भद्रा, संक्रांत, व्यतीपात, वैधृति, शुक्र, गुरु, रवि व भौम हे वार षष्ठीपासून दशमीपर्यंत तिथि, श्राद्धदिवस, प्रतिपदा व द्वितीया या दिवशी कारणाशिवाय अभ्यंगस्नान करू नये. विवाहादि मंगलकार्य, विजयादशमी, वर्षारंभ, दीपावलि हे अभ्यंग करण्याचे कारण दिवस असल्यामुळे या दिवशी अभ्यंग स्नान करावे. बुधवार, शततारका व मघा ही नक्षत्रे असता स्त्री अभ्यंग स्नान करील तर पतीचा नाश करणारी होईल. यास अपवाद सांगतो- मोहरीचे तेल, सुगंधी तेल, पुष्पांनी सुवासित केलेले, कढविलेले गाईच्या तुपाने युक्त असलेले किंवा ब्राह्मणाच्या पदरजांनी युक्त याचा अभ्यंग निषिद्ध दिवशी केला असता दोष नाही. नित्य अभ्यंग करणारास दोष नाही. रविवारी पुष्प, गुरुवारी दूर्वा, मंगळवारी मृत्तिका व शुक्रवारी गोमय तेलात टाकून निषिद्ध दिवशी या तेलाच्या अभ्यंगाने स्नान केले असता सुखावह होते.