लिंगादिक भग्न किंवा दग्ध किंवा चलित झाल्यास जीर्णोद्धार करावा. अनादि सिद्ध स्थापित लिंगे अथवा मूर्ति यास भंगादि दोष असला तरी जीर्णोद्धार करू नये. अशा वेळी महाभिषेक करावा.
"अमुक देवस्य जीर्णोद्धारं करिष्ये" असा संकल्प कर्त्याने करून नांदी श्राद्धापर्यंत कर्म केल्यावर आचार्य वरावा; व सर्वतोभद्र पीठावर मंडल देवतांचे आवाहन करून लिंगाचे ठायी
"व्यापकेश्वर ह्रदयायनमः ॐ व्यापकेश्वर शिरसे स्वाहा"
इत्यादि षडंगन्यास करुन पूजा करावी. इतर देवता असल्यास मूलमंत्राने षडंगन्यास करून पूजा करावी. 'अघोरे०' या मंत्राचा अष्टोत्तरशत जप करून अग्नीची स्थापना करावी; व 'अघोरेभ्यो०' या मंत्राने घृताने भिजविलेल्या सर्षपांचा सहस्त्रहोम करून इंद्रादि देवतांस नाममंत्रांनी बली द्यावा व प्रणवमंत्राने जीर्ण देवांची पूजा करून घृतयुक्त तिलांनी मंडलदेवतेचा होम करून
"जीर्णभग्नमिदंचैवसर्वदोषावहंनृणाम् । अस्योद्धारेकृतेशान्तिःशास्त्रेस्मिन्कथितात्वया १ जीर्णोद्धारविधानंचनृपराष्ट्राहितावहम् । तदधस्तिष्ठतांदेवप्रहरामितवाज्ञया"
अशी प्रार्थना करावी. अशी प्रार्थना केल्यावर दूध, तूप, मध, दुर्वा व समिधा यांनी देवाच्या मंत्राने १०८ ओम करून तिलांचा एक सहस्त्र होम करावा व पायसाचा शंभर होम करून
"लिङ्गरूपसमागत्ययेनेदंसमधिष्ठितम् । यायास्त्वं संमितंस्थानंसंत्यज्यैवशिवाज्ञया १ अत्रस्थानेचयाविद्यासर्वविद्येश्वरैर्युता"
अशी प्रार्थना करावी, व "शिवेनसहसंतिष्ठ०॥" या मंत्राने अभिमंत्रिलेल्या उदकाने अभिषेक करून विसर्जन करावे. अस्त्रमंत्राने मंत्रिलेल्या कुदळीने खणून ते लिंग घ्यावे व "वामदेव०" या मंत्राने ते नदी, तडाग इत्यादिकात टाकावे. मूर्ति असल्यास ती प्रणवमंत्राने टाकावी. लिंग काष्ठमय असल्यास ते मधात भिजवून 'अघोरेभ्यो०' या मंत्राने दहन करावे. लिंग सुवर्णादि धातूंचे असेल तर ते नीट करून पुन्हा तेथेच स्थापावे. यानंतर शांतीसाठी 'अघोरे०' यामंत्राने घृत, दूध व मध यात भिजविलेल्या तिलांचा सहस्त्र होम करावा व
"भगवन्भूतभव्येशलोकनाथजगत्पते । जीर्णलिङ्गसमुद्धारःकृतस्तवाज्ञयामया १ अग्निनादारुजंदग्धंक्षिप्तंशैलदिकंजले । प्रायश्चित्तायदेवेश अघोरास्त्रेणतर्पितम् २ ज्ञानतोऽज्ञानतोवापियाथोक्तंनकृतंयदि । तत्सर्वंपूर्णमेवास्तुत्वत्प्रसादान्महेश्वर"
अशी प्रार्थना करावी. या प्रार्थनेनंतर यजमानाने
"योविप्रशिल्पिभूपानामाचार्यस्य च यज्वनः । शांतिर्भवतु देवेश अच्छिद्रं जायतामिदं ॥"
अशी प्रार्थना करावी. मूर्ति असेल तर
"त्वत्प्रसादेन निर्विघ्नं देहं निर्मापयत्यसौ । वासं कुरु सुरश्रेष्ठ तावत्त्वं चाल्पके गृहे ॥
वसक्लेशं सहित्वेह मूर्तिवै तव पूर्ववत् । यावत्कारयते भक्तः कुरु तस्य च वांच्छितं ॥"
अशी विशेष प्रार्थना करावी. यावर नवीन मूर्ती किंवा लिंग करून पूर्वोक्त विधीने अर्चेच्या कालावी वाट पाहत न बसता एक महिन्याच्या आत ती स्थापावी. याप्रमाणे जीर्णोद्धाराविषयी सांगितले.
मूर्ति, शिवलिंग, देवालय, अथवा देवालयाचा कळस इत्यादिकांचा नाश झाला असता स्वामी मरण पावतो, म्हणून पुढे सांगितल्याप्रमाणे शांति करावी. विधियुक्त कुंड करून होम करावा; व विधिपूर्वक यमदेवतेसाथी चरु करून त्या चरूचा व दही, मध व तूप यात भिजविलेल्या पिंपळाच्या समिधांचा "इमारुद्रा०" या मंत्राने मंत्रज्ञ व विज्ञान आचार्याने अष्टोत्तरशत होम करावा. उडीद, मूग, तिल, तूप व मध यांनी प्रत्येकाचा सहस्त्र याप्रमाणे शक्तिबीज मंत्राने होम करावा. 'र्ही' बीज हे शक्तिबीज जाणावे. ब्राह्मणाने भुमि, गाय, वृषभ, सुवर्ण व धान्य यांची दक्षिणेसहित दाने करून देवालयात पंचगव्याने स्नान करावे. यावर कृसरान्नाचा बली यमास देऊन ईशानास पायसाचा बली द्यावा. असे केले असता मनुष्य कृतकृत्य होतो, असे कमलाकर ग्रंथात सांगितले आहे.