मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १ ते ११

पांडुरंगाचीं पदें - पदे १ ते ११

मध्वमुनीश्वरांची कविता


पद १ लें
पूर्वीं जो जाहला निशीथसमयीं कृष्णाष्टमी रोहिणी । मासीं श्रावण सौम्यवासरदिनीं हक्तारिसंहारिणी ॥ तो हा सिंदुरीं मध्वनाथसदनीं मार्गे बुधे रोहिणी । मध्यें शुक्ल चतुर्दशी प्रगटला गोपाळ चूडामणी ॥१॥

पद २ रें
देव घराप्रति आले ॥ भलें सार्थक जालें ॥ध्रु०॥
दसरा आम्हां हीच दिवाळी ॥ प्रभुदर्शनें सण जाले ॥१॥
कोटी जयंत्या आजि आम्हांसी ॥ अंतर सतत निवालें ॥२॥
मध्वमुनीश्वरसंतकृपेनें ॥ माझें मीपण गेलें ॥३॥

पद ३ रें
येथुनि तुमचा भाग्योदय ॥ देव आला जी सदय ॥१॥
हाचि दिवाळी दसरा ॥ दुःख मागील विसरा ॥२॥
विठ्ठल मायबाप खरा ॥ त्याचें ठाईं भाव धरा ॥३॥
लोभें आणितो माहेरीं । फिरूनि न घाली बाहेरीं ॥४॥
मध्वनाथ निरंतरीं ॥ लळित गातो गंगातीरीं ॥५॥

पद ४ थें
माथां मुगुट झळाळी । केशर - कस्तुरी मळवट भाळीं । कुरळे जावळ सांवळी । रंगम्मा माझी ॥१॥
मुक्ताफळनथ नाकीं । पीतांबरें अंग झाकी । चरणीं ल्याली वाळे वांकी । रंगम्मा माझी ॥२॥
पिवळा झगा अंगीं ल्याली । त्यावर बाजूबंद घाली । सदा दिसे सालीधाली । रंगम्मा माझी ॥३॥
खांद्यावरि कांबळी । पायघोळ लांबली । पांघरली धाबळी । रंगम्मा माझी ॥४॥
गाईपाठीं लागली । पळतां नाहीं भागली । मायबहिण चांगली । रंगम्मा माझी ॥५॥
वेणू आहे रंगीत । त्यांत गायन संगीत । दैत्य दानव भंगीत । रंगम्मा माझी ॥६॥
तुळशीसुमनहार कंठीं । उभी भीवरावाळवंटीं । वेणुनादीं काळ कंठी । रंगम्मा माझी ॥७॥
पुंडलीकें आळविली । मध्वनाथें चाळविली । शेंदुरवाडा स्थिरावली । रंगम्मा माझी ॥८॥

पद ५ वें
तीर्थें हिंडता वाटे । पायीं कांटे मोडती ॥१॥
कोठें ऊन कोठें हींव । जाणें जीव आपुला ॥२॥
कोठें आंगावई वृष्टी । व्हावें कष्टी शरीरें ॥३॥
कोठें जावें दुरीच्या दुरी । महापुरीं बुडावें ॥४॥
कोठें सोसावी तहान भूक । कैचें सुख यात्रेंत ॥५॥
कोठें कर कोठें चौकी । कोण्ही ठोकी रानांत ॥६॥
कोठें प्रवासमध्येंच । कोण्ही लुटी गरीबांसी ॥७॥
कोठें संगती खोडीक । दंड भरी पदरींचा ॥८॥
कोणी संगवास देती शिव्या । गाती ओव्या त्यावरी ॥९॥
इतुके सोसुनी सायास । जगन्निवास भेटेना ॥१०॥
उभा होता वेणुनादीं । तो सेंदुरवाडीं प्रगटला ॥११॥
जवळ सांपडली माय । कोण जाय दिगंतीं ॥१२॥
मध्वनाथासी दिली भेटी । पडली मिठी स्वरूपीं ॥१३॥

पद ६ वें
पांडुरंगे माझे मायबहिणी । तूं तरि सांगे कहाणी ॥ध्रु०॥
जिकडे पाहे तिकडे तें दुःख । कोठें नाहीं तिळहरि सुख । मिष्टान्नांत कालविलें विख । तें अन्न खातां गेली वाटे भूक ॥१॥
गिळिल्या उंडी तळमळी मासा । तैसा मज येतोहे उमासा । दयाळे किती पाहासी तमाशा । लहर आली जातो जीव माझा ॥२॥
पायवणी तुझे मज पाजी । कांहीं आहे उतारा त्यामाजी । माझा देह झिजो तुझे काजीं । मध्वनाथ आहे यासि राजी ॥३॥

पद ७ वें
पांडुरंगीं धरा प्रेम ॥ वरकड नेम सोडुनिया ॥१॥
व्रत करा एकादशी ॥ दिननिशीं कीर्तन ॥२॥
हेंचि मुक्तीचें साधन ॥ आराधन विष्णूचें ॥३॥
वरकड उपासना भ्रम ॥ तेणें श्रम पावाल ॥४॥
मध्वनाथ सांगे खरें । जेणें बरें सकळांचें ॥५॥

पद ८ वें
परिसे परिसे करुणासिंधु ॥ तुम्ही आम्ही सखे बंधु ॥१॥
कोणी कल्पियला भेद ॥ म्हणोनी वाटतसे हे खेद ॥२॥
कर्में केला अंतराय त्यासी करावें म्यां काय ॥३॥
दुरीं पडलों दिगंतीं ॥ आतां वाटताहे खंती ॥४॥
मूळ पाठवावें हरुषें ॥ लोटून येती बारा वर्षें ॥५॥
कल्प कोटी गेल्या युगें ॥ कैसें राहावेल उगें ॥६॥
याचें करुनी विधान ॥ माझें करी समाधान ॥७॥
देवालयीं द्यावी भेटी ॥ मध्वनाथ घाली मिठी ॥८॥

पद ९ वें
प्राण्या विठ्ठल विठ्ठल बोल ॥ध्रु०॥
भीमातटिं कटि दावितसे नीट ॥ नाहिं भवांबुधि खोल ॥१॥
पुंडलीकप्रिय कुंडलमंडित ॥ पाहुनि अंतरिं डोल ॥२॥
मध्वमुनीश्वर सांगतसे येणें ॥ नाहिं तुला मग मोल ॥३॥

पद १० वें
जिवलगे मायबाप विठोबा मज तारी पांडुरंगा रे ॥ध्रु०॥
नतलों नाहीं कीर्तनरंगीं घेउनि ताल मृदंगा रे । विटलों नामस्मरणीं हरिच्या घालुनि वीट पलंगा रे ॥१॥
खाउनि जेवुनि विड्या सेवुनी पानसुपारी लवंगा रे । भुललों शृंगारादि सेवुनि अंगनेच्या रंगा रे ॥२॥
अरविंदाच्या मकरंदाची आवडि जैशी भृंगा रे । दीपकलिका अलिंगितां न कळे  मरण पतंगा रे ॥३॥
संसाराच्या पायीं तो अवघा धांगडधिंगा रे । म्हणोनि शरण तुज या चरणा सोडुनि सर्वहि संगा रे ॥४॥
गंगास्नान करूनी नेई लिंग भंगा रे । मध्वमुनीश्वर याची भावें पूजी ज्योतिर्लिंगा रे ॥५॥

पद ११ वें
जीवन पंढरिनाथ । माझें ॥ध्रु०॥
कटिं कर ठेवुनि नीतचि उभा । जोडुनिया सम पाय ॥१॥
भीमातीरीं कीर्तनिं नाचे । सज्जन वंदिती पाय ॥२॥
मध्वमुनीश्वर जोडुनि पाणी । घेत अलाय बलाय ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP