श्रीकृष्णाचीं पदें - पदे ७१ ते ८०
मध्वमुनीश्वरांची कविता
पद ७१ वें
माझ्या अंगणीं कांग बाई ॥ कोकिळा ओले मधुरस्वरीं ॥१॥
कधीं भेटेल मजला देव हरी ॥ बाहू माझे स्फुरण करी ॥२॥
डावा माझा डोळाचि लवतो ॥ हातिंचा माझ्या ग्रासचि पडतो तळमळ तलमळ जीव करी ॥३॥
मध्वमुनीश्वर स्वामि रमापती ॥ शकून माझा सांगा तरी ॥४॥
पद ७२ वें
येणें माझें बाई । मानस मोहिलें पाही ॥ध्रु०॥
श्रुती जेथें परतल्या । वृत्ती जेथें हरपल्या ॥ नामरूपा विसरुनी । हरिविणें दुजे नाहीं ॥१॥
शरीराचें भान गेलें । ऐसें अभिनव केलें ॥ मीतूंपणा गिळुनिया । मध्वनाथ कांहीं बाहीं ॥२॥
पद ७३ वें
काय करूं सखये बाई हरि नाही आला ॥ध्रु०॥
तळमळ हरिवीण । मज वाटे बहु शीण । व्याकुळ जीव हा झाला ॥१॥
आतां येतों म्हणोनि गेला । कोणें भुलवूनि नेला । मजवरि घालुनि घाला ॥२॥
मध्वनाथस्वामीलागीं । जाउनिया आणा वेगीं । वृंदावनीं उमगोनि त्याला ॥३॥
पद ७४ वें
कशि ग बाई हरिविण धीर धरूं ॥ध्रु०॥
कधिं पाहीन मी डोळाभरुनी । निजकुलकल्पतरु ॥१॥
माझ्या मनिंची आवड मोठी । वरिला मी काय करूं ॥२॥
मध्वमुनीश्वरस्वामी रमापति । आवडीनें चरण धरूं ॥३॥
पद ७५ वें
कानडा कपटी मोठा फार ॥ध्रु०॥
अझुनिया नाहीं आला । निर्दय झाला कृष्ण ठकडा ॥१॥
मध्वनाथस्वामीचा हो न कळे कोणा ख्याल । येवढा कपटी मोठा फार ॥२॥
पद ७६ वें
नेणो कोणे नेणो कोणें । कृष्णजी चालविला ॥ध्रु०॥
काय करूं किती धीर । न धरवे मला । चंद्र मावळला वो ॥१॥
किंवा मध्वनाथें आजि । भावें हरिकथेमाजी । साजणी आळविला वो ॥२॥
पद ७७ वें
पंकजपाणीवीण जीव जाला वारा वो ॥ध्रु०॥
काय करूं कवणा सांगू वो ॥ आणि सये डोळ्याचा चारा वो ॥१॥
मध्वमुनीश्वरस्वामी रमापती वो ॥ त्याविण जीव न धरी धीरा वो ॥२॥
पद ७८ वें
राधे विंधिति माझे प्राण । तुझे लोचन बाण ॥ध्रु०॥
शिकल करिसी अंजन जहर । येवढें का निर्वाण ॥१॥
मध्वमुनीश्वर म्हणतो सखये । मजला दे जीवदान ॥२॥
पद ७९ वें
शिवशिव करूं मी काय ॥ राधे दाखवी तूझे पाय ॥१॥
मी जपराधी सेवक तूझा ॥ मजला करि तूं उपाय ॥२॥
मध्वमुनीश्वर म्हनतो सखये ॥ मजला भेटुनि जाय ॥३॥
पद ८० वें
शशिमुखी मज तूं करी सुखी ॥ध्रु०॥
मी अपराधी सेवक तूझा । पडली माझी चुकी ॥१॥
विरहव्यथेचें केणें माझें । तुजविण कोण तुकी ॥२॥
मध्वमुनीश्वर म्हणतो तुजला । येइल केव्हां तुकी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 27, 2017
TOP