मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ११ ते १७

स्थलवर्णन - पदे ११ ते १७

मध्वमुनीश्वरांची कविता


पद ११ वें
क्षेत्र धरातळीं पाहातां निर्मळ गोदातीरीं टोकें हो । जेथिल ब्राह्मण धार्मिक पाहातां कळीकाळासारिखे हो ॥ त्याचा हृदयस्फोट होऊनी अंतरीं जळतो शोकें हो । कांहीं न चले या स्थळीं म्हणवुनी फोडुनी घेतो डोकें हो ॥१॥
जय जय सांभ सदाशिव शंभो सिद्धेश्वरा स्वामी जी । करुणासागर ऐकुनी तुला शरण आलों आम्ही जी ॥ सकळही सधन सोडुनी केवळ रतलों तूझ्या नामीं जी । मध्वमुनीश्वर म्हणतो ठेवी कैलासाचळधामीं जी ॥२॥
विश्वेशाची नगरी म्हणवी राजधानी काशी हो । तेही धांवुन आली माझ्या सिद्धेश्वरापाशीं हो ॥ द्वादश जोतिर्लिंग येथील झालीं क्षेत्रवासी हो । एक प्रदक्षिणा करितां जळती पातकाच्या रासी हो ॥३॥
प्रवरासंगमवासी त्याला नलगे प्रयाग रेवा हो । ज्याच्या द्वारीं रिद्धी सिद्धी सदैव करिती सेवा हो ॥ ज्याची योगक्षेमचिंता सिद्धेश्वरा देवा हो । कायगांवीं जन हो भाव रामेश्वरीं ठेवा हो ॥४॥

श्लोक १२ वा
टोकीचे
रेणुका सबळ एकविरा हे । जाणुनि जवळिचे कवि राहे । जोडिली सरस राजस माये । मध्वनाथ भुवनीं न समाये ॥१॥
हंस आसनिं बैसुनि शारदा । सामगायन करी विशारदा । जे प्रसन्न मुनिवर्य नारदा । ते भवानि भवसिंधुपारदा ॥२॥
जे पुरातन हिमाद्रिबालिका । वैष्नवी दनुजवृंदचालिका । कालिका कुटिललोकजाळिका । संकटीं निजजनाप्रति पालिका ॥३॥
चंड मुंड महिषासुर टोकीं । तोडूनि वसविली मग टोकी । अंबिकानगर जो अवलोकी । तो कदापि न बुडे भवशोकीं ॥४॥
अंबिका नगर बंदर पाहे । बंदरीं करुनि मंदिर राहे । ज्या स्थळीं त्रिपुरसुंदरी आहे । ते शिवा करिल सर्वहि साह्ये ॥५॥
देखिली शशिमुखी नवचंडी । आंगदें विसलती भुजदंडीं । मूर्ति तो अशि नसे नवखंडीं । दर्शनेंकरुनि संकट खंडी ॥६॥
जे उमा कमलजा सरस्वती । जीस पूजित असे बृहस्पती । व्यासवाल्मिक कवींद्र सेविती । वाहती तुलसी बेल सेंवती ॥७॥
अंबिकानगर उत्तरभागीं । श्रीशिवा प्रगटली मुनिलागी । देवगिरीच समीप राहते । शुद्ध भाविकजनासि बाहते ॥८॥
भ्रामरी गिरिसुपश्चिमभागीं । अर्चनीं विमुख तोचि अभागी । दुःस्वरूप अविद्या भवजाया भक्त हो तुम्हि भजा भव जाया ॥९॥
क्षेत्र जागृत पुरातन टोकी । सेवि त्यासि यमदूत न टोंकी । विंध्यपर्वतशिरोधिवासिनी । या स्थळीं प्रगटली सुवासिनी ॥१०॥
सांडुनी सकळ लौकिकदंभा । लोक हो तुम्ही भजा जगदंबा । दर्शनें सकळ संकट वारी । मध्वनाथ मम दैवत तारी ॥११॥

श्लोक १३ वा
( पारनेराचें वर्णन )
पाराशराच्या नगरीं राहावें । शिलोदकें निर्मल तें नाहावें ॥ गौरीसुताचे चरणा पाहावें । सिंदूर दूर्वादळ तें वाहावें ॥१॥
सिद्धेश्वरा धांवत शीघ्र ये रे । शिलोदकाचें निज तीर्थ दे रे ॥ कडेवरी तूं मजलागिं घे रे । भवांबुधीच्या परपार ने रे ॥२॥
विश्वेश्वरा त्र्यंबकराज देवा । श्रीपांडुरंगीं मजलागिं ठेवा ॥ मला घडूं द्या नरसिंहसेवा । मुनीश्वराच्या मनिं हाचि हेवा ॥३॥
विज्ञप्ति हे भाकिली मध्वनाथें । केली कृपा त्या मग नागनाथें । प्रसाद देवें दिधला स्वहातें । कसा विसबूं जनहो तयातें ॥४॥
धुळीमधें जेवि अनर्घ्य मोतीं । ज्या सांपडे तेचि कृतार्थ होती ॥ अश्वत्थमूळीं बघ मूर्ति होती । ते दाखवीली प्रगटोनि ज्योती ॥५॥
हातास आलें धन शांभवांचें । माझें पळालें भय तें भवाचें ॥ स्वरूप ध्यातां हृदयीं भवाचें । झालें अकल्याण मनोभवाचें ॥६॥
प्रदोषकाळीं शिव देखिला हो । भाळीं जयाच्या शशि रेखिला हो ॥ साफल्यतेचा दिप देखिला हो । प्रसाद त्याचा मग चाखिला ॥७॥
अंबिकेसहित जो तळी गजी । पूजिती मुनि सदा असंग जी ॥ ज्यासि वेष्टुनि असे भुजंग जी । लक्षिला विमलअंतरंग जी ॥८॥
जो महेश मधुवर्ण शोभतो । दानवांवरि मनांत क्षोभतो ॥ ज्यासि नाहिं अभिमान दंभ तो । त्या समीपचि सदैव शंभु तो ॥९॥
तारिलें मुनिस चंद्रशेखरें । दाविलें प्रगट या युगीं खरें ॥ बिल्वपत्र वाहातील जे करें । उद्धरी प्रभु तयांचि लेंकरें ॥१०॥

पद १४ वें
देव कचेश्वर हा बरा हा ॥ध्रु०॥
गुरुसुत दावित गुरुपद शाश्वत । जागृत देव महा ॥१॥
देवऋषीचें कुमर सगुण संवत्सर । पन्नास आणि दहा ॥२॥
कुंकुमठाणींचे विप्र निर्वाणीचे । अभिषेकास बाहा ॥३॥
शुक्लेश्वर शिव उद्धरी जड जीव । लिंग अनादि पहा ॥४॥
गौतमीचें जळ निर्मळ सोज्ज्वळ । पायीं तयाचे वाहा ॥५॥
पश्चिमवाहिनी सद्गतिदायिनी । त्या स्थळीं नित्य नाहा ॥६॥
जनहो निज मनीं तत्व उमजुनी । कोपरगांवीं रहा ॥७॥
मध्वमुनीश्वर सांगे निरंतर । गुरुकृपें सर्व लाहा ॥८॥

पद १५ वें
पूजावें ज्योतिर्लिंग तें कुंकुमाचें ॥ध्रु०॥
पाहे सुक्षेत्र वेळूर । प्राण्याजाऊं नको दूर । व्यर्थ होसी तूं चुकुर । खोटें व्यसन कामाचें ॥१॥
धन्य वेळुर नगर । ऐसें नाहीं धरणीवर । नांदे जेथें घृष्णेश्वर । स्थान सर्वोत्तमाचें ॥२॥
शिवालयींचें जीवन । त्याचें करी कां रे सेवन । होती पूर्वज पावन । बीज मुक्तिद्रुमाचें ॥३॥
आली येळासी प्रतीत । जाला तापत्रयातीत । अनेक तरले पतित । सामर्थ्य ज्याच्या नामाचें ॥४॥
येरुळींचे जे भूदेव । त्यांचें चरणोदक सेव । द्रव्य सत्पात्रीं तें ठेव । सार्थक होईल जन्माचें ॥५॥
धन्य वेळगंगातीर । तेथील सेवील जो नीर । त्याचें चित्त होईल थीर । सस्वरूपीं नेमाचें ॥६॥
करितां तीर्थाचें स्पर्शन । होतां देवाचें दरुषण । जालें दुरिताचें निरसन । गेलें भय यमाचें ॥७॥
भावें मध्वमुनीश्वर । गातो महिम्न सादर । प्रसन्न जाला जगदीश्वर । तुटलें बंधन भ्रमाचें ॥८॥

पद १६ वें
हरली भवभयवेथा पाहातां परळी वैद्यनाथा रे ॥ सरली मायाममता भरली सबाह्यअंतरीं समता रे ॥ सहज जयंती नगरीमध्यें स्वार्थमुळें रमतां रे ॥ त्रिकाळ पूजा पाहातां भावें ज्योतिर्लिंगा नमितां रे ॥१॥
जयजय गिरिजाकांता कांतीमध्यें राहसि शांता रे ॥ जेथिल अष्टतीर्थें करिती पातकाच्या अंता रे ॥ अपार तुझा महिमा न कळे संसारींच्या भ्रांता रे ॥ मध्वमुनीश्ववर म्हणतो दावी कैलासींच्या प्रांता रे ॥२॥
हरिहरतीर्थीं स्नानें करुनी समस्त दानें देती रे ॥ पूजुनियां द्विजवृंदें त्यांचे आशीर्वाद घेती रे ॥ सुरवर ज्याच्या भेटिस धाउनि स्वर्गींहूनी येती रे ॥ संतति संपति देउनि अंतीं मुक्तिपदाप्रति नेती रे ॥३॥
जो नर वैजयंतीमध्यें राहून काळ कंठी रे ॥ त्याच्या वैजयंती सुंदर रुळे माळ कंठीं रे ॥ सरस्वतीच्या तीरीं कीर्तन करी जो वाळवंटीं रे ॥ त्याचे पूर्वज पूजी गोपीराज वैकुंठीं रे ॥४॥
ज्या तुजसाठीं योगी माळा अजपेची फिरविती रे ॥ कोण्ही प्रयागांत घालुनि घेताती करवती रे ॥ तो तूं देवा प्रगट नांदसि नारायणपर्वतीं रे ॥ येक प्रदक्षिणा करिती त्याला कैलासीं मिरविती रे ॥५॥

श्लोक १७ वा
( वाराणशीस्तुती )
वाराणशीपुरपते जय विश्वनाथा । माझा प्रणाम तुझिया चरणासि आतां ॥ मी मागतों सहज पावन एक भिक्षा । द्यावी मला त्वरित शांभवी वेददीक्षा ॥१॥
श्रीबिंदुमाधव तुला स्मरतों स्वभावें । संसारसिंधु मग बिंदु तव प्रभावें ॥ माझी कृपानिधि कधीं न करी उपेक्षा । ठेवी मला निज पदांबुजिं हे अपेक्षा ॥२॥
श्रीधुंडिराज गणनाथ गजानना रे । संसारपिप्पलतरूसि विनाशना रे ॥ तूं देव सुंदर धुरंधर विघ्नहर्ता । वाराणशीस मज येथुनि ने समर्था ॥३॥
मी प्रार्थना करितसे तुज दंडपाणी । माझे उदंड अपराध मना न आणी ॥ श्री भैरवा चुकवी रौरव यातना रे । वाराणशीस मज ने करुणाकरा रे ॥४॥
वाराणशी त्रिभुवनेश्वर राजधानी । भागीरथीतटिं जगद्गुरु संनिधानीं ॥ जी प्राणीयासि मरणीं गति दे निदानी । ती धन्य धन अविमुक्त पदाभिराणी ॥५॥
तूं स्वामि कार्तिक उमेश्वरनंदनारे । सेनापते करितसे तुज वंदना रे ॥ आनंद फार करितोस महास्मशानीं । त्वां मारिले असुर घाव दिला निशाणीं ॥६॥
भागीरथी तवतटीं तनु ही पडावी । सायुज्य मुक्ति पदवी मज सांपडावी ॥ ही वासना हृदयिं उत्कट वाहतों गे । धाडी निरोप घरिं वाट मी पाहतों गे ॥७॥
जे सोडूनि इतर लौकिक दभं वाणी । जे मानिली जननि केवळ शांभवांनीं ॥ जे पूजिली मुनिजनीं निज वैभवांनीं । ऐसी जगत्रजननी मज तूं भवानी ॥८॥
तूझा अपार महिमा मुनि वर्णिती गे । तूं माझि माय बहिणी मणिकर्णिके गे ॥ तूझ्या जलेंकरूनिया तनु ही भिजो गे ॥ संसारताप अवघा मग हा विझो गे ॥९॥
श्रीमध्वनाथलिखितार्थ अपूर्व वर्णी । विश्वेस यश ? परि सादर सर्व कर्णीं ॥ धाडूनि मूळ मज येथुनि ने प्रयागा । दावी गया न करि विष्णुपदा वियोगा ॥१०॥
तूझा अपार महिमा कथिला महंतीं । हें ऐकुनी हृदयिं वाटत फार खंतीं ॥ तारील कोण मजला तुजवीण अंतीं । ही मध्वनाथ कविनें लिहिली विनंती ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP