गीता, गंगा, विष्णु, कपिला गाय, अश्वत्थसेवा व एकादशीव्रत ही सहा सेव्य आहेत. कलियुगात सातवे (सेव्य) नाही. विष्णु किंवा शिव यांचे भजन करणारे, गुरु व मातापिता यांची सेवा करणारे, तसेच गाई, वैष्णव, महाशैव व तुलसी यांची सेवा करणारे व काशीक्षेत्रात वास करणारे या सर्वांस कलिसंबंधी दोष लागत नाही. कलियुगात गुरुभक्ति ही देवाच्या भक्तीहून अधिक आहे असे सांगितले आहे. जपाविषयी जी संख्या सांगितली असेल ती कलियुगात चौपट जाणावी. दान व शिव आणि विष्णु यांचे नामसंकीर्तन ही कलियुगात महाश्रेष्ठ आहेत. कृतयुगी जी सिद्धी दहा वर्षांनी होते तीच त्रेतायुगात एका वर्षाने, द्वापार युगी एका महिन्याने व कलियुगात एका अहोरात्राने सिद्ध होते. "कलियुगात पुण्ये जशी शीघ्र फलदायी होतात तशी पापे होत नाहीत. कारण केलेली पापेच सिद्ध होतात, असे वचन असल्यामुळे कलियुगात पुण्यकर्माची सिद्धि केवळ संकल्पाने होते; पण पापे मात्र आचरिलेलीच सिद्ध होतात," असे प्रथम स्कंधात सांगितले आहे. दुसर्या स्मृतीशी विरोध असेल तर कलियुगात पराशर स्मृति ग्राह्य धरावी, कृतयुगात ध्यानाने, त्रेतायुगात यज्ञाने व द्वापार युगात पूजेने जे सिद्ध होते ते कलियुगात केवळ केशवाच्या नामसंकीर्तनाने प्राप्त होते. हे असे हेमाद्रीत व्यासांचे वचन आहे. कृतयुगात ध्यानाने जे फल मिळते ते मिळविण्यासाठी कलियुगात केशवाचे नामसंकीर्तन करावे असा वाक्यार्थ कौस्तुभाचा कर्ता जो अनंतदेव त्याच्या पितामहांनी भक्तिनिर्णय ग्रंथात विस्ताराने प्रतिपादिला आहे. हेमाद्रीमध्ये चार युगात कलिच श्रेष्ठ आहे असे समजून गुणज्ञ व गुणग्राहक आर्यांनी म्हणजे साधूंनी कलीची प्रशंसा केली आहे. कारण केवळ संकीर्तनानेच कलियुगात सर्व स्वार्थ प्राप्त होतो असे श्रीभागवतातील वचन सांगून संकीर्तन म्हणजे हरिकीर्तन असा अर्थ. याप्रमाणे हेमाद्रीतच सांगितले आहे. ह्रदयादि अंगे, कौस्तुभादि उपांगे, सुदर्शनादि अस्त्रे व सुनंदनंदादि पार्षदगण यांनी युक्त असलेल्या इंद्रनील मण्याप्रमाणे वर्ण असलेल्या उज्ज्वल श्रीकृष्ण परमात्म्याची पूजा शहाणे लोक संकीर्तन युक्त यज्ञांनी करितात. पंचमहायज्ञादि आप आपले आचार आचरणारांनीही नित्य कर्म करून राहिलेला काल भगवन्नामसंकीर्तनात घालवाव, असा अभिप्राय कौस्तुभात आहे. यावरून धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाच्या प्राप्तीस आवश्यक असलेल्या साधन संपत्तीशिवाय केवळ नारायणाच्या आश्रयाने पुरुषास हे चतुर्विध अर्थ प्राप्त होतात, असे भारतात वचन आहे.
श्रीभागवतातही असे सांगितले आहे की धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे मिळवू इच्छिणार्या पुरुषाने एक हरीच्या चरणाचे सेवनच करावे. या वाक्यात 'एक' इत्यादि अवधारणादि पदांवरून भक्तियोगास इतर साधनांची गरज नाही असे सूचित होते व ज्ञानयोगादिकास हरिपादसेवेची अपेक्षा आहे असे ध्वनित होते. तसेच अकराव्या स्कंधात स्पष्ट सांगितले आहे की, माझ्या भक्तीने युक्त असल्यास माझ्या ठायी चित्त असणाराचे कल्याणाचे साधन ज्ञान व वैराग्य ही होणार नाहीत; कर्मांनी, तपश्चर्येने, ज्ञानाने, वैराग्याने, योग, दान, धर्म व इतर तीर्थव्रतादि इतर श्रेय साधनांनी जे प्राप्त होते ते सर्व माझ्या भक्ताला भक्तियोगाने अनायासे प्राप्त होते. स्वर्ग, मोक्ष व वैकुंठ यांची जर तो इच्छा करील तर त्यास तेही प्राप्त होतील. हे विभो, अभ्युदय व मोक्ष यांना देणारी अशी तुझी भक्ति सोडून जे कोणी ज्ञानप्राप्तीसाठी यत्न करतात त्यांना केवळ क्लेश मात्र होतात; दुसरे काहीएक मिळत नाही. जाडा कोंडा घेऊन तो कांडणारास जसे क्लेशच होतात त्याप्रमाणे तुझी भक्ति तुच्छ मानून ज्ञानासाठी धडपडणारास श्रमच होतात. अशा प्रकारची आणखी हजारो वचने आहेत. भगवदाराधन व भगवत्प्रसाद यांशिवाय ज्ञानयोगाची सिद्धि होते असे कोणीही कोठेही सांगितलेले नाही. "सर्वपेक्षाच यज्ञादिश्रुतेरश्रवत' या अधिकरणात 'अश्व जसा रथ वाहनाला साधन आहे.' या दृष्टांताने 'विविदिशंती यज्ञेन, दानेन' या श्रुतीस अनुसरून ज्ञानप्राप्तीस सर्व साधनांची अवश्यकता आहे असे सांगितले आहे. पण भक्तियोगामध्ये दृढवैराग्यरहित दुराचार्यासही अधिकार आहे. 'अत्यंत दुराचारी असला तरी जर तो माझी अनन्य भक्ति करील तर तो साधुच आहे असे मानावे' कारण 'मी भगवद्भक्तीने कृतार्थ होईन' असा सव्द्यवसाय त्याने केला आहे. यामुळे तो लवकरच धर्मात्मा होऊन परमेश्वरनिष्ठारूप शांति पावतो. हे अर्जुना, माझ्या भक्तांचा कधी नाश होत नाही हे पक्के ध्यानात धर. तो निर्विण्ण नसला व अति आसक्त नसला तरी भक्तियोगाने त्याला सिद्धि प्राप्त होते, इत्यादि वचने आहेत. दृढवैराग्य इत्यादि साधनचतुष्ट्यसंपत्ति जवळ नसता वेदांताचे श्रवण केले तर ज्ञान प्राप्त होते, असे कोठेही आढळत नाही. यथोक्त अधिकारसंपत्तीवाचून काहीएक साधन आचरिले तरी फलप्राप्ति होत नाही; म्हणून सर्वांनी सर्वात्मभावाने कलियुगात श्रीहरिचरणांची सेवा करणे हा जो भक्तियोग त्याचा आश्रय करावा, असे सिद्ध होते.