श्रीकृष्णाचीं पदें - पदे ८१ ते ९०
मध्वमुनीश्वरांची कविता
पद ८१ वें
काळे तुझे बाल राधे गोरे तुझे गाल ॥ध्रु०॥
बिंद्या सिसफूल भाळीं शोभे भांगीं सरस गुलाल ॥१॥
मध्वमुनीश्वर म्हणतो तूझे रंगित अधर रसाळ ॥२॥
पद ८२ वें
उद्धवा शांतवन कर जा त्या गोकुळवासि जनांचें ॥ध्रु०॥
बा नंद यशोदा माता मजसाठीं त्यजितिल प्राण । सांडुनी प्रपंचा फिरती मनिं उदास रानोरान । अन्नपाणी त्यजिलें रडती अति दुःखित झाले दीन । ( चा. ब. ) जन्मलों तैंहुनि झटले । कटि खांदे वाहतां घटले । मजलागीं तिळतिळ तुटले । आटलें रक्त देहाचें ॥१॥
आईबाप त्यजुनी बाळें मजसंगें खेळत होतीं । गोडशा शिदोर्या आणुनी आवडीनें मजला देती । रात्रंदिस फिरले मागें दधि गोरस चोरूं येती । ( चा. ब. ) मी तोडुनि आलों तटका । तो जिवा लागला चटका । मजविण त्या युगसम घटका । आठवतें प्रेम तयांचें ॥२॥
पतिसुतादि गृहधन त्यजिलें मजवरती धरुनी ममता । मानिलें तुच्छ अपवर्गा मजसंगें निश्चळ रमतां । मद्दत्तचित्त त्या गोपी नेत्रांतरिं लेवुनि समता । ( चा. ब. ) तिळतुल्य नाहिं मनिं डगल्या । दृढ निश्चय धरुनी तगल्या । बहुधा त्या नसतील जगल्या । भंगले मनोरथ ज्यांचे ॥३॥
हरि आहे सुखरूप म्हणुनी भेटतांचि त्या सांगावें । सांग कीं समस्ता पुसिलें प्रत्युत्तर त्या मागावें । कथुनिया ज्ञान तयातें सांग कीं शोक त्यजावें । ( चा. ब. ) हें कार्य नव्हे तुजजोगें । मजसाठीं जावें वेगें । हे मध्वमुनीश्वर सांगे । त्या नपवे ज्ञान जयाचें ॥४॥
पद ८३ वें
मुरलींचें भाग्य कांहीं कळेना हो बाई ॥ध्रु०॥
गोविंदाच्या अधरींचा सुधारस सेवुनिया ॥ तेणें नादें कुंजवनीं रंजविल्या वत्सें गाई ॥१॥
सुरतरुतळवटीं यमुनेच्या वाळवंटीं ॥ गोपिकांच्या संगें खेळे मध्वनाथवरदाई ॥२॥
पद ८४ वें
मनमोहन वाजवी वेणू ॥ध्रु०॥
कुंजवनीं ध्वनि मंजुळ ऐकुनि । मोहित झाल्या धेनू ॥१॥
रंजविल्या व्रजसुंदरि सर्वही । पार तयाचा नेणू ॥२॥
कल्पद्रुमतळीं मध्वमुनीश्वर । वंदि पदांबुजरेणू ॥३॥
पद ८५ वें
मुरली भई सौगणरी हमारी ॥ध्रु०॥
नित्य हमारे शामके आगे । कहत है अवगुण रे हमारी ॥१॥
माखनचोरकु चुगली भावे । प्रीत करी चौगुणही हमारी ॥२॥
वय नटनागर बाहेरख्याली । मुरलीकु नार सुहागिनरी ॥३॥
अधरामृतरस मोहनजीका । लेती है नित्य नागिणरी ॥४॥
मध्वमुनीश्वरस्वामी ले आई । बनसे ये बाघिनरी ॥५॥
पद ८६ वें
मुरली हरिची धीट सजणी ॥ध्रु०॥
वंशज होऊनि निर्लज्ज झाली । हेंचि महा उरकील ॥१॥
परपुरुषाचे कानीं आमुचे । वदते अवगुण नीट ॥२॥
मध्वमुनीश्वरस्वामी सईचा । कांहीं न ये वो वीट ॥३॥
पद ८७ वें
एकी नाकीं बाळिया । कानीं मोतीं ल्यालिया । त्याही नाहीं राहिल्या पावल्या तेथें ॥१॥
पांघुरनें नेसल्या । नेसतीं पांघुरल्या । त्याही नाहीं राहिल्या पावल्या येथें ॥२॥
एकी अन्न काढितां । सजनासी वाढितां । कृष्ण गीत ऐकतां पावल्या तेथें ॥३॥
गोकुळींच्या गोपिका । आल्या सर्व बालिका । ज्यातें प्रसन्न अंबिका पूर्वीं जाली होती ॥४॥
गडबड जाली सर्वांसी । निघत्या जाल्या घरवासी । मध्वनाथपर्वासी भेटी लागीं पावल्या ॥५॥
पद ८८ वें
याचे हातींचा वेणु कुणी घ्या गे ॥ध्रु०॥
गृहीं आपुल्या मी करीत होतें धंदा । वेणु वाजविल्या नंदाचिया नंदा ॥ तल्लीन झालें याचिया मुरलीनादा ॥१॥
घरीं सासुरवास मला भारी । जावानणदा गांजिती परोपरी ॥ याचे मुरलीनें भुलविल्या पोरी ॥२॥
तान्हें बालक टाकुनि आलें घरा । गृहीं आहे सासरा म्हातारा ॥ त्यानें केला या जीवाचा कीं वारा ॥३॥
याचा नवलावा किती सांगूं बाई । चित्तवृत्ति वेधली याचे पायीं ॥ संसृतीसि ठाव उरला नाहीं ॥४॥
वेनु नोहे हा वीष मला वाटे । नाद ऐकोनी काम मनीं दाटे ॥ मध्वनाथाची मूर्ति हृदयीं भेटे ॥५॥
पद ८९ वें
वेणु गडे वाजवी कुंजवना ॥ध्रु०॥
ध्वनि ऐकोनी माडीवर गेलें । चंद्र हसे वदना ॥१॥
बाळी बुगडी नेसुनि लुगडीं । कर्णफुलें काना ॥२॥
शेज करुनी मंजकीं निजलें । कृष्ण येई स्वप्ना ॥३॥
मध्वमुनीश्वर प्रार्थितसे तुज । गोपिकारमणा ॥४॥
पद ९० वें
हरि घरघेणी मुरली तुझी हरि ॥ध्रु०॥
नेणों इला कोणी शिकविले टोणे ॥ राग आळविते जहराची केणी ॥१॥
मुरलीनें कैसें लावियेलें पिसें ॥ गोपी विपरित ल्याल्या लेणीं ॥२॥
गौळियांच्या कुमारी भुलविल्या नारी ॥ एकी विसरल्या विंचरिता वेणी ॥३॥
वृंदावना नीटा आल्या झाल्या धीटा ॥ लोकलाजेवरी रचिल्या शेणी ॥४॥
मध्वनाथस्वामी पुण्यवंत आम्ही ॥ तुझी भेटी झाली शेवटिलेपणीं ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 27, 2017
TOP