सद्गुरुचीं पदें - पदे ३१ ते ४६
मध्वमुनीश्वरांची कविता
पद ३१ वें
ऐसा माझा अनुभव साजणी । जेथें गेली वैखरी लाजुनी ॥ध्रु०॥
येकमन जालिया स्वाधीन । आणिक कांहीं नलगे साधन ॥ सद्गुरुचें केलें आराधन । तेणें माझें जालें समाधान ॥१॥
रज्जुवरी जैसा भासे व्याळ । अधिष्ठानीं तैसें मायाजाळ ॥ कल्पनेचा खेळ तो टवाळ । कल्पनातीत वस्तु मी विशाळ ॥२॥
गळित जाल्या देहाचा अभिमान । सर्वत्र भासे चैतन्य समान ॥ येथें कांहीं न करी अनुमान । मध्वनाथ प्रत्यक्ष भगवान ॥३॥
पद ३२ वें
अनामा तुज काय मी बाहू रे । अरूपा तुज काय मी पाहूं रे ॥ निर्गुणा गुण केविं मी गाऊं रे । व्यापका कोठें भेटाया जाऊं रे ॥१॥
घरीं बसल्या जाली कार्यसिद्धी । सेवक जाले निषेध आणि विधी ॥ समाधीचा वाटला उपाधि । सांपडला सद्गुरु कृपानिधि ॥२॥
श्रीशुकयोगींद्राचें मी लेंकरूं । धालेपणें देतसें ढेकरूं ॥ अनाथांचा म्हणवी जो सुरतरू । तेणें केली संसारीं सुरखुरु ॥३॥
तयाचा काय मी होऊं उतराई । नकळे कवण्या स्वामीची चतुराई ॥ मजवरी धरिली छत्रसाई । मध्वनाथ जाल्ला शेषशाई ॥४॥
पद ३३ वें
कै मज भेटेल गे सद्गुरु कै मज भेटेल गे ॥ध्रु०॥
तनमनधन गुरुचरणीं अर्पिन आनंद वाटेल गे ॥१॥
जन्मजरामृति यमदूताचें धरणें उठेल गे ॥२॥
स्रग चंदन वनिता उपभोगीं मानस विटेल गे ॥३॥
मानसमधुकर गुरुपदपद्मीं सुखरूप लेटेल गे ॥४॥
त्वमसि तदेवहि वाक्यहुताशन भववनीं पेटेल गे ॥ मध्वमुनीश्वरस्वामी सदोदित प्रगटेल विठ्ठल गे ॥५॥
पद ३४ वें
सवत अविद्या हे माझी । भूतलीं प्रपंचामाजीं । विष्ठेवरील हे मासी । न ढळे देखुनि हेमासी ॥१॥
कामाखाले दापिते । क्रोधें काळीज कापिते । मोहजळाची वापी ते । इजला सेविती पापी ते ॥२॥
सुमन सेजेवरता गे । सांडुनि निर्मळ भर्ता गे । रतली मीपण धरतां गे । जो अनर्थाचा कर्ता गे ॥३॥
अहंकाराच्या संगें । म्हणते रम तूं रसरंगें । तुझीं उजरतील अंगें । पतिला भज तूं वरपंगें ॥४॥
इजवरी पडती जरि वीज । ईचें जळतें तरि बीज । सुखरूप येती मग नीच । सहजचि कळतें निजगुज ॥५॥
सांगुनि मध्वनाथा गे । करवीन ईच्या घाता गे । अक्षयीं निजसुखदाता गे । येईल घरधणी हातां गे ॥६॥
पद ३५ वें
नुघडे दिठी वो । पडली मिठी वो ॥ध्रु०॥
लहानपणामध्यें याचें घेत होतें नाम । आतां मोठी जालें पूर्ण केला काम ॥ याची मजला गरज नाहीं त्यजिले भोगधाम । निशिदिनीं यासी रमतां जालें मीच आत्माराम ॥१॥
सद्गुरुपदेशें उडुनि गेला दृश्य कोंडा । येकायेकीं लज्जित जाले पाहातां याच्या तोंडा ॥ मानस माझें कठीण जैसा सैंधवाचा धोंडा । तोहि विराला त्यावरि आला प्रेमजळाचा लोंडा ॥२॥
आतां प्राणेश्वर माझें करितो सर्वहि कष्ट । बरें वाईट तोचि सोसी जाणुनि कर्मभ्रष्ट ॥ माझ्या दृष्टिपुढें कोणी न दिसे सृष्ट दृष्ट । गरति येवढी गरत आहे परंतु वृथा पुष्ट ॥३॥
हात न वागे पाय न वागे गेले कान डोळे । रसना जेथें नचले तेथिल अनुभव कोण बोले ॥ मध्वमुनीश्वर स्वामीचिया सेजेवरती लोळे । याचा अनुभव जाणती योगी शाहाणे शांभव भोळे ॥४॥
पद ३६ वें
घाटक येकला फटिंग देखिला ॥ध्रु०॥
माझ्या मायबापीं मजला दिधलें याचे हातीं । यानें माझ्या संसाराची केली अवघी माती । घर नाहीं ठाव नाहीं नकळे दिवस राती । उजेड याचा पडला तेथें नलगे दिवावाती ॥१॥
सासू नाहीं सासरा नाहीं कोणाखाले वागूं । वडील कोणी नाहीं त्याच्या पायीं जाऊनि लागूं । नणदा नाहींत जावा नाहींत जेवण कोणा मागूं । दीरभावें नाहींत घरिंचें काम कोणा सांगूं ॥२॥
तिळभर येणें माझे ठायीं ठेविली नाहीं माया । याच्या रागे जाळियली म्यांही आपली काया । माझा पगडा पडला तेव्हां जिंकिलें म्यां डाया । चुकल्या पुनरावृत्ति खेपा आलें आपल्या ठाया ॥३॥
सांडुनि दोघी चौघी साही गेलें त्याहीपरती । वज्रचुडेमंडित मजला म्हणती अवघ्या गरती । जेथें सनकादिक येउनि जयजयकार करिती । मध्वमुनीश्वरस्वामीचिया निजलें सेजेवरती ॥४॥
पद ३७ वें
चिन्मयडोहीं रे तन्मय होई ॥धृ०॥
जैसी जळमय गार विराली जळनिधिमध्यें पाही । तैसी जीवनमुक्त मुनीला पुनरावृत्ति नाहीं ॥१॥
जैसी बारीक साखर गेली क्षीरनिधीच्या भेटी । आतां तार्किक झारेकरी हा निवडील कवणें बेटीं ॥२॥
जैसी हेमीं समरस जाली आगीमाजिं सुहागी । मध्वमुनीश्वर म्हणतो वजनीं पाहसील कवणें भागीं ॥३॥
पद ३८ वें
तूं ब्रह्म बापा आहेसि चिन्मात्र रे ॥ध्रु०॥
शरण देवासि रिघे । मीपण कांहीं नेघे । होई सद्गुरुकृपा पात्र रे ॥१॥
अच्छेद्य अभेद्य स्वरूप स्वसंवेद्य । यासी प्रमाण वेदशास्त्र रे ॥२॥
मध्वनाथ सांगे खूण निरुपाधि निर्गुण । नाहीं संशय अणुमात्र रे ॥३॥
पद ३९ वें
मी ब्रह्म ऐसें कळलें सद्गुरुच्या मुखें ॥ध्रु०॥
होता मी ठाऊकें निरसलीं भवदुःखें । भरलें भुवनत्रय अवघें स्वरूपसुखें ॥१॥
विवरितां महावाक्य । जाले लक्षांसि ऐक्य । मध्वमुनीश्वरसख्यें ॥२॥
पद ४० वें
बहुजन्माचें सुकृत प्राण्या नरतनु सांपडली ॥ रोज उकरडा खर उकरण्याची परि तुजला झाली ॥ पंचीकरण सिद्धांत पाहुनी स्थूळदेह उभविली ॥ पंच पांचगुण पंचवीस हे अगम निगम बोली ॥ चौदाचक्र बावन्न मातृका साधन सखोल ॥ इडा पिंगळा सुपन्ना हे समाधिसुख डोल ॥ देह शोषिले नाशिवंत हे नव्हे निज वस्तु ॥ सुक्ष देही ऐसी वस्तु विचारुनी पाहे नेमस्तु ॥ विचारुनीं मनीं घे गुरुची किल्ली ॥१॥
आतांची साधन साध्य करुनी घे निजवस्तु आपुली ॥ध्रु०॥
उघड समाधी सद्गुरु नाथें दाखविली माये ॥ सूक्ष्म झाडा करुनी देते सुगम उपायें ॥ अंगुष्टाकृती म्हणती यातें परी शुन्य न्यायें ॥ रंग सुरंग कर्पुरें वस्तु हा लिंग देह ॥ स्वप्नावस्था विष्णुमाया परि नाशिवंत ॥ त्रिकुटी बृहन रक्तपीत ऐसें बोलती सिद्धांत ॥ वेदश्रुतीची ही बोली ॥२॥
आतांची साधन साध्य करुनी घे निजवस्तु आपुली ॥ध्रु०॥
कारण देह अर्थ पर्वत तें बा मत्तनु जोती ॥ रुद्र देवता प्रभा फांकली वर कांतिची ती ॥ सुषुप्ती तेथें पूर्ण अवस्था खुण अज्ञानाची ॥ तामस गुण कीं अग्नि तत्वसम कुळ चैतन्याची ॥ मकार मातृका ऐक सगुणा अवघे अभासे ॥ परि तें प्रतिबिंब भासे प्रमाण काया धरिलेसे ॥ हाव धरी मनीं वेडदुल्ली ॥३॥
आतांची साधन साध्य करुनी घे निजवस्तु आपुली ॥ध्रु०॥
महाकारण देह शोधन करी शिष्यराया ॥ अर्धमातृका चवथी अवस्था नाम तिचें तूर्या ॥ नील सुनील प्रभा जयाची मसुरेवत काया ॥ चित्रगणींचें स्वरूप भासे परी निजमाया ॥ प्रतिबिंबाचे प्रमाण काय अंतरीं शोधावें ॥ बिंब तें खरें करुनी घ्यावें गुरुला शरण रिघावें ॥ भाव धरी मनीं वेडदुल्ली ॥४॥
आतांची साधन साध्य करुनी घे निजवस्तु आपुली ॥ध्रु०॥
अतिकारण अतिअवकास उन्मनी पांचवी ॥ दशवे द्वारीं घुसाचारी ह्मणती सत्रावी ॥ मूळ देह येथुनी झाली सगुणाची पदवी ॥ निर्गुण निश्चयनिर्मळ प्राण्या त्या पदीं लवलाही ॥ वस्तु वेगळी गुरुची हतवटी पाहे सर्वाशेवटीं मध्वनाथें खुण उलटी ज्ञान देखणें तेथें ॥ देहवृत्ती विराली ॥५॥
आतांची साधन साध्य करुनी घे निजवस्तु आपुली ॥ध्रु०॥
पद ४१ वें
सजणी लागली मजला नीज ॥ध्रु०॥
मावळले रविशशी पंचांगीं । न कळे बीज न तीज ॥१॥
जागर आणि स्वप्नावरतीं । अव अचट पडली बीज ॥२॥
कारण देहासगट मनाचें । करपुन गेलें बीज ॥३॥
उन्मन होऊनि तन्मय जालें । रुचली चिन्मय चीज ॥४॥
मध्वमुनीश्वर म्हणतो माझी । निजसुखावरि रीझ ॥५॥
पद ४२ वें
खेळूं लपंडाई । पाहतोसी काई ॥ध्रु०॥
वेगळाले बरे गड्या चौर्ह्यासीचे दारें ॥ लपत लपत प्रगटला । सद्गुरुचे करें ॥१॥
अज्ञानाचे करें शिवें झांकियेले डोळे ॥ जीव गडी लपुनी खरा । विषयांत लोळे ॥२॥
डाव चुकेल बरा खेळे काय तुला सांगूं ॥ मध्वनाथगुरु ध्याई । आनंदातें मागूं ॥३॥
पद ४३ वें
अवघें जग ब्रह्म दिसे उघडें ॥ध्रु०॥
एकचि माती बहु घटीं शोभे रांजन परुळ सुघडें ॥१॥
एकचि कापुस पेळू तंतू । जोठ पागोटें लुगडें ॥२॥
एकचि सोनें बहु नगीं शोभे । कंठ्या बाळ्या बुगडे ॥३॥
मध्वमुनीश्वरवरद परात्पर । सद्गुरुसेवा घडे ॥४॥
पद ४४ वें
श्रीगुरु शुकमुनीचे पायीं । प्रेमें ठेविली म्यां डोई ॥१॥
माझा केला अंगिकार । मस्तकीं दिधला अभयकर ॥२॥
कर्णद्वारें उपदेशिलें । ब्रह्मीं ब्रह्मांड कोंदलें ॥३॥
मध्वनाथासी फावलें । आनंदी आनंदमय जाहलें ॥४॥
पद ४५ वें
देव उमगावा कलींत ॥ क्षत्रिक्षत्रज्ञलळीत ॥१॥
मिथ्या आहे महिषासूर ॥ सत्य सोहं परमेश्वर ॥२॥
वारा सुमन सेंदूर ॥ मग देव नसे दूर ॥३॥
सद्गुरु कृपा करील पुरती ॥ तेव्हां कळेल मंगळमूर्ति ॥४॥
मध्वनाथाचा सारथी ॥ त्यासी मंगळ आरती ॥५॥
पद ४६ वें
साहेब सद्गुरुराय भज मन ॥ध्रु०॥
हा भवसागर पार तराया ॥ धरणें याचे पाय ॥१॥
मध्वमुनीश्वर सांगतसे तुज ॥ हाची तरणोपाय ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 27, 2017
TOP