यावरून घटस्फोटाचा विधि व्यर्थ आहे असे म्हणू नये. कारण घटस्फोटविधि केला असता परलोकसंबंधी दोषाचा परिहार होतो. लोकांनी बहिष्कृत केलेल्या पातकी पुरुषाबरोबर संभाषणादि संसर्ग केला असता तो पातित्यास कारण नसला तरी परलोकी नरक उत्पन्न करणार्या दोषास जसा कारण आहे तसा पतितासहवर्तमान एक कुलसंसर्ग या लोकी पातित्यादि दोषास कारण नसला तरी तो परलोकसंबंधी दोषास कारण आहे. येथे घटस्फोटविधि अर्थापत्तिप्रकाराने प्रमाण होत आहे; व परलोकसंबंधी दोषाचा परिहार होण्यासाठी घटस्फोटविधि आहे, म्हणून घटस्फोटविधीच्या सामर्थ्याने पतितमात्राच्या कुलावर बहिष्कार घडत नाही. सत्र नावाचा यज्ञ कलियुगी करू नये. कलियुगात ब्रह्महत्यादि महापातके झाली असता प्रायःश्चित्ताने नरकनिवृत्ति होत नाही. या लोकी व्यवहाराची मात्र योग्यता कलीत प्राप्त होते. सुवर्णाची चोरी इत्यादि पातके झाली असता प्रायःश्चित्ताने नरकनिवृत्ति व व्यवहाराची योग्यता ही प्राप्त होतात. कित्येक ग्रंथकाराचे असे मत आहे की, एकांतात झालेल्या महापातकांस कलियुगात रहस्य प्रायःश्चित्त सांगू नये. ब्राह्मणादिकांच्या स्त्रियांच्या संभोगाने भ्रष्ट झालेल्या शूद्रादिकांनी प्रायःश्चित्त घेतले तरी त्यांचा संसर्ग निषिद्ध आहे. यज्ञात पशूचा वध व सोमविक्रय ही कलियुगात ब्राह्मणांनी करू नयेत. कलियुगात ज्येष्ठ इत्यादि सर्व भ्रात्यास समान भाग उक्त आहे. आततायी द्विजांची धर्मयुद्धातही हिंसा करू नये. नौकेत बसून समुद्रयान करणार्या द्विजाने प्रायःश्चित्त घेतले तरी त्याशी संसर्ग करू नये. कलियुगात गाईसाठी व ब्राह्मणासाठी प्राणत्याग करू नये. कलीमध्ये ब्राह्मणांनी गवळी, शूद्र इत्यादिकांचे अन्न सेवन करू नये. शिष्याने गुरूच्या स्त्रियांजवळ चिरकाल वास करू नये. आपत्काली ब्राह्मणांनी क्षत्रिय, वैश्य इत्यादि वृत्तींचा त्याग करावा. कलियुगात ब्राह्मणाने अश्वस्तनिक जिविक म्हणजे दोन तीन दिवस पुरेल इतका धान्यसंचय करून उपजीविका करणारा असे राहू नये. कलियुगी गुरूजवळ बारा वर्षे वास, मुखाने अग्नी प्रदीप्त करणे व संन्यासाने सर्व वर्णाकडे भिक्षा मागणे, या तीन गोष्टी वर्ज्य कराव्यात. त्याचप्रमाणे नूतन उदक न घेणे; गुरूस इच्छित दक्षणा देणे; वृद्ध, रोगी इत्यादिकांनी जलसमाधि, अग्निपतन, भृगुपतन (कड्यावरून पडणे) यांपासून मरणे; गाईची तृप्ति होईल तितक्याच उदकात आचमन करणे व पितापुत्रांच्या वादात साक्षीदारास दंड करणे, या पाच गोष्टी कलीत वर्ज कराव्या. तुपात व दुधात पक्व झालेले अन्न शूद्रापासून घेऊ नये. भिक्षेसाठी भ्रमण करणार्या सन्याशाने गृहस्थाश्रमी पुरुषाचे घरी रात्री राहू नये. धूम व मुसळांचा आघात नसेल अशा काली संन्याशाने ही धारण करू नयेत. त्रतापरिग्रह म्हणजे सर्वाधान श्रोत्राग्नि व स्मार्ताग्नि निरनिराळे करणे, याचे नाव अर्धाधान व ते एकत्र करणे ते सर्वाधान. ते पूर्वयुगी होते. यास अपवाद कलीत जोपर्यंत वर्णाश्रमधर्म व वेद चालत आहेत तोपर्यंत संन्यास व अग्निहोत्र यांचे आचरण करावे. शपथ, शकुन, स्वप्न, सामुद्रिक, उपश्रुति कार्यसिद्धीसाठी देवपूजा, उपहार इत्यादिकांचा संकल्प व कालवेत्त्यांची प्रश्नोत्तरे ही कलियुगात क्वचित संभवतील. याप्रमाणे कलियुगात काय करावे व काय करू नये, याचा निर्णय सांगितला.