परिशिष्ट पदे - पदे २१ ते ३०
मध्वमुनीश्वरांची कविता
अभंग २१ वा
विठोबा पाहिला पंढरीचा । विठोबा पाहिला ॥ध्रु०॥
पुंडलीकासाठीं आला भीमातटीं । नंदाचिया घरिंचा ॥१॥
नटवर नागर उभा विटेवर । वागा अवघा जरीचा ॥२॥
जघनीं ठेउनी पाणी कुंडलें तळपती कानीं । मुगुट साजे शिरींचा ॥३॥
धन्य पुंदलीक भक्त अलोलीक । चंद्रभागातीरींचा ॥४॥
युगें अठ्ठावीस न म्हण एयासी बैस । ऋणी जन्मांतरींचा ॥५॥
भवरोग जायासी जनहो भजा यासी । मंत्र धन्वंतरीचा ॥६॥
शांती जया बाणे तयासी हा जाणे । बंधु शाकंबरीचा ॥७॥
नाथ म्हणे परिसा नाहीं कोणी ऐसा । याच्या बराबरीचा ॥८॥
अभंग २२ वा
नर्होबाचे अग्रहार । त्याचा महिमा आहे फार ॥१॥
त्याची बराबरी करी । ऐसा नाहीं भूमीवरी ॥२॥
क्षेत्रवासी अग्निहोत्री । पुण्यवंत कश्यपगोत्री ॥३॥
ज्याचें अंगणीं चिंतामणी । त्याचे वंदूं पायवणी ॥४॥
मध्वनाथासी आसिर्वाद । देती रोकडे प्रसाद ॥५॥
पद २३ वें
तारी स्थावरजंगमा ॥१॥
पूजूं सिद्धेश्वरलिंगा । ज्याच्या मस्तकीं वाहे गंगा ॥२॥
मणिपर्वताचे शिरीं । नांदे राजा नरहरी ॥३॥
कथा करूं महाद्वारीं । नाम गर्जूं जयजयकारीं ॥४॥
मध्वनाथा सेवे उठूं । सुख वैकुंठींचें लुटूं ॥५॥
पद २४ वें
मायबाप हा आमुचा ब्रह्मगिरी ॥ध्रु०॥
तीर्थ त्रिंबकासमान नाहीं मेदिनीवरी ॥१॥
अलाभ लाभ गौतमास मूळ औदुंबरीं ॥२॥
अधोवरा हा तीर्थराज दर्शनेंचि उद्धरी ॥३॥
थिरावली कुश करुनी काय गोदावरी ॥४॥
सभाग्य लोक राहताति धन्य गौतमीतीरीं ॥५॥
मध्वनाथ मुक्ति दे म्हणोनि प्रार्थना करी ॥६॥
पद २५ वें
माझें दैवत ब्रह्मगिरी ॥ध्रु०॥
त्रिभुवनपावन गौतमीचें जळ झुळझुळ वाहे शिरीं ॥१॥
देव त्रिसंध्याक्षेत्रीं द्विजांचें दारिद्र्य दुःख चिरी ॥२॥
पूर्ण करी शिव चूर्ण कलीचें नाहीं तयांत विरी ॥३॥
धनक येथें जाणुनि नांदा जनहो गोदातीरीं ॥४॥
गौतमआश्रमीं मध्वमुनीश्वर वाढितो दिव्य खिरी ॥५॥
पद २६ वें
तो तुम्ही चिंता निशिदिनीं त्रिंबकराज ॥ध्रु०॥
या नरदेहा येऊनि याचें सार्थक करणें आज । गंगाद्वारीं शिवशिव जपतां होईल तुमचें काज ॥१॥
मध्वमुनीश्वर तो उपदेशी सांडिल लौकिक लाज । ब्रह्मगिरीच्या दर्शनमात्रें कलीवर बांधा माज ॥२॥
पद २७ वें
जयजय त्रिंबकराज दयाळा ॥ध्रु०॥
गंगा जटेमध्यें भाळीं सुधाकर नेत्रीं तुतान ज्वाळा ॥१॥
भस्मविलेपन पन्नगभूषण कंठ विषें अतिकाळा ॥२॥
कर्पूरगौर दिगंबर तो वपु शोभवि हातिं त्रिशूळा ॥३॥
डावीकडे रमणीय विलासिनी गिरिराज हिमालयबाला ॥४॥
इंद्र विरंची निरंतर पूजिती बाहुनि पंकजमाळा ॥५॥
मध्वमुनीश्वर वर्णितसे गुण रंजवि शांभवपाळा ॥६॥
पद २८ वें
प्राण्या हरहर बोल तूं महादेव ॥ध्रु०॥
किती फिरसी दारोदार । चुकवी आपुली येरझार । विचारुनी सारासार । चित्त महादेवीं ठेव ॥१॥
वाहे शंभूची कावडी । पुण्य अवघें सावडी । धरी शंकरीं आवडी । धणिवरी स्वानंद तूं जेवी ॥२॥
चैत्रमासीं सिखराचळ । वाहे दवणा गंगाजळ । महायात्रेचें तें फळ । मध्वनाथ म्हणे सेवी ॥३॥
पद २९ वें
हरहर महादेव बोल रे वदनीं ॥ध्रु०॥
हरहर महादेव वदतां तुम्हाला शंभु नेईल अति कैलाससदनीं ॥१॥
श्रीमध्वनाथ सांगे तुम्हाला शंकरभजनीं रगडा कळिकाळ रदनीं ॥२॥
पद ३० वें
हरहरहरहर शंकरा शिवशेखरा देवा कर्पूरगौरा ॥ध्रु०॥
जय जय जय जय त्रिंबक त्रिपुरांतका । त्रिभुवनपाळका ॥१॥
शिवशिव शिवशिव सुंदरा मुखमंदिरा । भक्तजनमंदारा ॥२॥
मध्वनाथ सादर वर्णितो शूलपाणी तो । नात्थध्वना आणितो ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 29, 2017
TOP