वैशाख, फाल्गुन, पौष, श्रावण व मार्गशीर्ष या मासात घर बांधण्यास आरंभ व प्रवेश करणे, तसेच खांब उभा करणे ही शुभकारक होत. ज्येष्ठ, कार्तिक व माघ हे मास गृहकर्मास शुभप्रद आहेत, असे नारद म्हणतात. तृणगृह सर्व मासात बांधावे. पौष मासात मुख्य गृह बांधू नये. हस्त, चित्रा, स्वाति, ध्रुव व मृदु संज्ञक नक्षत्रे, धनिष्ठा, शततारका व पुष्य ही नक्षत्रे असता रिक्तातिथि, रविवार व मंगळवार वर्ज्य करून गृहास आरंभ करावा; व गृहप्रवेशही करावा. श्रवण, अश्विनी, क्रूर संज्ञक, अनुराधा, आश्लेषा, मूळ, पुष्य, हस्त, म्रुग, रेवती व ध्रुव या नक्षत्रांवर शिलान्यास व खात ही करावी. केंद्रस्थानी व अष्टमस्थानी पापग्रह नसता स्थिरलग्नावर गृहकृत्य करावे. धनिष्ठापंचक असताना घराचा खांब शहाण्याने पुरू नये. सूर्य नक्षत्रापासून दिवसनक्षत्रापर्यंत नक्षत्रे मोजिली असता पहिली सात नक्षत्रे अशुभ, ८ ते ११ शुभ व बाकीची १० नक्षत्रे अशुभ याप्रमाणे वृषवास्तु चक्र पाहून शुभ नक्षत्री गृहास आरंभ करावा. किंवा चौथ्या, पंधराव्या व तेविसाव्या नक्षत्रापासून क्रमाने ४।४।५ ही नक्षत्रे गृहस्तंभ व गृहप्रवेश यांस अशुभकारक होत. मुख्य गृहाचे पूर्व दिशेपासून स्नानगृह, पाकगृह, भांडारगृह व देवगृह याप्रमाणे गृहे करावीत. ध्रुव मुखावरून उत्तर दिशा जाणून प्राची दिशा साधावी. कोण, मार्ग, घरट, कुलालचक्रादियंत्र, विहीर, द्वार, चिखल, स्तंभ, वृक्ष व देव यांच्या समोरासमोर असलेले गृहद्वार दुष्ट होय. पण गृहाच्या उंचीच्या दुपटीने कोणादिकांचे अंतर असल्यास हा दोष नाही. सूत्रन्यास, भिंतीचा आरंभ, शिलान्यास व खांब पुरणे यांचा आरंभ आग्नेय दिशेपासून करावा असे कश्यप म्हणतात. एका घराला लाविलेले लाकूड दुसर्या घराला लावू नये. नवीन घरास नवीन व जुन्या घरास जुनी लाकडे प्रशस्त होत. ३२ हातापेक्षा अधिक गृह, चतुर्द्वार गृह व बृणगृह ही कर्तव्य असता शाहण्याने आयव्ययादि गुणांचा विचार करू नये.