उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा व रोहिणी या नक्षत्रांस ध्रुव अशी संज्ञा आहे. मघा, भरणी व पूर्वात्रय म्हणजे पुर्वा, पूर्वाषाढा व पूर्वाभाद्रपदा यांस क्रूर अशी संज्ञा आहे. श्रवण, धनिष्ठा, शततारका पुनर्वसु व स्वाति यांस चर ही संज्ञा आहे अश्विनी, हस्त व पुष्य यांस क्षिप्र संज्ञा आहे. अनुराधा, रेवती, मृग व चित्रा यांस मृदु ही संज्ञा आहे. कृत्तिका, विशाखा यांस मिश्र संज्ञा आहे; व मूळ, आश्लेषा, ज्येष्ठा व आर्द्रा या नक्षत्रांस तीक्ष्ण अशी संज्ञा आहे. याप्रमाणे नक्षत्रांच्या संज्ञा सांगितल्या.
जेथे तिथीचा उल्लेख केला नाही तेथे रिक्ता व अमावास्या या तिथींशिवाय इतर तिथि घ्याव्या; जेथे वाराचाही उल्लेख नसेल तेथे रविवार, शनिवार, भौमवार हे सोडून इतर वार घ्यावेत. चर, मृदु, क्षिप्र, ध्रुव, मूल, विशाखा व मघा ही नक्षत्रे असताना भौमवार किंवा चंद्र, बुध, बृहस्पती व भ्रुगु (शुक्रवार) या वारी जमीन नांगरणे शुभकारक होय. सूर्याने भोगून टाकिलेल्या नक्षत्रापासून म्हणजे सूर्य नक्षत्राचे पूर्व नक्षत्रापासून तीन, आठ, नऊ, आठ या नक्षत्री क्रमाने अशुभ, शुभ असे हलचक्र जाणावे. ही हलचक्राची नक्षत्रे असता शनि व भौम हे वार सोडून अन्यवारी बीज पेरणे, शेत लावणे व शेत कापणे ही शुभकारके होत. क्षीरवृक्षाचा (वटवृक्षाचा) स्तंभ (तिवडा) खळ्यात असावा. ज्येष्ठा, मूळ, मघा, श्रवण, रेवती, रोहिणी, अनुराधा, पूर्वा व उत्तरा या नक्षत्रांवर धान्याची मळणी केली असता शुभकारक आहे. क्षिप्र, ध्रुव, चर, मृदु व मूळ ही नक्षत्रे असता बुध, गुरु, शुक्र या वारी चर लग्नाशिवाय इतर लग्नी धान्याचा संग्रह करणे शुभकारक आहे. धान्यसंग्रहाचे वेळी
"ॐ धनदाय सर्व लोकहिताय देहिमे धान्यं स्वाहा"
हा मंत्र लिहून धान्याच्या कोठारात टाकावा म्हणजे धान्याची वृद्धि होते. बुधवार व मंदवार या वारी धन व धान्य यांचा व्यय करणे शुभकारक नाही. म्हणून या वारी रुपये व्याजी लावणे, सवाई दिढीवर धान्य देणे, इत्यादि व्यवहार करू नयेत. मृदु, क्षिप्र व चर नक्षत्रे असताना शुभवारी दिवसा नवान्न भक्षण करावे.