देवीचीं पदें - पदे १ ते ५
मध्वमुनीश्वरांची कविता
पद १ लें
तुम्ही पूजित जा जगदंबा ॥ध्रु०॥
अंबुरुहासनी शंहुविलासिनी । हेंच मनीं अवलंबा ॥१॥
गिरिवरविंध्यशिरोनिवासिनी । नाशिल मोहकदंबा ॥२॥
काय उणें मग या भुवनत्रयीं । अंगणीं नाचल रंभा ॥३॥
मध्वमुनीश्वर सांगतसे गुज । लावुं नका जी विलंबा ॥४॥
पद २ रें
जयदेवी नमो तुज अंबे वो जयदेवी नमो तुज अंबे ॥ध्रु०॥
विंध्यनिवासिनी । बंधविनाशिनी । पृथुतर दिव्यनितंबे हो ॥१॥
जयगजगामिनि । शंकरभामिनी । आनंदित शशिबिंबे हो ॥२॥
मध्वमुनीश्वर साधक हृदयीं । ध्यान तुझें न विसंबे हो ॥३॥
पद ३ रें
धारेश्वरावरिल तुंदिल वंदिला हो । राहोनि त्या स्थळिं पुरंदर निंदिला हो ॥ त्यानंतरें जननिची तिलचंदला हो । जीचा पदाब्जरस घेति मिलिंद लाहो ॥१॥
श्रीदेवतांगी समीपचि भ्रामरी जी । जे वर्णिली सकल आगम डामरी जी ॥ जेथें सदैव चरती वनचामरी जी । भिल्लांसवें मधु पिती बहु पामरी जी ॥२॥
आबालईं करुनि वंदन मज्जनासी । आरंभि जो गिरिसुतापदपूजनासी ॥ दुर्गा दया करुनि उद्धरि सज्जनासी । दे शांतिमोक्षफळ तें भवबीज नासी ॥३॥
श्रीशारदा कमळजा आणि कालिका हे । देवी उपांगललिता हरितालिका हे ॥ शाकंबरी त्रिपुरसुंदरि अंबिका हे । येका प्रसन्न वरदा कवि त्रिंबका हे ॥४॥
हेमाद्रिपंत करि पूजन रामभूप । यात्रेस लोक मिळती स्तविती अमूप ॥ चांडाल ताम्रमुख तें निरयांधकूप । देखोनिया जननि राहिलि गुप्तरूप ॥५॥
ज्या भांगसीवरि असे शिवभक्त धागा । लिंगार्चनीं रत सदा परमार्थिं जागा ॥ गंगा वदे त्वरित दर्शन देह कां गा । येऊनियां मजमधें भिजवी निजांगा ॥६॥
त्या भांगसीजवळ सुंदर तीसगांव । राहूनि त्या स्थळिं महेशसतीस गाव ॥ द्वारापुढें परम जागृत मारुती हो । ज्यालागिं तो करि रघूत्तम आरती हो ॥७॥
जेथें रसाळ तरु शोभति कल्पवृक्ष । वृक्षांवरी द्विजकुळांस फळींच लक्ष ॥ श्रीयाज्ञवल्क्यमुनिसंभव फार दक्ष । देखोनि स्वार्थ बुडती नसतांचि पक्ष ॥८॥
जेथें प्रयागवटसाम्य असे त्रिवेणी । पाणी पिती वसति आखरि व्याघ्रवेणी ॥ स्नानें करूनि वनितासि अभंगवेणी । श्रीशंभु देत मनुजास भुजंगलेणीं ॥९॥
केसारलिंग वसतें बदरीवनीं जी । ते धन्य भूमि म्हणवी अति पावनी जी ॥ जे पत्रपुष्प फळ अर्पिति जीवनासी । त्या अविद्येक महेश्वर जीवनासी ॥१०॥
वैशाखमासिं करि सद्गुरुपूजनासी । जिंकील तो रणिं समस्त रिपूजनांसी ॥ पाचारुनी द्विज मुनीश्वर भोजनासी । तो पूर्णकाम यमकीं करि भोजनासी ॥११॥
आख्यान हें सकल पद्मपुराणींचें जी । श्रीमध्वनाथ कवि वर्णि भवानिचें जी ॥ सारांश तो गुरुमुखें बरवा विचारा । बाळास तें घुसळुनी नवनीत चारा ॥१२॥
पद ४ थें
अंबे माय आदिभवानी ॥ध्रु०॥
झडकरी पावे लवकरी पावे । निज बालकाला सांभाळ ॥ होई तूं भक्तभिमानी ॥१॥
शुकसनकादी शुकसनकादी । ध्याती तुझे पाय ॥ श्रीमध्वनाथा दावी निदानी ॥२॥
पद ५ वें
तुलजे माय तूं माझे वो ॥ ललिते माय तूं माझे वो ॥ध्रु०॥
करुणाकल्लोळे तुझ्या चरणाच्या ॥ स्मरणें कळीकाळ नासे ॥१॥
अंतर बाहेर व्यापक तुझें ॥ निर्मळ स्वरूप भासे ॥२॥
या भवपुरीं वाहवलों दुरी ॥ लावी तूं आपुलें कासे ॥३॥
मध्वनाथ निजदास जाणुनी ॥ न करी तयाचें हांसें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 27, 2017
TOP