स्फुट पदें - पदे १११ ते १२०
मध्वमुनीश्वरांची कविता
पद १११ वें
परिसा कळयुगीचें पाखंड । निंदाद्वेष अखंड । कपटी चेटकी कळभंड । स्थापिती अपुलें बंड ॥१॥
घाणा गाळीतो उसाला । परि तो नेणें रसाला । गोचिड टाकोनि दुधाला । सेवी अशुद्धाला ॥२॥
चोरा चांदणें साहेना । उलूक रवी पाहीना । पापी देवाला बाहीना । कीर्तनरसीं राहीना ॥३॥
असतां कमळाजवळीं । दर्दुर मास्या कवळीं । ऐसें जयाच्या कपाळीं । कोण तयाचे टाळीं ॥४॥
ऐसें ऐकुनि दृष्टांत । दुष्ट जनाचा अंत । तयास भेटेना भगवंत । मध्वनाथ महंत ॥५॥
अभंग ११२ वा
कळयुगींचें ब्रह्मज्ञान । कोण्ही न करी संध्यास्नान ॥१॥
कर्मकांड उपासना । हे तों कोठेंही दिसेना ॥२॥
शैव शाक्त आगमी । म्हणती जीवन्मुक्त आम्ही ॥३॥
धूर्त तार्किक उदंड । ज्ञान बोलती प्रचंड ॥४॥
ज्ञान बोलावें तोंडें । अनुभव नसतां कानकोंडें ॥५॥
ऐसे ज्ञानी अनेक । गेला नाहीं अविवेक ॥६॥
हे तो ज्ञानी कोण मानी । स्वसंप्रदायीं अभिमानी ॥७॥
त्यासी न करावी चावटी । नाथ म्हणे ते कपटी ॥८॥
जीवन्मुक्ताप्रमाणें । सद्गुरु मध्वनाथ जाणे ॥९॥
पद ११३ वें
देवा केलें फार बरें । रघुपति केलें फार बरें ॥ध्रु०॥
गोगलगाय गरीब तयाला । तोडिती उधया येकसरें ॥१॥
येक मृगीचें पाडस त्याला । फाडिती श्वानें प्रेमभरें ॥२॥
जेथें सुखरतिलेश मिळेना । दाटुनि फिरविसी तेचि घरें ॥३॥
जेथें वृश्चिक तक्षक विषधर । तेथें निजविसी तूं स्वकरें ॥४॥
भूतदया तुज तिळभर नाहीं । परदुःख सीतळ हेंचि खरें ॥५॥
मध्वमुनीश्वर म्हणतों पळभरि । घेई जीवदशा निकुरें ॥६॥
अभंग ११४ वा
येकां जना जग दीसे । येका भासे जगदीश ॥१॥
येका बाधक नवदाहा । येका बाधक न वदा हा ॥२॥
येक विषयविश मागे । येक शमशमविष मागे ॥३॥
येक नुमजे अधराशि । येक समजे स्वघरासि ॥४॥
येका जीवीं वेदना गे । येका स्तवी वदना गे ॥५॥
येक नमुजे यमकाळा । येक समजे यमकाला ॥६॥
येकमेकां ऐसा भेद । स्थापी स्वामी माझा भेद ॥७॥
येक मध्वनाथ न भी । येक हरपुनि गेला नभीं ॥८॥
पद ११५ वें
वैराग्यहीन संन्यास काय करावा ॥ध्रु०॥
अज्ञान मूळ दृढ । वेदांतशास्त्रीं मूढ । उगीच चरफड । बाहेर ब्रीदमिरवा ॥१॥
भगवें माजा सगुडी । मिष्टान्नरस धुंडी । संतास निंदी दंडी । हातीं रंगीत गरवा ॥२॥
दंडास बांधी मुद्रा । अखंड साधी निद्रा । नेणें समाधिमुद्रा । चित्तांत पूर्ण हिरवा ॥३॥
पद ११६ वें
मी येक ज्ञानी नेटका । ऐसें म्हणे तयाचा गुरु लटका ॥ध्रु०॥
विद्वांस वयवृद्ध । सर्वांत मीच सिद्ध । आणिक मानी बद्ध । त्याचीच नव्हे सुटिका ॥१॥
तो मुक्त जीव नव्हे । ऐसी जयासि सवे । तयास कोण सिवे । जैसा कलश फुटका ॥२॥
ऐशांसि मध्वनाथ । जोडुनि दोन्ही हात । करुनि प्रणिपात । लावितसे चुटका ॥३॥
अभंग ११७ वा
मनामध्यें पाहे वनीं काय आहे । जनामधें राहे सुखरूप ॥१॥
करिसी जे उपाय होते ते अपाय । सद्गुरुचे पाय चिंती सदा ॥२॥
घेईं उपदेश नको फिरूं देश । आहे अनिर्देश वेगळाचि ॥३॥
स्वामी मध्वनाथ शिरीं ठेविल हात । होसिल कृतार्थ तेचि काळीं ॥४॥
अभंग ११८ वा
तुझा दास जाय दूर देशावरा । ऐसे विश्वंभरा करूं नको ॥१॥
तुझा दास हात आणिखां पसरी । ऐसें तूं श्रीहरि करूं नको ॥२॥
तुझ्या दासालागीं संसाराची चिंता । ऐसें रमाकांता करूं नको ॥३॥
तुझा दास वर्णी मानवाची कीर्ति । ऐसें कृपामृर्ति करूं नको ॥४॥
मध्वनाथ म्हणे भूपतिच्या बाळा । पितळ्याचा वाळा दूषण तें ॥५॥
अभंग ११९ वा
अजगर काय जाय देशावरा । त्यासि विश्वंभरा कोण पोसी ॥१॥
जळ उबगूनी म्हणे जळचरा । तुम्ही पोट भरा वनामध्यें ॥२॥
पाखांवीण लोला आहे जें पाखरुं । त्याचा आंगिकारु कोण करी ॥३॥
मायबाप त्यासि आणुनि देती चारा । त्याच्या समाचारा दोघे घेती ॥४॥
तान्ह्यापरिस तान्हें गर्भींचें लेंकरूं । उदीम व्यवहारू काय जाणे ॥५॥
मध्वनाथ म्हणे उंबरांतील जीव । जीव जीवा कींव काय भाके ॥६॥
अभंग १२० वा
नको पडूं मना कवित्वाचे भरीं । रामकृष्णहरि गाई गीत ॥१॥
व्यर्थ कवित्वाचा काढिशी कसिदा । छंदबंद सदा विचारुनि ॥२॥
येणें फार तुज वाटतें श्लाघ्यता । मिरविसीं योग्यता सभेमध्यें ॥३॥
मध्वनाथ म्हणे कल्पनेच्या अंतीं । होईल विश्रांती कवीश्वरा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017
TOP