स्थलवर्णन - पदे १ ते १०
मध्वमुनीश्वरांची कविता
श्लोक १ ला
( हरशुलेश्वराचे )
भगलाचरणिं मंगलमूर्ति । वंदिला सकल पंडितधूर्तीं । तो दयाळु मज देउनि स्फूर्ति । वाढवूं भजनआवडि पूर्ति ॥१॥
बांधुनी कनकपिंग जटा कीं । उग्र शूल असुरांवरि टाकी । धाम मंगल सुमंगल लोकीं । भेटतो सगुण निष्कपटा कीं ॥२॥
तो गजासुर वधी शशिमौली । येत डुल्लत कसा हरशूलीं । शुद्ध नीर कपिला शुभ कूळीं । शूल रोवुनि बसे वटमूळीं ॥३॥
तीर्थभूमि भुवनातळिं शुद्धा । पुण्यदायक पुराणप्रसिद्धा । शैल जे सकपिला अविरुद्रा । मान्य जे विधि शिवा अनिरुद्रा ॥४॥
चंद्र सूर्य वसती निजकुंडीं । स्नानकाळिं पडीत मुखंडी । रामकृष्ण वदती जन तुंडीं । त्यांसि मुक्तिवनिता मग धुंडी ॥५॥
दर्शनें स्तविति श्रीहरसाही । त्याच तीर्थिं वसते हरसाई । सेवकांसि करि शीतल साई । जीसि पूजित असे जलशाई ॥६॥
देव सुंदर तेहतिस कोटी । गुप्तरूप वसती क्षितिपोटीं । ज्यावरी हरि कृपा करि मोठी । त्या नरासि तरि या स्थळिं लोटी ॥७॥
उत्तराभिमुख मारुति जेथें । सर्वदा विजय मंगल तेथें । जानकीसहित राघव येथें । नांदतो म्हणुनि सद्गति देते ॥८॥
ज्येष्ठ बंधु वसतो गळनिंबा । हा कनिष्ठ हृदयीं न विसंबा । लोक हो तुम्हिं त्यजूनि विलंबा । शूलपाणि हर हा अवलंबा ॥९॥
रामतीर्थ वसते अजि सीता । तेचि जन्हुतनया मुनिगीता । लोक हो जरि इचें जळ पीतां । कासया रविसुता मग भीतां ॥१०॥
नित्य राहि मनुजा हरशूळीं । बांधि मुक्तिवधुला गरसोळी । पातकें जळुनि होइल होळी । चित्रगुप्त नयना मग चोळी ॥११॥
जो महेश्वर मनोहर शूली । उद्धरील जन तो हरशूलीं । बाणलिंग म्हणवी शशिमौली । त्यासि बांधित मुनीश्वर कैली ॥१२॥
येक ते म्हणविती अतिरात्री । काळरात्रि भजती नवरात्रीं । मुख्य वैष्णव जगीं शररात्री । मध्वनाथ करितो शिवरात्री ॥१३॥
श्लोक २ रा
( गळनिंबलखमापूरवर्णन )
गौतमीनिकट दक्षिण कूळीं ॥ पूजुनी बसविला शिवशूळी ॥ गालवाश्रमिं पहा शशिमौळी ॥ त्यासी बांधित मुनीश्वर पौळी ॥१॥
अग्रहार म्हणवी गळनिंबें ॥ देत मोक्षफळ मंगळ आंबे ॥ नागनाथ सखया न विसंबे ॥ पावतो निजजना अविलंबें ॥२॥
मार्ग शुद्ध दशमीदिवशीं रे ॥ गाल्लवाश्रम मना गिवसी रे ॥ वासना जळ ते विवसी रे ॥ अंतरीं परम तूं निवसी रे ॥३॥
श्रीहरीदिनिं करूं शिवपूजा ॥ भाव सांडुनि मनींहुनि दूजा ॥ त्रिस्थळींत विचरूं सुखरूपें ॥ पातकें जळुनि जाति अमूपें ॥४॥
निंबराज जगिं कल्पतरू जी ॥ संकटें सकळ दूरि करी जी ॥ कास त्याचि दृढ आजि धरूं जी ॥ दुस्तरा भवनदी उतरूं जी ॥५॥
मार्ग शुद्ध लखमापुरिचा जी ॥ होत उत्सव बरा गिरिचा जी ॥ श्रीहरी करितसे घरिंचा जी ॥ नाहिं अन्य जनिं यापरिचा जी ॥६॥
व्यंकटेश करुणारसपात्रा ॥ भेटुनि निववूं गा निज गात्रां ॥ आदरें नमुनि वैष्णवमात्रा ॥ पाहुं घन्य लखमापुरियात्रा ॥७॥
तारि जो जन भवांबुधिच्या पुरीं ॥ चारि मुक्तपुरिची मथुरा पुरी ॥ जो कृपा करितसे अखमा पुरी ॥ तो रमापति वसे लखमापुरीं ॥८॥
रामेश्वरीं समर्पिल बिल्वपत्रें ॥ नांदेल तो जगिं धरातलिं पुत्रपौत्रें ॥ वर्णील जो गिरिसुतापतिचीं चरित्रें ॥ त्याचीं कुळें सकळही मग तीं पवित्रें ॥९॥
गुंफेमधें करिल नर्तनकीर्तनासीं ॥ त्याची महेश्वर पहा अपकीर्त नासी ॥ तीर्थप्रसाद जरि सेविल येक लाही ॥ जिंकील तो रिपुगणा जरि येकलाही ॥१०॥
रामनाथ घृष्णेश्वर एका ॥ जाणुनी करिति जे अभिषेका ॥ दर्शनें हरतसे भवशोका । प्राप्त होय मग त्या शिवलोका ॥११॥
विभूतितें लावुनिया निजांगा ॥ रुद्राक्षमाळा धरिती अभंगा ॥ जे पूजिती भाविक बाणलिंगा । त्या शांभवाच्या शिरिं जाण गंगा ॥१२॥
एक ते म्हणविती अतिरात्री ॥ कालरात्र भजती नवरात्रीं ॥ मुख्य वैष्णव जगीं शररात्री । मध्वनाथ करितो शिवरात्री ॥१३॥
अभंग ३ रा
( शेंदुरवाडेंवर्णन )
उत्तरेसि देवगिरी ॥ दक्षिणेस गोदावरी ॥१॥
मध्यें पुण्यवंत भूमी ॥ सिद्ध साधक सेवा तुम्ही ॥२॥
याहीमध्यें शेंदुरवाडें ॥ व्यासें कथिलेसे निवाडे ॥३॥
सामराज संनिधानीं ॥ देवाजीची राजधानी ॥४॥
पुराणप्रसिद्ध ॥ मध्वनाथ निवडी शुद्ध ॥५॥
कोठें जावें दुरिच्या दुरि ॥ महापुरीं बुडावें ॥६॥
कोठें सोसावी तहान भूक ॥ कैचें सुख यात्रेंत ॥७॥
कोठें कर कोठें चवकी ॥ कोण्ही ठोकी रानांत ॥८॥
कोठें प्रवास मध्येंच ॥ कोण्ही लुटि गरिबासी ॥९॥
कोठें संगाती खोडीचा ॥ दंड भरि पदरींचा ॥१०॥
कोण्ही संगवास देति सिव्या ॥ गाती वोव्या त्यावरि ॥११॥
इतुके सोसुनि सायास ॥ जगन्निवास भेटेना ॥१२॥
उभा होता वेणुनादिं ॥ तो सेंदुरवाडीं प्रगटला ॥१३॥
जवळ सांपडली माय ॥ कोण जाय दिगंतीं ॥१४॥
मध्वनाथासी दिली भेटी ॥ पडली मिठी स्वरूपीं ॥१५॥
अभंग ४ था
परिसा परिसा वैनायकहो । परशुधारी वरदायकहो ॥१॥
धुंडिराजउपासकहो । अविमुक्तनिवासकहो ॥२॥
तुम्ही म्हणवितां चतुर । याचें द्यावें जी उत्तर ॥३॥
गजानन वरेण्यासि । उद्धरिलें कवण्या देसीं ॥४॥
स्वमुखें महेशानें गीता । कथुनि उपदेशिला पिता ॥५॥
ऐसें दावा दुसरें गांव । जरि आसल तुम्हां ठावें ॥६॥
राजसदन या नांव । कवण्या क्षेत्रातें म्हणावें ॥७॥
कमळाचें नाभिकमळ । पीठ दाखवा निर्मळ ॥८॥
पांचा सहस्रावर्षांच । चुका उगउनि द्या साचा ॥९॥
शुक योगींद्राचें तान्हें । कोडें घातलें जी त्यानें ॥१०॥
उद्धराया भूमंडळ । प्रगट जाला कुमंडळ ॥११॥
येथें घालुनियां ठाणें । भावें रोविलें निशाण ॥१२॥
मध्वनाथ सेंदुरवाडा । याचा पुसतो जी निवाडा ॥१३॥
श्लोक ५ वा
क्षेत्र नासिक धरातळिं आहे । मध्वनाथ कवि ज्या स्थळिं राहे ॥ गौतमीजवळ सुशीतळ वाहे । साधका परम कौतुक पाहे ॥१॥
ठाण मांडुनि उभा जगजेठी । नित्य येति सनकादिक भेटी ॥ राममूर्ति भुवनत्रयिं मोठी । वर्णिताति महिमा शतकोटी ॥२॥
सेवि तूं विमल पंचवटी रे । पापताप अवघें निवटी रे ॥ त्या स्थलीं करुनि पर्णकुटी रे । सिद्ध होऊनि यमास कुटी रे ॥३॥
सेवितांच अरुणा वरुणा रे । वृद्ध होइल नवा तरुणा रे ॥ स्नानदान करितां स्मरणा रे । राम त्यावरि करी करुणा रे ॥४॥
पूर्ववाहिनि सरस्वति जेथें । नित्य वैष्णवसमागम तेथें ॥ नीळकंठ गतिदायक सर्वां । सेवि तूं त्यजुनि वैभवगर्वा ॥५॥
तीर्थराजमहिमा न कळे रे । दर्शनेंकरुनि दुःख जळे रे ॥ त्या स्थळीं वसति पंडितवृंदें । वेदघोष करिती द्विज छंदें ॥६॥
अस्थिचें उदक ज्या स्थळिं होतें । तीर्थ पावन अगाध अहो तें ॥ शंभुच्या हरुनि ब्रह्मकपाटा । पातकें पळति सर्व तिवाटा ॥७॥
रुक्मिणीरमण विठ्ठल भोळा । पुण्यवंत पाहाती निजडोळां ॥ दक्षिणेस विलसे बळराम । पांडुरंग भज मंगलधाम ॥८॥
पाहतां नयनिं त्या नरसिंहा । साधका भवरिपू निरसी हा ॥ चिंतिल्या सकळ दोष निवारी । कामना पुरवितो शनिवारीं ॥९॥
पाहतां नयनिं त्या हनुमाना । मूर्ख लोक करिती अनुमाना ॥ तीर्थरक्षक उभा उमजाना । रामदूत हृदयांत भजाना ॥१०॥
इंदिरारमण तो जलशाई । तापल्यास करि शीतल साई ॥ पाहतां विमल सुंदर डोहा । काळशत्रु मतिमंद रडो हा ॥११॥
चक्रतीर्थमहिमा वदवेना । देखतांच पळते कलिसेना ॥ पूजितां शिवसनातन भावें । दर्शनेंकरुनि निर्मळ व्हावें ॥१२॥
मुक्त ईश्वर उमापति वंदी । स्वर्गींचें सुख अमंगल निंदी ॥ विघ्नराज हनुमंत पहातां । सर्व सौख्य मग येईल हातां ॥१३॥
पाहतां नयनिं शूर्पनखा रे । पाप कायिक कदापि न थारे ॥ ब्रह्मयोनि चुकवी चवर्यायशी । सेविं सप्तऋषिंच्या विवरासी ॥१४॥
सांडुनी सकळ देहअहंता । पूजि तूं विमळ संतमहंता ॥ हा उपाय तुजलाच तराया । सोडि पोकळ वृथा चतुरा या ॥१५॥
श्लोक पंचदश हे यमकाचे । ऐकतां श्रवणिं तो यम काचें ॥ काळमृत्यु झगडूं न शके रे । संकटें इतर तें मशकें रे ॥१६॥
श्लोक ६ वा
सेवि तूं विमल पंचवटी रे । पापताप अवघें निवटी रे ॥ त्या स्थळीं करुनि पर्णकुटी रे । सिद्ध होउनि यमासि कुटी रे ॥१॥
विराजे श्रीगंगातटनिकट सत्क्षेत्र बरवें । सदा जेथें सीतेसहित सगुण ब्रह्म मिरवे ॥ जयानें संग्रामीं असुर वधिले कंटक तिन्ही । तयाला चिंतावें हृदयभुवनीं या अनुदिनीं ॥२॥
विराजे वामांगीं जनकतनया सौख्यसदना । विलोकी श्रीरामा कमलनयना हास्यवदना ॥ सुवर्णाच्या कांतीपरिस वपुलावण्य विलसे । घनश्यामीं रामीं अचल मज सौदामिनी दिसे ॥३॥
जनस्थानीं नांदे अतिसबळ दुर्गा नवकरे । महालक्ष्मीचें जें नगर वर देतें निजकरें ॥ प्रयागापेक्षाही अधिक अरुणासंगम वसे । महाराजा जेथें पशुपति कपालेश्वर वसे ॥४॥
पिता माता भ्राता स्वजन तिळभांडेश्वर सखा । अनाथाला देतो अमित गुणसिंधू निजसुखा ॥ मठीं संन्याशाच्या अझुनिवरि सांभाळ करितो । तयाचे आचार्या हृदयकमळीं ध्यान धरितों ॥५॥
बिराजे श्रीगंगातटनिकट ते पंचवटिका । वसे जीवा तेथें करुनि बरवी पर्णकुटिका ॥ वदावें वैदेहीरमणचरणा येक घटिका । करी तेणें पुण्यें सकल मग संसारसुटिका ॥६॥
जनीं काव्यें भव्यें कविवर अनेकें विरचिती । विनाप्रेमें नेमेंकरुनि गुणवंता न रुचती ॥ प्रसादें देवाच्या सरस कविता सर्व रुचते । अशी आचार्याच्या हृदयकमळीं युक्ति सुचते ॥७॥
जनस्थानीं नांदे द्विजवर सदा त्रिंबक कवी । तयाच्या काव्याचा चतुर रस जाणे अनुभवी ॥ जयाची हे वाणी विषयरसशृंगार दिसते । जगीं ते गायत्री मुनिजनमनामाजि वसते ॥८॥
अभंग ७ वा
( त्रिंबकक्षेत्रवर्णन )
जय जय जय जय ब्रह्मगिरी । झुळझुळ गंगा वाहे शिरीं ॥१॥
तीर्थें साडेतीन कोटी । गंगाद्वाराचे पोटीं ॥२॥
कोळंबी कानीळ अंबा । भुवनेश्वरी स्वयंबह ॥३॥
धन्य त्रिसंध्या क्षेत्र । पाहातां निवती हे नेत्र ॥४॥
तपोनिधि गौतम । यांचा आश्रम उत्तम ॥५॥
पिकऊन साळी तात्काळ । करितो मुनिजनप्रतिपाळ ॥६॥
कुशावर्त कनखळ । पुण्यपावन निखळ ॥७॥
तीर्थराजाचे कांठीं । योगीश्वरांची दाटी ॥८॥
सभाग्य लोक ते येक । करिती रुद्रा अभिषेक ॥९॥
पूजा षोडश उपचारीं । होते केदारेश्वरीं ॥१०॥
मध्वमुनीश्वर पवित्र । गातो महिम्नस्तोत्र ॥११॥
अभंग ८ वा
( भोगुरक्षेत्रवर्णन )
क्षेत्र भृगूचें भोगुर । पाहातां विघ्नें होती दूर ॥१॥
कोलेश्वर भगवंता । नरहरि हनुमंता ॥२॥
अंबा भैरव खंडेराव । तिहीं वसविला ठाव ॥३॥
मुख्य चिंतामणीचें स्थान । पाहातां होतें समाधान ॥४॥
जेथें वाहे भार्गव गंगा । स्नानें उद्धरिते जगा ॥५॥
माघ शुद्ध चतुर्थीस । पूजूं मंगळमूर्तीस ॥६॥
दारणेचा पाणवठा । भावें भजूं गणनाथा ॥७॥
शमी शेंदूर दूर्वा वाहा । मूर्ति मोरयाची पाहा ॥८॥
यारे जनहो खणोनि काढूं । माझ्या सिद्धोबाचे लाडू ॥९॥
हे तों अभिनव झाली गोष्टी । भक्तीं विचारावी पोटीं ॥१०॥
कलियुगीं कौतुक पाहा । हात जोडुनि उभे राहा ॥११॥
म्हणे मध्वनाथमुनी । मूर्ति सांपडली जुनी ॥१२॥
अभंग ९ वा
कृपा केली विनायकें । भुक्तिमुक्तिप्रदायकें ॥१॥
देव कृपाळू कृपाळू । करी भक्तप्रतिपाळू ॥२॥
पहा जन हो चमत्कार । कलियुगीं साक्षात्कार ॥३॥
दिव्य मोदकांच्या खाणी । दावी मजला परशुपाणी ॥४॥
प्रगट गोवर्धनीं शुद्ध । जनस्थानीं तें प्रसिद्ध ॥५॥
मोहत्कट देव विकट । त्यानें दाखविल्या निकट ॥६॥
सोडुनि विकल्पाच्या गांठ । पहा दारणेच्या कांठीं ॥७॥
विनायकउपासकीं । गोष्ट शोधावी नासिकीं ॥८॥
सिद्धभूमी गंगातीरीं । प्रगट केल्या मुनीश्वरीं ॥९॥
उपळ मोटकासारिखें । कोण्या तीर्थीं आहेत निकें ॥१०॥
ऐसें दाखवी जो कोणी । त्याचे चरण वंदिन दोन्ही ॥११॥
म्हणे मध्वनाथ योगी । शर्त केली कलियुगीं ॥१२॥
अभंग १० वा
गंगातीरीं गोवर्धन । मुख्य काण्णवाचें स्थान ॥१॥
ज्यासि क्षुधांबा प्रसन्न । दिल्हें त्यासी दिव्यान्न ॥२॥
आतां हिंडावें ते कोणें । धूर्त पापीं मुक्त होणें ॥३॥
उत्तरतीरीं जमदग्नी । जैसा प्रज्वलित अग्नी ॥४॥
त्याचें दैवत परशुपाणी ।तेथें मोदकांची खाणी ॥५॥
शुद्ध मोदकांची भूमी । पाहा कश्यपासंगमीं ॥६॥
माघशुद्ध चतुर्थीस । पूजूं मंगळमूर्तीस ॥७॥
रात्रीं करूं जाग्रण । कथाकीर्तनपुराण ॥८॥
जाळी मानसें मळीनें । ऐसें केलें या कळीनें ॥९॥
सिद्ध लाडू खणोनि काढूं । दांत कळिकाळाचे पाडूं ॥१०॥
आपुलें सर्वस्वही वेंचूं । तोंडें नास्तिकांचीं ठेंचूं ॥११॥
छत्र मोरयावरी धरूं । सुखें सामराज्य करूं ॥१२॥
म्हणे मध्वनाथ कवी । येथें यात्रा भरितो नवी ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017
TOP