श्रीकृष्णाचीं पदें - पदे ९१ ते १००
मध्वमुनीश्वरांची कविता
पद ९१ वें
हरि बरी मुरली वाजवितो ॥ध्रु०॥
सुरनरकिंन्नर सिद्धमुनी ॥ नारदतुंबर दिव्य गुण ॥ समाधिपासुनि माला फिरवुनी ॥ वृत्ती लाजवितो ॥१॥
मध्वमुनीश्वर कुंजवनीं ॥ व्रजवनितांना रंजवुनी ॥ रुक्मिणीवल्लभ सजणी ॥ त्रिभुवनी मन्मथ माजवितो ॥२॥
पद ९२ वें
हरि तुझी मुरली ऐकुनि गोड ॥ध्रु०॥
नीरस तरुवर फुटती निघती पल्लव मोड ॥ सखिये सजीव होतें ते स्थळीं निर्जीव खोड ॥१॥
प्रसवति वांझा गाई त्या पुरविती सर्वही कोड ॥ सखया चुरुचुरु थानें प्राशिति वत्सें न दिसती रोड ॥२॥
मध्वमुनीश्वरस्वामी तूं माझें बंधन तोड ॥ सखया निजपद आपुलें दावी तूं पुरवी सर्वही कोड ॥३॥
पद ९३ वें
मोहनरंगा गेला गेला होतासि रे कोठें । गोविंदा रात्रीं आनंद केला कोठें ॥ध्रु०॥
मुकुंदा तुझा मुखेदु जाला म्लान । गोवळा अवघा पालटला रे वान ॥ केवढा तां माझा कैसा केला अपमान । केलें तां जिचें समाधान तेचि भाग्यवान ॥ करितोसि सर्व कर्म खोटें ॥१॥
धन्य ते गोपी चंद्रानना चंद्रावळी । जीचिये सेजेवरता रमला वनमाळी ॥ सद्भावें मध्वनाथा जीवें वोवाळी । आनंदें मग्न निवाली जाली दिवाळी ॥ तिचें तें चातुर्य मोठें ॥२॥
मोहनरंगा गेला होतासि रे कोठें । सप्रेमें भेटुनि कंठीं चुंबुनि घाली मिठी ॥ आरक्त उमटलीं बोटें ॥३॥
पद ९४ वें
अगे बये नाहीं प्यालों पय ॥ध्रु०॥
व्रजललना या दाटुनि लाविती ॥ परपुरुषासी लय ॥१॥
शिकविति मजला तें कांहीं नकळे ॥ लहान माझें वय ॥२॥
मध्वमुनीश्वर म्हणतो सखये ॥ घेतो अलाय बलाय ॥३॥
पद ९५ वें
हरिनें पुरविली पाठ ॥ध्रु०॥
जातसे पाण्या येउनि अडवी वाट ॥१॥
स्वरूपमंदिरीं निजलें होतें हरिनें येउनि सोडिली गांठ ॥२॥
मध्वमुनीश्वरीं अभंगीं रचिला थाट ॥३॥
पद ९६ वें
हरि तूं लुगडें माझें सोड ॥ध्रु०॥
जाऊं दे मजला मथुरे बाजारा । देइन गोरस गोड ॥१॥
जाऊन सांगेन नंदमामंजीना । मोडीन तुझी खोड ॥२॥
मध्वमुनीश्वर मागतसे तुज । दे पायाची जोड ॥३॥
पद ९७ वें
सासूबाई आत्याबाई । या कृष्णाला सांगा कांहीं ॥ या कान्हयाला सांगा कांहीं ॥ध्रु०॥
येकटेंच येऊन येऊन नकटेंच पाहातो । मस्करी करितो बाई ॥१॥
यमुदेचे तीरीं गे गाई चारितो । निरीशीं झडतो बाई ॥२॥
दहीं दूध घेउनि मथुरेसि जातां । अडवुनि मागे दूधसाई ॥३॥
मध्वमुनीश्वर रमावर सुंदर । हरीविण दुजा ठाव नाहीं ॥४॥
पद ९८ वें
कान्हो हटीं यमुनातटीं ॥ गोरस गोपिकांचे लुटी ॥ध्रु०॥
अति लघुकटी रति धाकुटी ॥ धरी तिचि धटी तरुतळवटीं ॥ हृदयकंचुकी तटतटी ॥१॥
निजकरपुटीं चुरी कुचतटी धरी ॥ हनुवटीं करी बळकटी ॥ नुकली मध्वनाथ मिठी ॥२॥
पद ९९ वें
कृष्णें मोहित मज केलें । माझें माणुसपण गेलें ॥ मीपण चोरुनिया नेलें । तन्मय होउनि मन ठेलें ॥१॥
अगई कैसा गोपाळ । मोठा नाटकी वेल्हाळ ॥ करुनी त्रिभुवनसांभाळ । दिसतो लहानसा बाळ ॥२॥
मुरली वाजवी नेटकी वो । कोठुनि आला चेटकी वो ॥ प्रेमपाशीं अटकी वो । गोष्टि नव्हे ही लटकी वो ॥३॥
मध्वमुनीश्वरवरदाई । पडला माझीये डाईं ॥ स्वमुखें बोलूं मी काई । बोलायाची उरी नाहीं ॥४॥
पद १०० वें
याला कोणी सांगा वो बाई । सांगा वो सावळियासी बरी नीत ॥ अंगणीं आंगासी झोंबतो बाई ॥१॥
वागों नेदी मज वाटे । हाणी अंगुळीनें स्तनीं गोटे ॥ मागें मागें हिंडे जन नागर पाहती ॥ लागन मी पदीं सांगा वो बाई ॥२॥
सृष्टींत कृत्रिम ऐसें ॥ नाहीं चेष्टित तें वदूं कैसें ॥ मज श्रेष्ठपणाहुनी भ्रष्टविलें ॥ यासी इष्ट दैवत म्हणे मध्वमुनीश्वर सांगा वो बाई ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 27, 2017
TOP