मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे ११ ते २०

परिशिष्ट पदे - पदे ११ ते २०

मध्वमुनीश्वरांची कविता


अभंग ११ वा
कोटिमदनाची शोभा । विठ्ठल ईतेवरि उभा ॥१॥
तो हा पंढरीचा हरि । पहा जनहो डोळेभरी ॥२॥
देव सांवळा सगुण । हृदयीं श्रीवत्साची खूण ॥३॥
पुंडलीकाच्या प्रसादें । पावन केलें सेंदुरवादें ॥४॥
मध्वनाथाचें दैवत । त्यासी घाला दंडवत ॥५॥

अभंग १२ वा
दोन्ही जोडुनी हस्तक । पाईं ठेऊनी मस्तक ॥१॥
तुम्हीं असा चिरंजीव । देवा भाकितों हे कींव ॥२॥
आतां आपल्या गांवा जावें । प्रतिवर्षीं यात्रे यावें ॥३॥
माझा विसर न पडो । सेवा विठोची हे घडो ॥४॥
मध्वनाथाचा प्रसाद । द्यावा सकळीं आशिर्वाद ॥५॥

अभंग १३ वा
तुम्हीं सनकादिक संत । म्हणवितां कृपावंत ॥१॥
वारकरी पंढरीचे । अंतरंग श्रीहरिचें ॥२॥
माझी येऊं द्या करुणा । विनवा पंढरीचा राणा ॥३॥
येवढा करा उपकार । सांगा देवासी नमस्कार ॥४॥
मध्वनाथासी आठवा । मूळ लौकरी पाठवा ॥५॥

अभंग १४ वा
मायबहिणी चंद्रभागे । तुझा बिंदु ज्यासी लागे ॥१॥
तोचि होतो चतुर्भुज । त्यासी भेटे गरुडध्वज ॥२॥
येवढा अगाध महिमा । जेथें स्थीर वाहे भीमा ॥३॥
पांडुरंगक्षेत्रवासी । त्याच्या भुक्तीमुक्ती दासी ॥४॥
कैचें पाप्यासी पंढरपूर । पुण्यवंतासी नाहीं दूर ॥५॥
मध्वनाथ म्हणे विठो भेटो सर्वही संशय तुटो ॥६॥

अभंग १५ वा
पूर्ण सौभाग्याची सरिता । स्मरणें निरसी दुरिता ॥१॥
वज्रचुडेमंडित तूं । कंठीं शोभे आहेवतंतू ॥२॥
ते तूं माझी रुक्मिणी माता । करुणा भाकी पंढरीनाथा ॥३॥
माहेरासी न्याव्या लेकी । त्यांत सांडुनि द्याव्या येकी ॥४॥
हें तों बर्‍यांत न पडे । गेलीं ब्रीदें कोणीकडे ॥५॥
येकीवरि करणें लोभ । दुजीवरी धरणें क्षोभ ॥६॥
बहुत वाटत आहे खंती । हेचि सर्वज्ञा विनंति ॥७॥
मध्वनाथाचा सादर । सांग देवासी नमस्कार ॥८॥

अभंग १६ वा
सूर्य आपुल्या किरणा । न विसंबे नारायणा ॥१॥
तैसें न्यावें पंढरपुरा । चंद्रभागा सरोवरा ॥२॥
लोहचुंबकाचेपरी । मज आकर्षावें हरि ॥३॥
कळा सूत्र तुझें हातीं । ऐसें वेदशास्त्रें गाती ॥४॥
मध्वनाथाचा तूं स्वामी । म्हणवीसी अंतर्यामीं ॥५॥

अभंग १७ वा
कां रे रुसलासी न बोलसी फुका । जास तूं मुका आधांतरिं ॥१॥
फार माझेविषयीं केली डोळेझांकी । अझुन तरी टाकी आळस बापा ॥२॥
ऐकोनी करुणा न देसी उत्तर । जालासी तूं पुरा श्रवणीं मंद ॥३॥
ईटेवरी नीट राहतां तटस्थ । गेला पै नेमस्त माझा तुझा ॥४॥
कटावरि कर ठेवियेले या गुणें । पडलें तुझें उणें फार येथें ॥५॥
चालायाचें तुझें सामर्थ्य पै गेलें । ऐसें टोणे केले कोणीं येकें ॥६॥
पंढरीच्या रानींण भारूनि टाकिलें । मोघम राखिलें देवपण ॥७॥
मध्वनाथ म्हणे गौन पाहिलें । भले पछाडिलें पुंडलीकें ॥८॥

अभंग १८ वा
अहो परिसाची महिमा । वारी लोहाची काळिमा ॥१॥
तैसें तुम्ही नारायणा । पालटावें माझ्या मना ॥२॥
हा तो वस्तूचा स्वभाव । पूर्वीं करूनि गेला देव ॥३॥
हें तों अन्यथा होईना । गंगा उफराटी वाहीना ॥४॥
गांवांतील खळमळ । वोहळ होती गंगाजळ ॥५॥
मध्वनाथ म्हणे देवा । मनोरथ सिद्धी न्यावा ॥६॥

अभंग १९ वा
भक्तीउदीम नेटका । अमूप जोडतो हे टका ॥१॥
उदीम केला पुंडलीकें । निधान जोडियेलें निकें ॥२॥
भक्त भाविकांसाठीं । ठेवियेलें भीमातटीं ॥३॥
कोण्ही पाहिजे पायाळ । सद्गुरू पुंडलीक दयाळ ॥४॥
ज्ञानअंजन लेववितो । आपलें निधान दावीतो ॥५॥
निजभावबळें घेणें । समूळ जीवबळ देणें ॥६॥
तरीच येईल हातां । शरण जाये रे सद्गुरुनाथा ॥७॥
उदंड जाले भाग्यवंत । दास कलयुगीं सांप्रत ॥८॥
बहूतांसी पुरूनी उरलें । नाहीं अद्यापि सरलें ॥९॥
मध्वनाथाचें ठेवणें । सांपडतें पूर्वपुण्यें ॥१०॥

पद २० वें
विठोबा पाहिला पंढरीचा । यात्रेस जाईन धणिवरी गाईन । दास मी श्रीहरिचा ॥१॥
दिंड्या पताकाचा । गरुड टकीयाचा । भार नानापरिचा ॥२॥
टाळमृदंगाचा । चंगउपांगाचा । ध्वनी चिदंबरींचा ॥३॥
वैष्णव गाती गाणें । नृत्य राजसवाणें । वीणा उंचस्वरींचा ॥४॥
वेणुनादा आलों । काला खाउनी धालों । गोपाळाच्या करीं ॥५॥
आतां सुखें नाचों । अमर होउनी नाचो । वेध त्या मोहरीचा ॥६॥
हरिदास महाद्वारीं । गर्जती जैजैकारीं । सुस्वर झलरीचा ॥७॥
अवघे चतुर्भुज । दिसती गरुडध्वज । स्वामी सर्वांतरींचा ॥८॥
मध्वमुनीश्वर । आळवी सुस्वर । राग अवसरीचा ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP