स्फुट पदें - पदे ३१ ते ४०
मध्वमुनीश्वरांची कविता
अभंग ३१ वा
सांडुनि बहू मोहरासी । बधले येक रुपयासी ॥१॥
याला न रुचे रमा रामा । ऐसा ब्रह्मगिरीनामा ॥२॥
याला नलगे सोनीरुपी । आवडी माझ्या निजरूपीं ॥३॥
मोठा रागीट शूलपाणी । दृष्टीस केतकीस नाणी ॥४॥
मी तों सुंदर गोरी भुरकी । नांव ठेविलें माझें हरकी ॥५॥
कंठीं बांधून गरसोळी । ल्यालें गुणातीत चोळी ॥६॥
जैसी पडलें याच्या गळां । यानें दिधली चंद्रकळा ॥७॥
ते धरिली मस्तकीं हो । मुद्रा आली हस्तकीं हो ॥८॥
परि शिरीं पाणि वाहे । सुखरूप जाली आहे ॥९॥
गंगावनासहित मूद । वेणी गुंफोन घातली शुद्ध ॥१०॥
मज भुलला शंकर जोगी । माझ्या सर्वांगासी भोगी ॥११॥
हातां आलें निजधन । आतां जालें पंचानन ॥१२॥
मज रिझला चिदंबर । पांघुरविलें व्याघ्रांब ॥१३॥
केले हाडाचे म्यां मणी । तेव्हां रिझला घरधणी ॥१४॥
वरिले जगजनकासी । काय उणें कनकासी ॥१५॥
नृत्य करी घरधणी । माझ्या शिरीं ठेवी फणी ॥१६॥
कोठें होत हा कपाळी । संगें भुतें प्रतिपाळी ॥१७॥
मोठा छांदस चंगी भंगी । संगें वागवी नंदी भृंगी ॥१८॥
नित्य भोगी दोघी जाया । मसणी जातोहे निजाया ॥१९॥
ज्ञानानळीं जाळुनि चिंता । शिव सीतळ केली चिता ॥२०॥
तेथें झांकोनिया डोळे । मध्वनाथासहित लोळे ॥२१॥
पद ३२ वें
श्रवण करा तुम्ही भागवताचें ॥ध्रु०॥
काळदवानळ भवतरु जाळी । काय तया भय तनुगवताचें ॥१॥
तन मन धन हें जाईजणें रे । शाश्वत काय त्या दैवहताचें ॥२॥
श्रवणें मननें सद्गुरुभजनें । दर्शन होइल सर्वगताचें ॥३॥
धन्य परीक्षिति क्षितिपति ज्याचें । वर्नन कोण करी सुकृताचें ॥४॥
श्रीशुकदेवें पूर्णकृपेनें । अर्पियलें फळ ज्या अमृताचें ॥५॥
श्रवणविभूषण वैष्णव मिरवितो । मध्वमुनीश्वरस्वामीमताचे ॥६॥
पद ३३ वें
संसाराच्या संतापें । शरण रिघावें संतां पें ॥१॥
मुनिच्या चरणा लागावें । दीनदयाळाला गावें ॥२॥
दुरिताचरणा लाजावें । हरिजागरणाला जावें ॥३॥
त्रिविध विकारा जिंतावें । निर्गुणरूपा चिंतावें ॥४॥
मध्वमुनीला वंदावें । इंद्रपदासही निंदावें ॥५॥
पद ३४ वें
कां रे हरिगुण वदनासी । देवें दिधलें वदनासी ॥१॥
शासन न करिसी रसनेला । ईनें तुझा रस नेला ॥२॥
स्वधर्माच्या नयनासी । दाखविसी ते नयनासी ॥३॥
न सुटे धनसुतवनिता रे । काय करावें वनीं तां रे ॥४॥
म्हणउनि जासी नर कासी । तेथें होसी नरकासी ॥५॥
न भजसी मध्वनाथा रे । म्हणउनि सुबुद्धि ना थारे ॥६॥
पद ३५ वें
अपार महिमा देवाचा । मुकिया जो दे वाचा ॥१॥
पर्वत वेंघिती पांगुळें । तेथें वाटिती पां गूळ ॥२॥
अंधा जो दे नयनासी । तो मग कलिचा नय नासी ॥३॥
बधिरा ऐकवी गायन जो । सिणवी वसुधागाय न जो ॥४॥
निशिदिनीं ध्यातां वरदासी । मुक्ति होते वर दासी ॥५॥
मध्वनाथा समोर या । प्रसाद देतो मोरया ॥६॥
पद ३६ वें
देवा उद्धरी तूं मजकारणें ॥ध्रु०॥
शंखचक्रादिकें आयुधें धरिसी । म्हणविसी संकटवारण ॥१॥
शरणागतावरि करुणा करावी । हा भवसागर तारण ॥२॥
दीनदयानिधि हे बिरुदावळि । गाती महासिद्ध चारण ॥३॥
मध्वमुनीश्वर म्हणतो माझें । सत्वर दुःखविदारण ॥४॥
पद ३७ वें
दुर्लभ या नरदेहीं घ्या रे । नामसुधारस घुटका रे ॥१॥
आत्माराम जवळिंच असतां । व्यर्थचि कां तुम्ही भटका रे ॥२॥
हा जगडंबर मायिक मिथ्या । माना जन हो नटिका रे ॥३॥
विषय विषापरि मानुनि अंतरीं । तोडा याचा तटका रे ॥४॥
भावबळें हरि अंतरीं बांधा । जाईल तरी तुम्ही हटका ॥५॥
मध्वमुनीश्वर बळीच्या द्वारीं । अझुनि नव्हे ते सुटिका रे ॥६॥
पद ३८ वें
रंगीं नाचे रंगीं नाचे रंगीं नाचे सखया हरि रंगीं नाचे ॥ध्रु०॥
सेवन करुनी वैष्णवांचें शतवरुषें वाचे ॥१॥
पावन गुणगण राघोबाचे वर्णी तूं वाचे ॥२॥
सुकृताचें धन पदरीं सांचें । पतक तें खाचें ॥३॥
मध्वमुनीश्वर सांगत साचें । रहस्य हे त्याचें ॥४॥
पद ३९ वें
शुकसनकादिक महिमा ज्याचा वर्णिती वेदपुराणीं रे । गोकुळीम गोवळ होऊनि गाई चारी चक्रपाणी रे ॥ जो या पांडवघरीं हरि सारथि पाजी तुरगा पाणी रे । तो हा सद्गुरु ज्ञानेश्वर हरिस्मरणें तारी प्राणि रे ॥१॥
ज्यानें केली भगवद्गीतेवरती सुंदर टीका रे । सादर परिसति त्यांची होते संसारांतुनि सुटिका रे ॥ प्राकृतभाशा रुचिकर रचिली करुनि सुधारस फीका रे । भक्तिज्ञान विरक्तीचा पोसी तो रस नीका रे ॥२॥
दगडाची ते भिंति जयानें चालविली जड माती रे । पैठणीं दिधली वेदपरीक्षा वेड्या रेड्याहातीं रे ॥ सुवर्णाचा पिंपळ ज्याचे द्वारीं । वैष्णव पाहाती रे । अजानवृक्षाखालें शांभव आसन घालुनि राहाती रे ॥३॥
म्क्तपुरीहुनि श्रेष्ठ पुरातन पाहातां क्षेत्र आळंदी रे । इंद्रायणिचें जळ सेवी तो इंद्रपदासहि नंदी रे ॥ ज्याचे सन्निध सिद्धेश्वर तो सन्मुख शोभे नंदी रे । कार्तिकमासीं पंढरपुरपति समाधि ज्याची वंदी रे ॥४॥
ज्ञानेश्वर या नामाचा जो जप करी अनुदिनीं वाचे रे । त्याचे हृदयीं परमेश्वर तो लक्ष्मी घेउनि नाचे रे ॥ ज्याची टीका श्रवणीं पडतां भवभयपर्वत कांचे रे । अगणित गुणगण मध्वमुनीश्वर वर्णीतोहे त्याचे रे ॥५॥
पद ४० वें
मोथें येकोबाचें अनुष्ठान रे । ज्यानें उद्धरिलें प्रतिष्ठान रे ॥१॥
उडउनि मणिपुर स्वाधिष्ठान रे । जनार्दन दाविलें अधिष्ठान रे ॥२॥
जना आणिक धरुं नको पंथ रे । मनोभावें भजे येकोपंत रे ॥३॥
ज्यानेम केलें शाहाणे साधुसंत रे । ज्याचे घरीं राबतो भगवंत रे ॥४॥
गुरुजनार्दनाची ते षष्ठी रे । करिती ते कधीं न होती कष्टी रे ॥५॥
मोहछाव पाहाती निजदृष्टी रे । ब्रह्मरूप भासे तया सृष्टी रे ॥६॥
ज्याचे पाहतां प्राकृत भागवत रे । परमार्थ होतो अवगत रे ॥७॥
वृंदावना घालितां दंडवत रे । मध्वनाथा प्रसन्न देव दत्त रे ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017
TOP