श्रीकृष्णाचीं पदें - पदे ११ ते २०
मध्वमुनीश्वरांची कविता
पद ११ वें
सोडि कर झडकरि सखया । मज भरूं दे नीर ॥ध्रु०॥
वौंशवटातळीं चेटक केलें । भारुनि यमुनातीर ॥ नेटकी देखुनी ललना । तिचें वोढिसी चीर ॥१॥
खटपट घरिंची वारुनि येतें । न लावी कांहीं उशीर ॥ चटपट लागली तुजला । राहे घडीभर थीर ॥२॥
मध्वमुनीश्वर भोंदू दिससी । केवळ तलुर अधीर ॥ भुलविसी नागरअबला । गोवळ कपटी आहीर ॥३॥
पद १२ वें
सर सर सरसिजनयना । सर परता जाय ॥ध्रु०॥
अवचित माझ्या पदरा धरिसी । अनुचित करिसी काय ॥ संचित गोरस हरिसी । वरि नुरविसी साय ॥१॥
मध्वमुनीश्वर देवा तूझा । अघटित उलटा नाय ॥ अकपट निकट मी वनिता । शिरीं धरितें पाय ॥२॥
पद १३ वें
हा रे मनमोहना । कान्हो सर परता तूं लबाडा ॥ध्रु०॥
घोर अंधारीं रात्रीं मुरारि । उघडिलें कांरे कवाडा ॥१॥
परपुरुषाचा संगचि खोटा । माझा दहाचा वाडा ॥२॥
चहुंकडे तुझा उजेड पडला । केला जिवाचा निवाडा ॥३॥
मध्वमुनीश्वर सेवक तुझा । गातो हाचि पवाडा ॥४॥
पद १४ वें
पाहा पाहा सावळा कैसा धीट । न बोलावें बोलतो तेंचि नीट ॥ बोलण्याचा कोणासि नये वीट । बोलावरुनि वोवाळा मोहर्या मीठ ॥१॥
म्हणतो माझ्ही पिंवळी लपविली हे गोटी । उलट्या भोंवर्याची चोरी लावि मोठी ॥ कंचुकींत पाहतो गोष्टी खोटी । परोपरी घालितो खडे पोटीं ॥२॥
अवचित माझ्या डोळां गेलें होतें कणूं । शाहणा तुझा जाणुन नारायणू ॥ फुंकून काढिल ऐसें आम्हीं हेंच जाणूं । चुंबन देतसे ते वेळीं काय म्हणूं ॥३॥
गोरस देखुनी लावितो गोडिमोडी । गोडबोल्या राजस डोळे मोडी ॥ ऐशा याच्या उदंड आहेत खोडी । मध्वनाथासि बाईये हात जोडी ॥४॥
पद १५ वें
तो हा वो बाई मदनमोहन अति नाटकी ॥ध्रु०॥
मथुरे जातां हाटा । गोरसाचा मागे वांटा । वृंदावनीं चंद्रानना अटकितो हा वो बाई ॥१॥
यमुनेच्या वाळवंटीं । वौंशीवटातळवटीं । येतां जातां गोपिकांसि हटकितो वो बाई ॥२॥
भोगुनिया व्रजनारी । म्हणवितो ब्रह्मचारी । मध्वनाथाची हे माया लतकी तो हा वो बाई ॥३॥
पद १६ वें
कानडा कौसालि मोठा कपटी ठकडा गे ॥ध्रु०॥
यानें मोडिला गाडा । उमळूण पाडिलें झाडा ॥ सगळ्या बगळ्यांचा बाई केला रगडा गे ॥१॥
ध्याती जयासी योगी । तो चंद्रवदना भोगी ॥ वृंदावनीं गाई चारी उघडा गे ॥२॥
बाहेरख्याली मोठा । रचितो प्रपंच खोटा ॥ गार्हाणें देतां माय करितो झगडा गे ॥३॥
नांवाचा मध्वनाथ । यासी जोडावे हात ॥ जेथें तेथें याचा पडतो पगडा गे ॥४॥
पद १७ वें
सये बाई आवरी हा यदुराज ॥ध्रु०॥
घरोघरीं चोरी करुनि खातो । याला धणिवर गोरस पाज ॥१॥
गोकुळ टाकुनि मथुरे जावें । याभीण आलों वाज ॥२॥
कुंजवनामध्यें राधिकेसी । कौतुक केलें आज ॥३॥
मध्वमुनीश्वरस्वामीस कांहीं । तिळभर नाहीं लाज ॥४॥
पद १८ वें
तुम्ही सांगा कांहीं त्याला ॥ध्रु०॥
अवचट माझ्या सदना आला । गोरस अवघें प्याला ॥१॥
निर्दय बल्लव घरधणी माझा । नाहीं तयाला भ्याला ॥२॥
मध्वमुनीश्वरवरद यशोदे । सळितो ज्याला त्याला ॥३॥
पद १९ वें
जेवी बा सगुणा । सख्या हरि ॥ध्रु०॥
रायपुरीवर साय दुधाची । का नवलाची म्हणा ॥१॥
कालविला दहीं भात आलें मिरें । मेळविलें लवणा ॥२॥
मध्वमुनीश्वरस्वामी रमापति । गोपिकारमणा ॥३॥
पद २० वें
मोठा अनिवार अवो बाई । ठकडा कृष्ण लबाड ॥ध्रु०॥
लहान बाळें मिळवुनी गोवळ आपण करितों चोरी ॥ गोरस पीतो न कळे कैसें उघडुनिया कवाड ॥१॥
अरुनि अकर्ता म्हणवितो हे भुलवुनि तरुण्या नारी ॥ स्वरूपीं यच्या विन्मुख त्याला लावितो लिगाड ॥२॥
मध्वमुनीश्वरहृदयविहारी अगुणी अक्रिय साचा ॥ धरीन म्हणतां पळून जातो लपतो मायेआड ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 27, 2017
TOP