श्रीरामाचीं पदें - पद २१ ते ३०
भारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला
२१ पद
राजस दशरथबाळ । सीते याला घाली माळ ॥ध्रु०॥
कमळदलांपरि नयन विशाळ । मृगमदचर्चित भाळ ॥१॥
मदनमनोहर रूप जयाचें । म्हणवी परम दयाळ ॥२॥
कनकधनुर्धर कनकधनुर्धर दीनजनोद्धर । दानवकुळीचा काळ ॥३॥
काळा डोंगर अंतरीं वोंगळ । रावण तो फटकाळ ॥४॥
देखुनी तुझें रूप वेडावले भूप । अंतरीं घोटिती लाळ ॥५॥
येवढें त्रिंबकधनु कैसा उचलील नेणु । वेडा जनक नृपाळ ॥६॥
मध्वमुनीश्वर सगुण दयानिधि । करील तुझा प्रतिपाळ ॥७॥
२२ पद
तो मज आवडतो रघुराणा । नवरा राजसवाणा ॥ध्रु०॥
दशरथ राजाचा कुमार । सावळा सकुमार ॥१॥
मोर्छल वारितो लक्ष्मण । बंधु सुलक्षण ॥२॥
कटींतटीं चांगला नेसला । पिवळा सोनसळा ॥३॥
कैसा बांधिला उदार । चिरा खिडकीदार ॥४॥
प्रसन्नवदन पूर्णेंदु । हृदयें करुणासिंधु ॥५॥
भाळीं रेखिला आळवट । कस्तुरी मळवट ॥६॥
कर्णीं कांचन कुंडलें । कोदंड दंडलें ॥७॥
पाळी येकला त्रिजगा । अंगीं पिवळा झगा ॥८॥
त्यावरी बांधिला नेटका । चिकंदोजी पटका ॥९॥
माजी खोविली कटार । चिमणी तरवार ॥१०॥
पाठीसी बांधला तर्कश । दिसतो रणकर्कश ॥११॥
कंठीं शोभते घननीळा । वैजयंती माळा ॥१२॥
पायीं नेपुरें वाजती । बिरुदें विराजती ॥१३॥
चरणपंकजीं मधुकर गाती । मधुरस्वर ॥१४॥
मध्वनाथाचा कैवारी अखिल विघ्नें निवारीं ॥१५॥
२३ पद
चिमणासा श्रीराम त्याचें चिमणेसें स्वरूप । चिमणें सगुण ब्रह्म चिमणें लावण्य अमूप ॥ध्रु०॥
चिमणा स्नान संध्या करुनी शोभे पीतांबर । चिमणा नित्यतृप्त म्हणवी राजा विश्वंभर ॥१॥
चिमण्या हातें करुनी बांधी चिरा खिदकीदार । चिमणा गोशपेच त्यावरी कलगी झळके फार ॥२॥
चिमणी अंगी ल्याला त्यावरी चिमणी कुडती साजे । चिमणा कमरबंद देखुनी पायां पडती राजे ॥३॥
चिमणी माजीं कटार बांधी चिमणीसी तरवार । चिमणी पाठीसी ढाल थाटी चिमणासा दरबार ॥४॥
चिमणा तर्कश बां धरी हातीं चिमणी कमान । चिमणें सिंहासन त्यावरि चिमणा भाग्यवान ॥५॥
चिमणें केशर मळवट भाळीं रंगीत अक्षता । चिमणा प्रसन्नवदन निजभक्तां संरक्षिता ॥६॥
चिमणीसीं झुलपें मोगरेलें विलसती चिमणे गाल । चिमण्या मुक्ताफळकुडक्यांमध्यें झळकती लाल ॥७॥
चिमणी तुळसीमाळ कंठीं नवरत्नांचा हार । चिमणी सीता वामभाईं सौंदर्याचें सार ॥८॥
चिमणा बंधु लक्ष्मण वारी मोरछला । चिमणे भरतशत्रुघ्नादिक सेवक जवळ ॥९॥
चिमणा मध्वनात त्याचा चिमणासा दिवाण । चिमणा विजये होईल करवील लंकेचे निर्वाण ॥१०॥
२४ पद
धन्य पिता दशरथ । ज्याचे उदरीं रघुनाथ । जन्मला ॥१॥
धन्य धन्य कौसल्या । किती पुण्यराशी केल्या । कोण जाणे ॥२॥
धन्य धन्य नगर । अयोध्या मनोहर । पुण्यभूमि ॥३॥
धन्य धन्य शरयूतीर । जेथें खेळे रघुवीर । स्वामी माझा ॥४॥
विश्वामित्रें रायाप्रति । मागितला रघुपति । लक्ष्मणेंसी ॥५॥
ताटिका विंधोनि बाणें । हरिले सुबाहूचे प्राण । राघवानें ॥६॥
रामें आणि लक्ष्मणें । केलें यज्ञसंरक्षण । कौशिकाचें ॥७॥
जानकीच्या स्वयंवरा । मूळ आलें मुनीश्वरा । मैथुळीचें ॥८॥
मार्गीं अभिनव केली लीला । उद्धरिली जड शीला । गौतमाची ॥९॥
रायें केला सन्मान । जानकीच्या संभ्रमानें । राघवाचा ॥१०॥
जनकें केली प्रतिज्ञा । जाणविली सर्वज्ञा । कौशिकानें ॥११॥
शाहणव कुळींए राजे । आले भूमंडळीचे । थोर थोर ॥१२॥
सभेमध्यें साभिमानें । भांभडभूत दशानन । बैसलाहे ॥१३॥
कोटि जेठी लागले । उचलिता भागले । त्रिंबकासी ॥१४॥
जशानन उठला । धाकें ऊर फूटला । रावणाचा ॥१५॥
धनुष्या घालितां कव । झोक गेला आली तव । रावणासी ॥१६॥
उरावरी आदललें । तेव्हां धैर्य गळालें । रावणाचें ॥१७॥
मेरूचा तो खचला कडा । किंवा कैलासीचा हुडा । कोसळला ॥१८॥
सभेमध्यें हलकल्लोळ । म्हणती लावा हळदबोळ । नोवर्यासी ॥१९॥
सहा अवघी घनवटली । रामीं वृत्ति विनटली । जानकीची ॥२०॥
सीता नवसी नवसा । राजसदननिवासा । मोरयासी ॥२१॥
फाल्गुन वद्य चतुर्थीस । पूजी मंगलमूर्तीस । मोरया रे ॥२२॥
त्रिंबक नुचलो रावणा । पर्णॊ मजला राघवराणा । सूर्यवंशी ॥२३॥
भोगुर गोवर्धनीं फार । जनस्थानीं बांधीन पार । मोरयासी ॥२४॥
मध्वनाथ हे खूण । खणोर काढील वळखोन । कलयुगीं ॥२५॥
सफळ झाला नवस । पावला तो गणाधीश । जानकीला ॥२६॥
२५ पद
सखिबाई साजणी तुम्ही सांगा माझ्या बापा ॥ध्रु०॥
चरणीं अहिल्या उद्धरिले वो । परिहरि गौतमशापा ॥१॥
रघुपति नवरा म्यां वरिला वो । माझें केलें स्थापा ॥२॥
यासि न द्या तरी आपुल्या हातें । मान हे माझी कापा ॥३॥
जनक विदेही तूं म्हणवीसी । न सिवसी करुनी पापा ॥४॥
मदनमनोहर आवदतो गे । नुचलिता त्रिंबकचापा ॥५॥
मध्वमुनीश्वर बहुत गुणाचा । सुंदर सोलीव चापा ॥६॥
२६ पद
रावण गडबडा लोळे । फिरवी गरगरा डोळे । वोकी रक्ताचे गोळे । तरी स्वगर्वें बोले ॥१॥
भत ब्राह्मण बराडी । पंडीत जोसी वर्हाडी । वरकड राजे काबाडी । अवघी दिसते लबाडी ॥२॥
गेंठे हो । मुकुट हेटे मेटे हो । उठा महाजन सेटे हो । काय पहातां बेटे हो ॥३॥
उचला उचला धनुष्य । देव दानव मनुष्य । माझें पुरलें आयुष्य । न कळे पुढील भविष्य ॥४॥
तुमचा उपकारी झालों । झक माराया आलों । नवरी देखुनि नीवालों । स्वयंवरीं निमालों ॥५॥
मी तों लंकेचा राजा । आलों बहूतांच्या काजा । ब्रह्मा माझा तो आजा । त्यासी कोण्हीं सांगा जा ॥६॥
उदकीं बुडतो पोहणार । आवचट चुकतो लिहिंणार । शाहाणा होतो गंवार । न कळे पुढील होणार ॥७॥
याला आलें फेंपरें । ऐसें म्हणती लेंकरें । घासी भूमीस कोपरें । बरवें केलें शंकरें ॥८॥
राजद्वारीं नरनारी । हांसती सुकुमारा क्कांरी । रावण देतो वोकारी । जें तें त्याला धिःकारी ॥९॥
याचा जाला अपमान । भारें दडपली मान । राम उचलील कमान । पावे राजसन्मान ॥१०॥
सीता रामाच्या गळां । घाली कमलाची माळा । मध्वनाथा सोहळा । जाला सर्वां आगळा ॥११॥
२७ पद
श्रीसद्गुरुनाथा । सांगा विचारा आतां ॥ध्रु०॥
शरण आलों हे स्वामी समर्था । उद्धरा दशरथा ॥१॥
पायांवरी म्यां ठेविला माथा । पुरवा मनोरथा ॥२॥
कलेवराची व्यर्थचि आस्था । माझी वृद्धावस्था ॥३॥
मातापिता माझा श्रीराम भ्राता । सद्गतिचा दाता ॥४॥
हें राज्य देउनि जानकीकांता । साधीन एकांता ॥५॥
श्रृंगारा नगरा शोधुनि पंथा । पाहूनिया ग्रंथा ॥६॥
अधिकार देखुनि पढवा वेदांता । शांता आणि दांता ॥७॥
श्रीमध्वनाथा त्यजुनी अहंता । पूजीन महंता ॥८॥
२८ पद
अयोध्याकांडींची विमल वदला वाल्मिकि कथा । शिवें श्रीगौरीला सरस कथिली नाहिं वितथा ॥ तयाचा बांधीतो कविवर महाराष्ट्र उलथा । यमाच्या सैन्याचा पलवित बळें वीर चळथा ॥१॥
रायें पाठविला रघूत्तमगृहा श्रीसद्गुरु आपला । जाला जर्जर देह वृद्धपर्णिचा तापत्रयें तापला ॥ श्रीरामा सुमुहूर्त पाहुनि बरें सिंहासनें स्थापणें । वेदांतश्रवणें करून धरणें वैराग्य तें आपणें ॥२॥
रघुवीर करी गुरुपूजन तें । शिरिं तीर्थ धरी अवघे जन तें ॥ म्हणवी शिवतत्व निरंजन तें । गुरुभक्तिस लावितसे जन ते ॥३॥
गुरु म्हणे परिसे रघुनाथजी । दशरथें कथिली शुभ माते जी ॥ राज्य तूं करि नृपासनिं बैसुनी । सकल इच्छिति लोक मनींहुनी ॥४॥
राज्याभिषेक उदईक तुला करावा । त्वां भूमिभार अवघा बरवा हरावा ॥ सीता सत्यांस बहु वांटिल वायणें जी । देतील भूप तुज सर्व उपायानें जी ॥५॥
वसिष्ठास रामें नमस्कार केला । गुरू आपल्या आश्रमालागिं गेला ॥ अयोध्येमधें लोक सोत्कंठ सारे । खरी टांकसाळेंत पाडूं ठसारे ॥६॥
गुढ्या तोरणें जोड वाजंत्रयांचे । थवे शोहती ठाइं ठाईं स्त्रियांचे ॥ अलंकार लेऊनि दिव्यांबरासी । पहायास आलेति विश्वंहरासी ॥७॥
समाचार हा ऐकिला कैकयीनें । पुढें निंद्य आरंभिलें विघ्न तीनें ॥ स्वपुत्रास घे राज्य मागूनि सारें । असें संचरे मंथरेमाजि वारें ॥८॥
यावा पंचवटींत गौतमितटीं श्रीराम सीतापती । ऐसें इच्छिति भूमिदेव अवघे दैत्यांस जे कांपती ॥ शेषाचा अवतार लक्षण पहा शिक्षील दुष्टांस तो । धर्म स्थापुनि मध्वनाथ म्हणतो रक्षील शिष्टांस तो ॥९॥
२९ श्लोक
श्रीगजानना वंदुनी मनीं । पावनी कथा वर्णितो भुनी ॥ व्यास वाल्मिकें गाइली जुनी । मुक्तिदायका गौतमीहुनी ॥१॥
मध्वनाथ हे वर्णितो कथा । ते म्हणो नका संतहो वृथा ॥ डोळसें पुढें काढिजे पथा । अंध त्यासवें चालतें तथा ॥२॥
माय वागवी लेंकरा जया । कंटकव्यकथा कायसी तया ॥ माझि येउं द्या अंतरीं दया । वंदितों पहा या पदद्वया ॥३॥
उद्धरी पदें जो अरण्य कीं । त्या रघूत्तमा मी शरन्य कीं ॥ तेथिची कथा देति पुण्य कीं । ऐकतील ते पापशून्य कें ॥४॥
मंथरा वदे कैकयीप्रती । वाटतें तुला वश्य भूपती ॥ त्यासि आवडे रघुनाथ गे । कश्यपा जसा श्रीउपेंद्र गे ॥५॥
तो करील हें राज्य सर्व गे । व्यर्थ वाहसी रूपगर्व गे । दासिच्या परी मानिती तुला । राज्य माग तूं आपुल्या मुला ॥६॥
मंथरा करी बुद्धिभेद हा । कैकयीमनीं दुःखखेद हा ॥ देव प्रेरिता भारती वदे । वाढला कली दंपतीमधें ॥७॥
कैकयी म्हणे युद्धकाळिचें । रीण तें नव्हे आजिकालिंचें ॥ त्या वरद्वया द्या मला नृपा । भामिनीवरी ते करा कृपा ॥८॥
काननाप्रती राम पाठवा सूर्यवंशिंचें सत्य आठवा ॥ धर्म तो पुसा त्या बहुश्रुता । राज्य मागतें आपुल्या सुता ॥९॥
मंथरा जुडे अंतरीं उडे । ते वदे मुढे टाकि वो चुडे ॥ ऐकुनि कुडें कैकयीपुढें । भूपती रडे मूर्च्छितु पडे ॥१०॥
त्या क्षणामधें राम धांवला । देखुनी वदे भूप बावळा ॥ कैकयीस हा डाव फावला । रागह्वा कसा म्यां गवाचला ॥११॥
राजयापुढें रामजी वदे । पुत्र तो पित्यासाठिं जीव दे ॥ स्वार होउनी जातसे वना । मी करीन जी तीर्थसेवना ॥१२॥
राज्य येथिचें भाऊ तो करूं । मी जसा तसा तेंहि लेंकरूं ॥ ऐकुनी नृपें कंठ दाटला । अंतरीं बहू खेद वाटला ॥१३॥
कैकयीसुता राज्य द्या सुखें । सांगतों तुम्हां आपुल्या मुखें ॥ दीधलें तया म्यांच भातुकें । तो करील जी दिव्य कौतुकें ॥१४॥
जानकीसवें पुण्यकाननीं । काळ कंठितों दीनयामिनी ॥ जो शिवा सती सिंहवाहिनी । ते सहाय हो शंभुभामिनी ॥१५॥
मध्वनाथ ज्या राहतो मठीं । मी वसेन त्या गौतमीतटीं ॥ सेविली असे जे सदा भटीं । ज्यासि पूजिता मुक्त सेवटीं ॥१६॥
३० पद
परिसे राया दशरथा । राज्य द्यावें भरता - । लागिं माझ्या ॥१॥
वरदान आठवावें । रामचंद्रा पाठवावें । वनवासा ॥२॥
स्मरण तुम्हांलागीं कैचें । पतिव्रता कैकयेचें । युद्धकाळीं ॥३॥
बरवें राज्य करीन हर्षें । राम जावो चौदा वर्षें । वनवासा ॥४॥
राम जावो वनांतरा । समागमीं मुनीश्वरा । घेउनिया ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2017
TOP