स्फुट प्रकरणें - अभंग ४ था
मध्वमुनीश्वरांची कविता
संताचें चरित्र ऐकावें सादर ॥ करितों नमस्कार संतजना ॥१॥
करवीर हें क्षेत्र कृष्णेचिये तीरीं ॥ द्विज घराचारी होता एक ॥२॥
कांता पुत्र सून चवघे असती ॥ ऐका त्यांची कीर्ती श्रोतेजन ॥३॥
परी तीं असती तिघे भक्तिहीन ॥ सखू यांची सून भक्तराज ॥४॥
अन्नोदकेविण तियेसी गांजिती ॥ परी तिचे चित्तीं पांडुरंग ॥५॥
आषाढीची यात्रा आला पर्वकाळ ॥ जाती संतमेळ गांवावरुनी ॥६॥
अखंड समाधी करी कामधंदा ॥ विठ्ठल गोविंदा उच्चारीत ॥७॥
जाऊनिया तेथें संत उतरले ॥ सासूनें धाडिलें जीवनालागी ॥८॥
घेऊनि घागर भरिलें जीवन ॥ ऐकूनि कीर्तन लुब्ध जाली ॥९॥
तये वेळीं तीसी नसे देहभान ॥ लागलेंसे ध्यान विठोबाचें ॥१०॥
सासू मज मारो घेऊं माझा प्राण ॥ परी मी जाईन पंढरीसी ॥११॥
तिचे संगें एक होती शेजारीण ॥ सांगो वर्तमान आली घरा ॥१२॥
तुमची सून सखू झालीसे बावरी ॥ जावया पंढरी पाहतसे ॥१३॥
बोलावूनी पुत्रा सांगे वर्तमान ॥ तयानें ताडण करीत नेली ॥१४॥
जावोनियां त्यानें वोढीत आणीली ॥ केशा धरियेली वेढोनिया ॥१५॥
पंधरा दिवस यात्रा ही वाहील ॥ कोण सांभाळील इसी आतां ॥१६॥
तेव्हां तिघांजणीं विचार मांडिला ॥ अन्नउदकाला देऊं नये ॥१७॥
विचार करोनि खांबासी बांधिली ॥ चर्हाटें बूडाळीं मांसांमध्यें ॥१८॥
ऐशा दुःखामाजी सखूचें हो मन ॥ करीत चिंतन विठोबाचें ॥१९॥
सखू म्हणे देवा पंढरीच्या राया ॥ अंतरलें पाया चांडाळीण ॥२०॥
एक वेळ डोळां पाहते चरण ॥ मग येतें मरण तरी बरें ॥२१॥
इच्छा माझी आहे पाहीन चरणां ॥ समाधी घेईन पायांपाशीं ॥२२॥
तुज पाहावया मन हें आसक्त ॥ तरे माझा हेत पुरवावा ॥२३॥
पंढरीच्या राया ऐके ही करुणा ॥ दावी बा चरणा सत्वरचि ॥२४॥
सखूबाई ऐसें करीत चिंतन ॥ पाहे परतोन पांडुरंग ॥२५॥
रुक्मादेवी म्हणे कोण हो गांजिलें ॥ कीर्तनीं लुब्धला कोठें देवा ॥२६॥
विठू म्हणे एक भक्त गे गांजिला ॥ जाणें आहे मजला त्याजपाशीं ॥२७॥
ऐसें सांगोनिया विठ्ठल निघाला ॥ तये स्थानीं आला रातोरात ॥२८॥
मध्यरात्रीं आला तिचे द्वारापाशीं ॥ सखू, सखू, तिसी हांका मारी ॥२९॥
निज भक्तासाठीं कबतुक केलें ॥ सखूचें धरिलें रूप देवें ॥३०॥
सखूबाई म्हणे कोठील तूं कोण ॥ म्हणे यात्रेकरीण पंढरीची ॥३१॥
जाईन पंढरी हेत माझा आहे ॥ कैसें जाउं माये बद्ध केलें ॥३२॥
सखूची हो भक्ति पाहोनिया देव ॥ भक्ताची ही कींव चालवितो ॥३३॥
म्हणे विठाबाई सोडीतें तुजला ॥ बांधुनी मजला जाय वेगीं ॥३४॥
भक्तासाठीं देवें बांधोनीं घेतलें ॥ स्कहूसी सोडिलें पोष्यामाजी (?) ॥३५॥
सखू गेल्यावरी मागें हिला घरीं ॥ तिघे वळा आला कांता तिच्या ॥३६॥
पौर्णिमेचा काला वेणुनादीं झाला ॥ कळवळा आला कांता तिच्या ॥३७॥
सुख दुःख कांहीं मानूं नको मनीं ॥ वडीलांचा आणी धाक पोटीं ॥३८॥
सोवळीं होवोनी पाकांतें सारिलें ॥ तिघांसि वाढिलें पाठीं जेवी ॥३९॥
मध्यरात्रीं त्याचे चुरी पाय अंगें ॥ तेव्हां तियेसंगें गुज बोले ॥४०॥
एकांत पाहोनी कामातुर झाला ॥ देवासी कळला भाव त्याचा ॥४१॥
मग सखूसाठीं वधूरूप झाला ॥ मनींचा पुरवीला अर्थ त्याच्या ॥४२॥
ऐशापरी त्याची होउनिया नारी ॥ प्रपंचाची वारी सारीतसे ॥४३॥
तिकडे सखूबाई पंढरीसी गेली ॥ अंघोळ सारिली चंद्रभागे ॥४४॥
स्नान तें करोनि राऊळासी गेली ॥ मूर्ति ते देखिली विटेवरी ॥४५॥
सखू म्हणे ऐके पंढरीच्या नाथा ॥ संसार मागुता देऊं नको ॥४६॥
जीत आहे तोंवरी सीमेचे बाहेरीं ॥ पाऊल श्रीहरी न घाली मी ॥४७॥
घेतलें दर्शन केली प्रदक्षिणा ॥ भरली नयना मूर्ति तिच्या ॥४८॥
तटस्थली ध्यानीं अंतरीं रंगली ॥ समाधी लागली सर्वेंद्रियां ॥४९॥
ऐसिया चिंतनें मृत्यु घडो देवा ॥ हें तुज केशवा मागतसें ॥५०॥
ऐसें म्हणतांची पावली निजधाम ॥ सोडिला तो प्राण तात्काळिक ॥५१॥
करवीरचा द्विज यात्रे आला होता ॥ त्यानें तिच्या प्रेता ओळखिलें ॥५२॥
मेळवूनी द्विज नेली चंद्रभागे ॥ दिला अग्निडाग तिजलागी ॥५३॥
इकडे रुक्माबाई विचारी अंतरीं ॥ कोठें वो श्रीहरी गुंतलेती ॥५४॥
सखूच्या पतीची कांता झाला देव ॥ कळला देहभाव विश्रांतीचा ॥५५॥
मग रुक्माबाई चंद्रभागे आली ॥ सखू सखू तीसी हांका मारी ॥५६॥
देवाचें चरित्र अगाध गाजवी ॥ करवीरा पाठवी सखूलागी ॥५७॥
चंद्रभागेहूनि पाणवठ्या गेली ॥ घरची हो आली जीवनालागी ॥५८॥
भागलीस बाई बरी यात्रा झाली ॥ येरी म्हणे घडली तुझे धर्में ॥५९॥
धांऊनिया सखू धरीत चरण ॥ चाललें स्फुंदन आलिंगितां ॥६०॥
सखू म्हणे बाई ऐसी भाक देई ॥ पुनरपि नेई पंढरीसी ॥६१॥
बरें म्हणे देव नेईन तुजला ॥ परी हें कोणाला सांगूं नको ॥६२॥
घागर घेऊनी सखू घरीं गेली ॥ विठाबाई चालली पंढरीसि ॥६३॥
यात्रेकरू आले सांगावया घरीं ॥ झाडलोट करी सखू तेथें ॥६४॥
देखोनियां द्विज विस्मित अंतरीं ॥ वर्तलें पंढरी सांगतसे ॥६५॥
जाळिला फुंकिला देह भीमातीरीं ॥ तेही कैसी घरीं नांदतसे ॥६६॥
तिचें वर्तमान सांगतां तिघांसी ॥ झाला हो तयांसी अनुताप ॥६७॥
तिघाजणां तेव्हां झाला पश्चात्ताप ॥ म्हणती महापाप घडलें आम्हां ॥६८॥
सखूचे सांगती झाले वारकरी ॥ वर्षास पंढरी जाती चौघे ॥६९॥
मध्वनाथ म्हणे संतांचे संगती ॥ अंतीं मुक्त होती साधुजन ॥७०॥
गाता ऐकतां चरित्र सखूचें ॥ बंधन यमाचें नाहीं तया ॥७१॥
हाचि छंद मज लागो निरंतरीं ॥ मुकुंदा मुरारी नारायणा ॥७२॥
तुझें नाम देवा राहो माझे चित्तीं ॥ दावी मज अंतीं तुझे पाय ॥७३॥
तुझे पायावीण नाहीं मज गती ॥ यालागी श्रीपति विनवीतसें ॥७४॥
ऐसी नानापरी प्रार्थना करोनी ॥ देवाचे चरणीं प्रीत धरी ॥७५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017
TOP