मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे १३१ ते १४०

स्फुट पदें - पदे १३१ ते १४०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद १३१ वें
संसार दुःखमूळ ॥ध्रु०॥
तनमनधन हें ज्याचें त्याला । होतें हें प्रतिकूळ ॥१॥
स्वजन सुतादिक इतरें याला । कैचि ते अनुकूळ ॥२॥
विषवल्लीचीं मधुर फळें तुज । रुचती जैसा गूळ ॥३॥
तस्कर न्हाला धाला त्याचा । खांद्यावरतां सूळ ॥४॥
मध्वमुनीश्वर म्हणतो सखया । शेवटीं अवघी धूळ ॥५॥

पद १३२ वें
संसार छंद टाका टाका टाका संसार ॥ध्रु०॥
कैचा आपा कैचा बापा कैचा कोठील काका । कैच्या बहिणी कैच्या विहिणी कैची आई आका ॥१॥
विकळ शरीरा देखुनि पोरें रडती देती हांका । लेकुरवाळी बाइल म्हणते आतां याला झांका ॥२॥
वैराग्याचें कारण येवढें सावध होऊनि ऐका । मध्वनाथा शरण रिघावें वांटुनि अवघा पैका ॥३॥

पद १३३ वें
सोडा सोडा दुर्जनसंग सोडा ॥ध्रु०॥
संतसमागम धरुनी त्याच्या ऐका गोष्टी गोडा ॥ ज्ञानखङ्गेंकरुनी आधीं बंध जीवाचा तोडा ॥१॥
सावध होऊनि या विषयाचा अवघा खेळ मोडा ॥ हरिभजनाचें आयुध होउनि काळाचें शिर फोडा ॥२॥
मध्वनाथ म्हणतो आतां उरला अवसर थोडा ॥ येवढा होतो नाश जीवाचा नाहीं याला जोडा ॥३॥

पद १३४ वें
प्राण्या तूं सज्जनसंगति जोड ॥ध्रु०॥
दुर्जनसंगति देईल दुर्गति । दुर्मद दुर्मति सोड ॥१॥
मध्वमुनीश्वर साधुसमागम । सेउनि जाला गोड ॥२॥

पद १३५ वें
धन्य ते साधुसंत अति पुण्यवंत हो । घेतां भक्तांचीं नांवें पातका अंत हो ॥ध्रु०॥
जयाची आवडि आहे सर्वोत्तमीं हो । तयाच्या तीर्था सेवी श्रीगौतमी हो । सुखरूप राहति जेथें ते पुण्यभूमि हो । जनहो तयाची करा सेवा तुम्ही हो ॥१॥
महिमा सिद्धाचा वर्णिते वेदवाणी हो । मस्तकीं आज्ञा वंदी श्रीचक्रपाणी हो । सायुज्यमुक्ति वाहे घरांत पाणी हो । मुक्ताच्या दर्शनमात्रें तरताती प्राणी हो ॥२॥
लीलाविग्रही माझा श्रीराम जैसा हो । सज्ञानी करिती अवघा वेवहार तैसा हो । श्रीमध्वनाथस्वामीस नलगे तो पैसा हो । ऐशाला समजेना जो तो मूर्ख म्हैसा हो ॥३।

पद १३६ वें
संतसंगें अंतरंगें नाम बोलावें । कीर्तनरंगीं देवासन्निध सुखें डोलावें ॥ध्रु०॥
सगुणचरित्रें परमपवित्रें सादर वानावीं । निरभिमानें सज्जनवृंदें आधीं मानावीं ॥१॥
भक्तीज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या । मनोभावें वैराग्याच्या युक्ती विवराव्या ॥२॥
जेणें चित्तीं मूर्ति ठसावें सत्वर श्रीहरिची । ऐसी कीर्तनमर्यादा हे संतांचे घरिंची ॥३॥
श्रवणें मननें नामघोषें वाजवी करटाळी । मध्वनथ जीवन्मुक्त जाला कळिकाळीं ॥४॥

पद १३७ वें
किती येसी जासी प्राण्या गर्भवासीं रे ॥ध्रु०॥
या भवपाशीं अवघें विनाशी । येथें नाहीं मिरासी ॥१॥
धरूं नको आस उपजूं दे त्रास । काळ करितो ग्रास ॥२॥
मध्वनाथ हित सांगतो बहुत । होतां बरें अवधूत ॥३॥

पद १३८ वें
देवाचिये पायीं भाव तुझा नाहीं रे ॥ध्रु०॥
म्हणुनिया पाही पडसी अपायीं । फिरसी बहुतां ठाई ॥१॥
संसाराच्या योगें विषयांच्या भोगें । पीडला जासी रोगें ॥२॥
मध्वनाथीं तुज न पडे उमज । ऐसी नव्हे हे बोज ॥३॥

पद १३९ वें
किती गर्भवासीं । प्राण्या व्यर्थ येसी जासी ॥ध्रु०॥
विषयाच्या सुखासाठीं । करिसी तूं आटाआटी ॥ त्याचि सुखा भुलतोसी । जैसी गुळावरील मासी ॥१॥
माझें माझें म्हणतोसी । चौर्‍ह्यायसींत सिणतोसी ॥ मध्वनाथ म्हणे अंतीं । भोगिसी दुःखाच्या राशी ॥२॥

पद १४० वें
ऐसें कीर्तन काय रे । भिन्न अभिप्राय रे । सासू गेल्या सून जैसी मोकलीते धाय रे ॥ध्रु०॥
कथेमधें लोळणें । प्रेमें डोळे चोळणें ।  भावाविरहित डोळणें तें अवघें पोकळ बोलणें ॥१॥
सप्तस्वरीं गात रे । दावी धात मात रे । हृदयीं घातपात त्याला कैचा मध्वनाथ रे ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP