मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
पदे २१ ते ३०

सद्गुरुचीं पदें - पदे २१ ते ३०

मध्वमुनीश्वरांची कविता


पद २१ वें
कस्तुरीच्या संगें मृत्तिकेसि मोल । मोहरे तोळा तोले सुगंधेंसी ॥१॥
तैसें संत संगें दीन पदीं चढे । काय येक न घडे गुरुकृपें ॥२॥
तेलासी सुवास । त्याचा तो विलास भाग्यवंता ॥३॥
वर्षाकाळीं वोहळ गंगेमध्यें आले ।  तत्काळ ते जाले गंगारूप ॥४॥
चंदनाच्या संगें चंदन अन्य तरु । तैसा तो सद्गुरु साधकासी ॥५॥
मध्वनाथीं भ्रमरकीटकाच्या न्यायें । नेणों जालों काय अकस्मात् ॥६॥

पद २२ वें
गुरुला शरण मी गेलों । जन्ममरणाविरहित केलों ॥१॥
आतां सुखी जालों सुखी जालों । निर्भय भुवना आलों ॥२॥
भुजंग कळला लटका । सत्यचि रज्जुचा तो कुटका ॥३॥
मृगजळ अवघें वाव । तेथें काय करावी नाव ॥४॥
साध्य साधन बाष्फळ । चिन्मय मध्वमुनीश्वर पुष्कळ ॥५॥

पद २३ वें
वंदीन सद्गुरुराज । मनामधें ॥ध्रु०॥
त्याविण आणिक नेणें मी साधन । करीन घरांतील काज ॥१॥
गुरुरायाचें झाडीन अंगण । काय जनाची लाज ॥२॥
कामादिक रिपु करितील विघ्नें । मोडीन त्यांचा माज ॥३॥
शासन करीन मी कळिकाळाला । आणीन त्याला वाज ॥४॥
मध्वमुनीश्वर म्हणतो मजला । सांपडला निधि आज ॥५॥

पद २४ वें
गुरुराज दयाळ समर्था ॥ध्रु०॥
मी शरणागत तव चरणाप्रति । वारी तूं सर्व अनर्था ॥१॥
तूं करुणाकर पूर्ण सुखात्मक । बोधविसी परमार्था ॥२॥
वर्णी तुझें यश मध्वमुनीश्वर । तूं जगदीश अकर्ता ॥३॥

पद २५ वें
गुरुराया मायबापा मी तों आहें परदेशी ॥ध्रु०॥
तुजवीण कोण माझें । वारी भवशीण वोझें । हे सगुणा तूं क्षेम मजला कै देसी ॥१॥
आठवितां कंट दाटे । माहेरची खंती वाते । हे सजणा सजणा तूं सांग मजला कै नेशीं ॥२॥
घडि युगासम लोटि । दिवस मोजितसे बोटीं । हे नकळे नकळे रे मध्वनाथीं कै येशी ॥३॥

पद २६ वें
व्रत तप उद्यापन नेम ॥ येथें उपजेना प्रेम ॥१॥
सोमयागादिक यज्ञ ॥ वैष्णव न मनिती सर्वज्ञ ॥२॥
प्रयाग गंगा आणि कासी ॥ तीर्थें शिणविती आणिखांसी ॥३॥
उपनिषदांची श्रवण गे ॥ विवरावी ते कवणें गे ॥४॥
सांडुनि पंचीकरण गे ॥ सद्गुरु सेवा करणें गे ॥५॥
साधन नलगे मजु बाई ॥ समाधि घेऊनि करुं काई ॥६॥
भजतां सद्गुरुरायास ॥ चुकले सर्वहि आयास ॥७॥
गुरुपदिं मानस रतलें गे ॥ अभिनव कैसें वितलें गे ॥८॥
मी तो मुक्तिस नमनीं गे ॥ निजसुख गुरुपद नमनीं गे ॥९॥
मध्वमुनीचा वेदांत ॥ गुरुहक्तीचा सिद्धांत ॥१०॥

पद २७ वें
जा रे जनहो तुम्ही काशीस । छेदा प्रयागीकासीस ॥१॥
आमचा सद्गुरुराज काशी । मोडिल कळिच्या राजिकासी ॥२॥
जैथिल पर्वत रैवत । तेथील पहा जी दैवत ॥३॥
पूजा शेषाद्रि तैलंग । रामेश्वर ज्योतिर्लिंग ॥४॥
उत्तरेचा महिमा लई । जाऊनि राहा हिमालयीं ॥५॥
नेदूनि सद्विप्रा दक्षिणा । करा पृथ्वी प्रदक्षिणा ॥६॥
आम्हां नलगे येणें जाणें । तीर्थरूप सद्गुरु जाणें ॥७॥
मध्वनाथाचा विश्वास । भक्त जाणे मी विश्वास ॥८॥

पद २८ वें
परम दयाळ दयाळ स्वामी माझा ॥ध्रु०॥
मी अपराधी सेवक त्याचा बहुत मनांत गयाळ गयाळ ॥१॥
भावें त्याला भजतां जनहो । अंतरीं फार निवाल निवाल ॥२॥
मध्वमुनीश्वर स्वामी दयेनें । पुनरपि जन्मा न याल न याल ॥३॥

पद २९ वें
तुम्ही समर्थ मज करीं धरा ॥ध्रु०॥
संतसंगें गंगातीरीं कठीन काळ बरा । विरक्त होऊनी हृदयकमळीं चिंतिन विश्वंभरा ॥१॥
आपला त्र्यंबक सेवक जाणुनि त्यावर करुणा करा । तुमच्या बोले मध्वनाथ दयानिधि येईल माझ्या घरा ॥२॥

पद ३० वें
ऐसा गुरुचा अगाध महिमा । नकळे बाई आगमा निगमा ॥ध्रु०॥
सद्गुरुरायें धरितां हस्तकीं । तेव्हां चित्त जालें तें स्वस्थ कीं । अभयंकर ठेवितां मस्तकीं । ब्रह्मरूप भासे समस्तकीं ॥१॥
शरण गेलें त्याचिया चरणा । तयासी आली माझी वो करुणा । चुकविलें जननमरणा । भेटविलें जानकीरमणा ॥२॥
आत्मारामाचिया भेटीसाठीं । रिघत होतें गिरिच्या कपाटीं । पडलें होतें साधनकचाटीं । मध्वनाथें चुकविली आटाआटी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP