाधी ॥२॥
देव करिताती विघ्न । यज्ञमार्ग केला भग्न । भवसागरीं निमग्न । जाले आपण अपराधी ॥३॥
त्याचें पाहतांचि मुख । होतें माझ्या मनास दुःख । निवृत्तींत आहे सुख । मध्वनाथ आराधी ॥४॥
पद ५६ वें घनाक्षरी ( वेदांती )
काय पढोनि वेदांत । म्हणे कळला सिद्धांत । केला विषया निभ्रांत । नेणें अद्यापि अर्थ ॥१॥
ऐसा वेदांती अभाग्य । नाहीं विषयीं वैराग्य । देशामध्यें जाला श्लाघ्य । केलें साधन व्यर्थ ॥२॥
कैचा जीवशिवासि भेद । यासी प्रमाण आहे वेद । आपण करितोहे खेद । केवढा पहा अनर्थ ॥३॥
ऐसे वेदांती उदंड । घेऊनि फिरताती दंड । त्यांसी दूषितो अखंड । मध्वनाथ समर्थ ॥४॥
पद ५७ वें घनाक्षरी ( संन्यासी )
काया विटंबुनी व्यर्थ । केवढा केलाहे अनर्थ । स्वामी असोनि समर्थ । न पुसे शोध आपला ॥१॥
घेऊनि दंडकमंडल । भिक्षेसाठींच हिंडेल । भाग्यवंताशीं भांडेल । विषयामध्यें रापला ॥२॥
कैचें इंद्रियां दंडण । वरवर करितो मुंडण । न करी अविद्याखंडन । गृहस्थावरी कोपला ॥३॥
म्हणवी संन्यासी आपण । घेतो लोकांचे अवगुण । मध्वनाथ सांगे खूण । परमहंस लोपला ॥४॥
पद ५८ वें घनाक्षरी ( ज्योतिषी )
पढोनि मुहूर्तचिंतामण । जाला ज्योतिषी ब्राह्मण । सर्वकाळ राशींत मन । पंचांगासी वागवी ॥१॥
जाणे प्राक्तन ग्रहबळ । पुढें वर्णीं वर्षफळ । ऐसा जोशी अनर्गळ । व्यतीपातीं नागवी ॥२॥
देखुनि सभाग्य मनुष्य । त्याचें वर्णितो भविष्य । न कळे आपलें आयुष्य । निपुण ग्रहलाघवी ॥३॥
पाहे गुरुचा अतिचार । आपण करी वेडे चार । मध्वनाथ म्हणे सार । प्रीति नाहीं राघवीं ॥४॥
पद ५९ वें घनाक्षरी ( वैद्य )
पढोनिया वाग्भट । जाला वैद्य हा उद्भट । द्रव्य करुनिया गट । करी पोटाची यात्रा ॥१॥
उगाच पाहातसे हात । म्हणे तुमची जाते धात । कांहीं आहे पित्तवात । नांवें घेतोहे सत्रा ॥२॥
कोण्हा गोक्षुरुचा पाक । कोण्हास चुलीची ते राख । रोग्यापाशीं मारी हांक । ताम्रभस्माची मात्रा ॥३॥
ऐसे वैद्य हे समस्त । जे ते आपल्या ठायीं मस्त । मध्वनाथासी नेमस्त । कोण्ही नेदीचइ मात्रा ॥४॥
पद ६० वें घनाक्षरी
आयका कळयुगींची रीत । अवघें जालें विपरीत । कोठें उरली नाहीं नीत । धर्ममार्ग मोडला ॥१॥
चहूंकडे ब्रह्मज्ञान । कोण्ही न करी संध्यास्नान । मनीं विषयाचें ध्यान । दुर्जनसंग जोडला ॥२॥
जिकडे तिकडे वरपंग । कोठें नाहीं रसर्म्ग । उरला नाहीं संतसंग । वेदवाद उडाला ॥३॥
मध्वनाथ म्हणे लोक । नम विषयासी वोक । अंतीं करील हा शोक । भवपुरीं बुडाला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017
TOP