स्फुट पदें - पदे ६१ ते ७०
मध्वमुनीश्वरांची कविता
पद ६१ वें घनाक्षरी
देह नाशवंत जाण । देह अविद्येची खाण । देहास पडते घाण । येक दिन न धुतां ॥१॥
देह विटाळाचें मूळ । देह मरणाचें कूळ । अंतकाळीं होते धूळ । न ये कांहीं साधितां ॥२॥
देह नरकाचें भांडार । देह रोगाचें बिढार । देह रक्ताचा विकार । ऐसें जाण शोधितां ॥३॥
देह आहे अमंगळ । देह शेवटीं भंगेल । ऐसें कळलें केवळ । मध्वनाथें बोधितां ॥४॥
पद ६२ वें घनाक्षरी
संसारीं विचार सार । सांडुनि प्रचार फार । विषयाचा कारभार । करूं नको भाई रे ॥१॥
व्यर्थ तुझी येरझार । धरूं नको परिवार । ममता हे अनिवार । फार इची घाई रे ॥२॥
रूप तुझें निर्विंकार । ब्रह्मपदीं अधिकार । असोनिया अहंकार । सोडुनिया पाही रे ॥३॥
मध्वनाथ वारंवार । सांगतो प्रकार सार । सद्गुरु हा निर्विकार । लाग त्याचे पायीं रे ॥४॥
पद ६३ वें घनाक्षरी
धरुनि सात्त्विकाचा वेष । करिती सज्जनाचा द्वेष । हा येक देखिला विशेष । कलियुग लागतां ॥१॥
उगाच वाजविती टाळ । कंठीं रुद्राक्षाची माळ । पीडदंड भगपाळ । उजगरीं वागतां ॥२॥
भगलीचें निरुपण । कीर्तन करितों आपण । दुसर्याचें तें कृष्णार्पण । स्वयें कृपण मागतां ॥३॥
मध्वनाथ म्हणे मत । घरोघरीं हे घुमत । भांग पिऊनि उन्मत्त । न ये कांहीं सांगतां ॥४॥
पद ६४ वें घनाक्षरी
मीच गोसावी सज्जन । माझें करावें पूजन । द्यावें मिष्टान्न भोजन । ऐसें शिष्यां उपदेशी ॥१॥
मज घाला नमस्कार । करा पूजा पुरस्कर । ऐसा देतो तिरस्कार । जनालागीं विदेशी ॥२॥
ऐका सांगतों साधन । मज द्यावें अवघें धन । करा आत्मनिवेदन तेंच पावल जगदीशीं ॥३॥
आपला रडतें जें रड । त्याचें ज्ञान काय धड । ऐसें प्रस्थान अवजड । मध्वनाथ निरसी ॥४॥
पद ६५ वें घनाक्षरी
पहा कथेचा कल्लोळ । श्रोते मिळाले ते टोळ । मृदंगाचा टाळवोळ । रंग कोण मातला ॥१॥
निर्भय बोलतो लोकांत । होतो नकलांचा आकांत । चित्तीं नाहीं रमाकांत । हास्यरती रातला ॥२॥
आपण म्हणवितो हरिदास । करितो संतांचे उपहास । कांहीं केल्या न सुटे आस । हाच दुकान घातला ॥३॥
ऐसा गायक अघोर । त्यासी न मानिती थोर । सभेमध्यें फजीतखोर । मध्वनाथ्हें नाथिला ॥४॥
पद ६६ वें घनाक्षरी
आतां असोत गुणदोष । न करावा कंठषोष । आपला आपण संतोष । मानुनि काळ क्रमावा ॥१॥
दिसोन येतां दीर्घद्वेष । नाहीं आपल्यास विशेष । होती बहुतांला क्लेश । ऐसा वाद शमावा ॥२॥
कैचा सज्जन दुर्जन । अवघा जनीजनार्दन । चिदानंदविवर्धन । सर्वाहूतीं नमावा ॥३॥
करितां सकळांसी सख्य । तरीच पाविजेल सौख्य । मध्वनाथ म्हणे मुख्य । अहंकार दमावा ॥४॥
पद ६७ वें घनाक्षरी
करुनि वेदांतश्रवण । कळला माझा मी कवण । जैसें उदकीं लवण । तैसा स्वरुपीं मिळाला ॥१॥
त्याची लीला अभिनव । जाला स्वरुपानुभव । भोगी साम्राज्यवैभव । सर्वांहुनी निराळा ॥२॥
बरवें शोधुनि शास्त्रास । धरिला विषयाचा त्रास । केला मीपणाचा ग्रास । प्रपंचाहुनि वेगळा ॥३॥
मध्वनाथा तो ब्राह्मण । जीवन्मुक्त त्यास म्हण । परमहंस शिरोमण । श्रीशुकयोगी चांगला ॥४॥
पद ६८ वें घनाक्षरी
जालें वेदांतांचें राज्य । छत्र उभारिलें आज । वरकड शास्त्रें आलीं वाज । जीव घेउनि पळालीं ॥१॥
येवढा समर्थ प्रताप । केलें साधक निष्पाप । गेला प्रपंचविलाप । सर्व दुःखें जळालीं ॥२॥
साधक फिरताति निर्भय । पद पावती अद्वय । अहंभावाचा विजय । करितां द्वंद्वें गळालीं ॥३॥
श्रीशुकयोगी चक्रवर्ती । ज्याची लोकत्रयीं कीर्ति । शुद्ध जीवन्मुक्त मूर्ति । मध्वनाथीं मिळाली ॥४॥
पद ६९ वें
जाला गोसावी । इंद्रियें पोसावीं ॥ध्रु०॥
कंथा गळांची । बहु थीगळाची । पंथ धरी वेगळांची ॥१॥
माथां टोपी । मना नाटोपी । मोठा खटाटोपी ॥२॥
हातीं काठी । कथा थाटी । शिष्य पदें पाठी ॥३॥
लावी गाथा । हालवी माथा । न भजे मध्वनाथा ॥४॥
पद ७० वें
तेव्हां गोसावी । जेव्हां सुखदुःखें सोसावी ॥ध्रु०॥
मानी प्रतिष्ठा शूकरविष्ठा । ध्यानीं अंतरनिष्ठा ॥१॥
न धरी लोभा न करी शोभा । निंदितां न मनीं क्षोभा ॥२॥
न धरी अहंता पूजी महंता । वर्णितो गुणवंता ॥३॥
मध्वनाथा वंदी कोण्हा ना निंदी । मग तो परमानंदी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017
TOP