सद्गुरुचीं पदें - पदे १ ते १०
मध्वमुनीश्वरांची कविता
अभंग १ ला ( सासुरवास )
संसार सासरा अविद्या हे सासु । ईचा आला त्रासु मजलागीं ॥१॥
वासना नणंद तोडि माझे लोळे । कोणें ईचे लळे पुरवावे ॥२॥
कांहीं केल्या ईचें नव्हे समाधान । विषयाचें ध्यान करितसे ॥३॥
निर्दय निष्फळ अहंकार भर्ता । करूं नेदी वार्ता माहेरींची ॥४॥
सोडुनी मजला नव्हे पै वेगळा । यानें माझा गळा बांधियला ॥५॥
कामक्रोध देर मारिती हे लाता । याची मज व्यथा अहर्निश ॥६॥
अंतरींचें दुःख सांगूं कोणापासीं । आहे परदेसी येकली मी ॥७॥
येई मज मूळ विवेकभाईया । गातसे वोविया तुजलागीं ॥८॥
शांतिमाता माझी भेटविसी कधीं । अहिण सुबुद्धि अंतरलें ॥९॥
स्वानंद हा पिता खंती याची वाटे । आठवितां दाटे कंठ माझा ॥१०॥
क्षमा आणि दया सख्या दोघीजणी । माझ्या सांगातिणी परत्रीच्या ॥११॥
स्वधर्मविश्वास हाचि निजसखा । पाहतां या सारिखा नसे कोण्ही ॥१२॥
ऐसें माहेरीचें गोत आठवतें । हृदय फुटतें भेटीसाठीं ॥१३॥
ऐकुनी करुणा धांवला सद्गुरु । जो म्हनवी कल्पतरु अनाथांचा ॥१४॥
त्यानें मज केलें भक्तियोगारूढ । अनुग्रहें दृढ धरियलें ॥१५॥
ज्ञानखङ्गेंकरुनी वधिली अवधीं । नेले मज वेगीं माहेरासी ॥१६॥
माझी मज येणें भेटविली माय । उतराई काय होऊं यासी ॥१७॥
श्रीगुरुसमर्थें दाविलें माहेर । स्वरूपाबाहेर जाऊं नेदी ॥१८॥
स्वानुभवें दूर केला चिदाभास । कैचा सासुरवास मध्वनाथा ॥१९॥
अभंग २ रा ( परीट )
सद्गुरु परीट चोखट । तो मज भेटला अवचट ॥१॥
माझा चिदाभास सेला । अविद्येनें मळीण केला ॥२॥
रूप ज्याचें समपोत । नाहीं आणिकांचे हातें होत ॥३॥
सद्गुरु मोठा गे पारखी । सेला अमोल निरखी ॥४॥
धुनावळीचा नमस्कार । पाहून केला अंगिकार ॥५॥
अनुतापाच्या उदकीं । घडी भिजविली निकी ॥६॥
शुद्ध सत्वाचा साबण । श्रीगुरु लावितो आपण ॥७॥
होता अहंतेचा डाग । तोही केला शुद्ध भाग ॥८॥
शांतिशिळेवर धुतला । ज्ञानगंगेसी निर्मळ केला ॥९॥
चिदाकासी वाळविला । घडी करूनि ठेविला ॥१०॥
मध्वनाथें उकलिला । ज्याचा त्यास समर्पिला ॥११॥
अभंग ३ रा ( रंगारी )
सद्गुरु भेटला रंगारी । साधकाला अंगीकारी ॥१॥
माझें सुमन तिवट । होतें साधनें धुवट ॥२॥
तेच रंगविलें येणें । रामरंगीं राजसवाणें ॥३॥
रंग अविट पै ज्याचा । वर्णायास कैसी वाचा ॥४॥
ऐसें पाहतां कोठें नसें । उमटविलें स्वरूप ठसें ॥५॥
तेंचि बायलें आतां । मध्वनाथें माझ्या माथां ॥६॥
लक्ष तुरा झळकतो । सिद्धजन वळखतो ॥७॥
अनुभव आरसा पाहिला । नाथ तन्मय राहिला ॥८॥
पद ४ थे ( आंधळा )
आंधळा मी जालों देवा नाहीं स्वरुपीं दृष्टि । जिकडे ज्यानें चालविलें तिकडे जातों त्याचे पृष्ठीं ॥ धावरे दीन बंधु । निरसी कल्पनासृष्टि ॥१॥
वेंघता वेंघवेना जन्ममृत्यूचे कडे । ज्याचा टेका धरूं जातों त्यासि घेउनी पडें । गर्हवास दरींतूनि बाहेर निघतां रडे । शुद्धमार्ग सांपडेना जाऊं कोणीकडे ॥२॥
विकल्पाच्या ठेचा खातों नेणें गिरिगडदरा । अकस्मात तिकडे जातों जिकडे चोरांचा थारा ॥ तेच मज नागविती आपल्या साधिती वैरा । निर्वैर करुनी कोण्ही जाऊं देईना सैरा ॥३॥
अविद्येच्या मध्यरात्रीं अहंश्वापदभय । तारुण्यब्रह्मारण्यीं करीती प्राणविलय ॥ मध्वनाथा धांवरे देवराया स्वामी होई सदय । मध्वनाथा करिसी केव्हां बोध अरुणोदय ॥४॥
अभंग ५ वा ( वेडा )
गुरुरायें वेडा केला । प्रपंच अवघा विलया नेला ॥१॥
क्ककय सांगूं महिमा याची । वळखी मोदिली मायेची ॥२॥
बेडी तोडिली ममतेची । बुद्धि जाली समतेची ॥३॥
आम्हीं जालों वेडेपिसे । कांहींबाहीच दृष्टीस दिसे ॥४॥
कर्मवासना फेडुनी । नाचों उघडे होवोनी ॥५॥
आम्हीं नागवे भोपळे । खेळों त्रिभुवनीं मोकळे ॥६॥
सप्तभूमिकेसी धांवा घेतों । सोऽहं म्हणोनि हांका देतों ॥७॥
वेडे जाले सनकादिक । योगी संसारी अनेक ॥८॥
मध्वनाथीं वेडेपण । जीवन्मुक्तदशा घेणें ॥९॥
पद ६ वें
श्रीशुक योगींद्रस्वामी । तुझे सेवक आम्ही ॥ आवडे धरिली तव नामीं । न्यावें लवकर निजधामीं ॥१॥
सद्गुरु करुणासमुद्रा । तुझी अतर्क्य मुद्रा ॥ न कळे कैलासीं रुद्रा । खेचरी भूचरी त्या क्षुद्रा ॥२॥
जेथें आधि ना व्याधी । जन्म मृत्यु न बाधी ॥ तोडुनि अवघी उपाधी । लाविसि उघडि समाधी ॥३॥
शोधुनि शास्त्रींच्या युक्ती । नलगे सायुज्यमुक्ती ॥ मध्वनाथ विरक्ती । मागतोहे गुरुभक्ति ॥४॥
पद ७ वें
विश्रांतीचें मूळ माझ्या सद्गुरुचे पाय । तिहीं मज सुखी केलें सांगूं मी काय ॥१॥
तळमळ गेली चित्ताची तें जालें सीतळ । शरत्काळीं गौतमीचें जळ जैसें नितळ ॥२॥
येकायेकीं तन्मय जालें कल्पनातीत । मिथ्या म्हणे जाणावा तो महापतित ॥३॥
श्रीशुकयोगींद्राचा महिमा अगाध अभिनव । सनकादिक योगीश्वर जाणती अनुभव ॥४॥
मध्वमुनीश्वर म्हनतो अवघी सांडा चतुराई । पंडित जनहो सांगा कैसा होऊं उतराई ॥५॥
पद ८ वें
सद्गुरु कृपाळ गे । भेटविला यानें श्रीगोपाळ गे ॥ध्रु०॥
प्रपंच फटकाळ गे । तटका त्याचा तोडिला तात्काळ गे ॥१॥
दिधली अमराई । संशय नाहीं उरला तीळ राई ॥२॥
अद्भुत चतुराई । होऊं मी कायि तयासी उतराई ॥३॥
दिठी निवाली गे । मध्वनाथी नव्हे निराळी गे ॥४॥
वृत्ति जिराली गे । जैसी जळीं गार विराली गे ॥५॥
पद ९ वें
सद्गुरु कृपाळ गे । भेटविला यानें श्रीगोपाळ गे ॥ध्रु०॥
प्रपंच फटकाळ गे । तटका त्याचा तोडिला तात्काळ गे ॥१॥
दिधली अमराई । संशय नाहीं उरला तीळ राई ॥२॥
अद्भुत चतुराई । होऊं मी कायिं तयासी उतराई ॥३॥
दिठी निवाली गे । मध्वनाथी नव्हे निराळी गे ॥४॥
वृत्ति जिराली गे । जैसी जळीम गार विराली गे ॥५॥
पद १० वें
सद्गुरुराया रे दयानिधि सद्गुरुराया ॥ध्रु०॥
या भवतापें तापली काया । यावरि करी तूं सीतळ छाया ॥ निरसुनि माया करुनि उपाया । चुकवी सर्व अपाया ॥१॥
कामादिक रिपु मारिति घाया । लावुनि जाया साधिति डाया ॥ अवसर न देती तव गुण गाया । अथवा स्वरूप ध्याया ॥२॥
पसरुनि बाह्या ये भेटाया । भेटुनिया मज ने निजठाया ॥ मध्वमुनीश्वरें घेतला थाया । दाखवी सत्वर पायां ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 27, 2017
TOP