मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ११ ते २०

सद्गुरुचीं पदें - पदे ११ ते २०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद ११ वें
काय द्यावें सद्गुरुभाग्यवंता वो । जेणें माझी वारिली भवचिंता वो ॥ वारुनि चिंता लावियलें मोक्षपंथा वो । मोक्षपंथीं दाविलें भगवंता वो ॥१॥
ज्याच्या भजनें जालें हें भवभंजन वो । करितां सेवा होतसे मनोरंजन वो ॥ नयनें माझ्य घालुनि ज्ञानांजन वो । जिकडे तिकडें दाविलें निरंजन वो ॥२॥
शरण जातां वेधिलें जीवें प्राणें वो । परतुनि येतां खुंटलें येणें जाणें वो ॥ तन्मय जाल्या वर्तलें काय जाणें वो । मध्वनाथीं भाविका श्लाघ्यवाणें वो ॥३॥

पद १२ वें
तो मज दावा सद्गुरु दीनबंधु वो । ज्याच्या स्मरणें तरिजे भवसिंधु वो ॥ नांव त्यचें सच्चिदानंदकंदु वो । त्याचा मजला लागला सये छंदु वो ॥१॥
कैसी चुकलें सद्गुरुमायबापा वो । त्याच्या विरहें पावलें अनुतापा वो ॥ न करी आतां सर्वथा काळक्षेपा वो । चुकवी माझ्या चौर्‍यासी लक्ष खोपा वो ॥२॥
ऐकुनि धांवा पावला सद्गुरुराजा वो । जिवलग तो हा कैवारी या माझा वो ॥ दर्शनमात्रें तोडिला हवफांसा वो । मध्वनाथीम तारिलें निजदासा वो ॥३॥

पद १३ वें
त्याचा मजला लागला सये वेधु वो । जेणें निजस्वरूपीं केला बोधु वो ॥ ज्याचे स्वरूपीं तल्लीन अवघे साधू वो । समरस झालें गळला भेदाभेदु वो ॥१॥
जागृति स्वप्न सुषुप्ति मजला नाहीं वो । काय जाली अवस्था माझी पाही वो ॥ समाधिसुख खेळतें माझे ठायीं वो । मायातीत दिसतें कांहें बाही वो ॥२॥
गेली माझी तहान आणि भूक वो । आतां कैचें संसारभयदुःख वो ॥ महावाक्य ऐकतां गुरुमुखें वो । मध्वनाथीं पावलें निजसुख वो ॥३॥

पद १४ वें
पुरले माझे सकळ मनोरथ वो । जेव्हां नयनीं देखिले गुरुनाथ वो ॥ दर्शनमात्रें होतसे शक्तिपात वो । ज्याच्या भजनें जालें मी मायातीत वो ॥१॥
गेली माझी संसार भवदशा वो । गुरुरायें दाविलें जगदीशा वो ॥ त्याचें रूप पाहतां दाहे दिशा वो । येकायेकीं पावलों अनिर्देशा वो ॥२॥
साधुसंगें तो शांतिरस प्यालें वो । तेणें निजठायासी कैसी आलें वो ॥ गुरुकृपें अद्वैतबोधें धालें वो । मध्वनाथीं सहज मुक्त जालें वो ॥३॥

पद १५ वें  
दुर्जन वोंगळ वोंगळ । आळशी अमंगळ ॥ विषयीं रंगल रंगल । परमार्थीं खंगल ॥१॥
गुरुला धिक्कारी धिक्कारी । नरकाचा अधिकारी ॥ मानस विकारी विकारी । सदाचा भिकारी ॥२॥
ऐसा पातकी पातकी । विश्वासघातकी ॥ अवगुण न टाकी न टाकी । कठीण परिपाकी ॥३॥
स्वहितीं अंधक अंधक । मध्वनाथीं निंदक ॥ अद्भुत चुंबक चुंबक । फजीत करितो त्रिंबक ॥४॥

पद १६ वे,
सांडुनी आळसा आळसा । विषयीं धरुनि चीळसा ॥ न करा वळसा वळसा । साधन न्यावें कळसा ॥१॥
नरतनु उपयोगी उपयोगी । सांगतो शुकयोगी ॥ जाणें यमापें यमापें । काळ गणितो मापें ॥२॥
राघव भजावा भजावा । सांडुनी सर्व अभावा ॥ सद्गुरु उमगावा उमगावा । मध्वमुनीश्वर गावा ॥३॥

पद १७ वें
हा ठाऊ गुरुभेटाऊ चेला । दोघाजणीं बरा उदीम केला ॥१॥
आवळा घालुनि काढितो बेला । गुरुनें शिष्य भोंदुनि नेला ॥२॥
गुरु नव्हे तो केवळ हेला । शिष्य बोधावीण जीतचि मेला ॥३॥
अविद्येचा वेल मांडवा गेला । त्याखालें सुखरूप कोण निजेला ॥४॥
शिष्य विरक्तीचा नाहीं भुकेला । मुक्तीचा स्वयंपाक व्यर्थचि गेला ॥५॥
शुद्ध परमार्थाचा फाटला सेला । मध्वमुनीश्वर विस्मित ठेला ॥६॥

पद १८ वें  
ऐसा साधक पैं नाहीं । साधनमागीं चाले ॥ध्रु०॥
शमदम उपरति नलगे कोणा कैसें कौतुक पाही । जें तें प्राणी इच्छितें हें प्रसाद कांहीं बाही ॥१॥
विषयीं मानस बरवें रमतें फिरतें दिशा दाही । नामरसायन सेउनि कोण्ही न पडे याचे डाईं ॥२॥
शांति तितिक्षा विषयविरक्ति हें तों कोठें नाहीं । मध्वनाथ म्हणे सिद्ध जो तो आपले ठायीं ॥३॥

पद १९ वें
ऐसा सद्गुरु पैं नाहीं साधनमार्गीं लावी ॥ध्रु०॥
साधकाच्या हृदयसरोजीं सीतावल्लह दावी । ऐसा सद्गुरुराज तयाची लीला काय वदावी ॥१॥
आपण इच्छी शिष्याची ते मूळ अविद्या जावी । निवृत्तिमार्गीं लावुनि त्याची सुबुद्धि अंतरीं भावी ॥२॥
श्रीशुकयोगींद्राचा लीला नाहीं कोण्हा ठावी । मध्वनाथा भजेल त्याला उत्तम सद्गति द्यावी ॥३॥

पद २० वें
नाहीं नाहीं संसार खरा नाहीं । ऐसें जाणुनि सावधान राही ॥१॥
कैचें रजत शुक्तिकेचे ठायीं । दृश्य मृगजळवत पाही ॥२॥
अनिर्वाच्य आहे कांहीं बाहीं । तेंचि तुझें निजरूप पाही ॥३॥
मध्वनाथा सद्गुरुचे पायीं । लीन होई लवणजलन्यायीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP