खंडेरायाचीं पदें - पदे १ ते ७
मध्वमुनीश्वरांची कविता
पद १ लें
महावाक्य सील्ला अखंडीत ल्यालों । निजज्ञानखङ्गासि घेतां न भ्यालों ॥ मनाच्या तुरंगावरी स्वार झालों । अहंकारमल्लासि मरूनि आलों ॥१॥
पद २ रें
मार्तंडा तुझे पाय मी पाहीन । पुजुनि सुमनें भंडार वाहीन ॥ध्रु०॥
महीपति तुझ्या दरबारीं राहीन । संकट भारे पडतां बाहीन ॥ संसारींचें सुखदुःख साहीन । प्रसाद हरिदासांचा लाहीन ॥१॥
मैराळा गुण धणिवरि गाईन । दयाळा गुरुला शरण जाईन ॥ तयाच्या चरणतीर्थांत न्हाईन । गुरु गुरु करुनी उच्छिष्ट खाईन ॥२॥
पायर्यापुढें लोटांगण घालीन । हयपति तुजा तेजी प्रक्षालीन ॥ उजळुनि दिवटी अज्ञान जाळीन । आज्ञा श्रीमध्वनाथाची पाळीन ॥३॥
पद ३ रें
कानडें रूपडें चोखडें साबडें नाम मल्लारी । म्हाळसा लालसें राजस शोभे । दानव वंशज संहारी ॥१॥
दुर्जन मारुनि सज्जनवृंदें । रंजवि निर्जरकैवाई ॥२॥
रौरव यातना भैरव चुकवी । सेवकां गौरवीं संसारीं ॥३॥
मध्वमुनीश्वर साधक म्हणतो । शांभव पूजिती कल्हारीं ॥४॥
पद ४ थें
मैराळा तोडी संसारजाला । करूणालवाला कवळिसी निजकरीं करवाला ॥ध्रु०॥
वामभागीं शोभे म्हाळसा राजसबाळा । तुरंगाधिरूढा निजसंगें मिरविसी भैरवपाळा ॥१॥
मार्तंडा लावी भंडार माझ्या भाळा । मी येक रचीन नवीन ब्रह्मांडाची माळा ॥२॥
श्रीमध्वनाथ म्हणतो रे सखया श्रीमहीपाळा । मी प्रेम तुझें न सोडीं पडतां आभाळा ॥३॥
पद ५ वें
पूजित जा मैराळा । तुम्ही पूजित जा मैराळा ॥ध्रु०॥
हातीं फिरंग तुरंगमीं बैसुनि । दुरी करी कळिकाळा ॥१॥
डावीकडे रमणीय विराजत । ह्माळसा राजसबाळा ॥२॥
प्रेमप्रांत महीपति नांदें । भक्तजनांचा जिव्हाळा ॥३॥
जेजुरीपर्वतीं येउनि राहे रंजवि किंकरपाळा ॥४॥
अंतर बाहेर भैरव व्यापक बाप हा लेंकुरवाळा ॥५॥
मध्वमुनीश्वर चिंती निरंतर अंतरीं दीनदयाळा ॥६॥
पद ६ वें
मालोजी जोरावार ॥ध्रु०॥
जेजुरीपर्वतीं तक्त विराजे । पातशाही दरबार ॥१॥
अव्वल मल्लूखान शिपाई । करडी ते तलवार ॥२॥
खंडेरायजी त्रैलोक्याचा । घेतोहे करभार ॥३॥
कळिकाळांतिल दुर्जन मारुनि । काढी तो सरदार ॥४॥
मध्वमुनीश्वर म्हणतो माझा । सांभाळी परिवार ॥५॥
पद ७ वें
जय जय भैरव मल्लूखान ॥ध्रु०॥
खंडेराय महाबलि महीपति । शंकरजी भगवान ॥१॥
जेर किया मणिमल्ल महासुर । मारा है बैमान ॥२॥
जेजुरीमें महाराज बिराजत । होत महा घनशाम ॥३॥
सुरनर किन्नर महलके आगे । ठाडे है दरवान ॥४॥
अनहत निरंतर वाजे बजंतर । धमकत भेरि निशाण ॥५॥
मध्वनाथका सीस चरनपर । लागा है दिलध्यान ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 27, 2017
TOP