लिंगाची उंची, लिंगाची रुंदी, लिंगाचा जाडेपणा, शाळुंखीचा विस्तार आणि प्रनालिका परिमाण ही पाच सूत्रे होत. लिंगाची उंची जितकी असेल तितका लिंगाच्या मस्तकाचा विस्तार (व्यास) करून त्याच्या दुप्पट सूत्राचे वेष्टन केले असता पुरेल इतका लिंगाचा जाडेपणा करावा व लिंगाच्या सभोवार लिंगाइतक्या विस्ताराचे वर्तुलाकार पीठ करावे. पीठाची उंची लिंगाच्या उंचीपेक्षा दुप्पट असावी. पीठाच्या बाहेर पीठाच्या उत्तरभागी लिंगाइतकी लांब, मूलाच्या ठिकाणी लांबीइतका विस्तार असलेली व अग्रभागी मूलाच्या अर्ध्या भागाइतका विस्तार असलेली प्रनालिका करावी. लिंगाच्या उंचीच्या तिप्पट पीठाची उंची करावी असे कित्येक ग्रंथकार म्हणतात. नंतर पीठाच्या मध्यभागी लिंगाहून दुप्पट जाड असा, पीठाच्या उंचीच्या तिसर्या अंशाने कंठ करावा. कंठाचा वरचा भाग व अधोभाग यांच्या ठिकाणी सारख्या प्रमाणाच्या दोन मेखला करून, पीठावर लिंगाच्या व्यासाच्या सहाव्या अंशाने मेखला करून त्या मेखलेच्या आत लागून राहील अशी तेवढी गर्ता करावी. प्रनालिकेच्या ठिकाणीही विस्ताराच्या तिसर्या अंशाने गर्ता करून पीठाच्या मानाने मेखला करावी.