याप्रमाणे तृतीय परिच्छेदाच्या पुर्वार्धात गर्भाधानापासून विवाहापर्यंत सर्व संस्कारांचा प्रयोगासह निर्णय सांगितला.
नंतर आह्निकाचार आधानादिक मिश्र विषय शांतिक, पौष्टिक, प्रमुख, नित्यनैमित्तिक सांगितले.
प्रथम व दुसर्या परिच्छेदात तिथि व मास यांचे ठायी विधियुक्त नानाविध कृत्यांसहित सामान्यतः व विशेषतः कालाचा निर्णय सांगितला.
नानाविध पातकांविषयी प्रायश्चित्ते, व्यवहाराचा विस्तार, उपदाने व महादाने, इत्यादिकांचा विधि हे विषय मयूखादि ग्रंथात सांगितले आहेत.
यथासांग श्राद्धविधि, अशौचनिर्णय व अंत्यसंस्कार हे तृतीय परिच्छेदात उत्तराधात सांगू.
मूळचे श्लोक क्वचित अशुद्ध असल्यामुळे कित्येक नवीन श्लोक शुद्ध लिहिले आहेत.
मीमांसा व धर्मशास्त्र जाणणारे बुद्धिमान व आलस्यरहित असे जे पंडित आहेत ते महाविद्वानांनी केलेले पूर्वीचे ग्रंथ पाहून त्याप्रमाणे प्राप्त झालेली कार्ये करितात. हा ग्रंथ त्यांच्यासाठी लिहिला नाही. तर जे मंदबुद्धि, आळशी व अविद्वान असून धर्माविषयी निर्णय जाणण्याची इच्छा करितात त्यांच्यासाठी धर्मसिंधुसार नावाचा हा सुबोध ग्रंथ मी केला आहे. या ग्रंथाने भक्तवत्सल श्रीमद्विठ्ठल संतुष्ट होवोत. या ग्रंथात क्वचित स्थली शब्दार्थाने जरी दोष असले तरी विद्वानांनी विचारपूर्वक शोधून हा ग्रंथ ग्रहण करण्यास योग्य आहे. सुदामा ब्राह्मणाचे पोहे जरी कोंड्यानी युक्त होते तरी हरीने कोंडा टाकून देऊन ते चांगले शुद्ध करून भक्षण केले त्याचप्रमाणे विद्वानांनी या माझ्या ग्रंथाचा स्वीकार प्रेमाने करावा.
विद्वान ब्राह्मणांमध्ये केवळ सार्वभौम असे महात्मे श्रीकाश्यपाध्याय होऊन गेले. त्यापासून उपाध्याय कुलावतंस असे यज्ञेश्वर उपाध्याय व अनंतोपाध्याय असे दोन पुत्र झाले. त्यापैकी यज्ञेश्वरोपाध्याय श्रौतमार्गात निष्णात असून ज्योतिषी वेदाचे अंग जे व्याकरणशास्त्र त्यांत पारंगत होते. अनंतोपाध्याय भक्तात श्रेष्ठ असून अनंताचा अंशभूत अवतार असल्यामुळे अनंत गुणांचे वसतिस्थान, असे होते. हे अनंतोपाध्याय वैराग्यशाली होऊन त्यांनी आपली कोंकणातील जन्मभूमि सोडून दिली व श्रीपंढरीक्षेत्रात श्रीपांडुरंगासमीप वास्तव्य करून पांडुरंगाच्या भक्तीने भीमानदीच्या तटाकी मुक्त झाले. त्या अनंतोपाध्यायांचा कृतार्थ पुत्र जो काशिनाथ त्याने धर्मसिंधुसार नावाचा ग्रंथ केला.
इति श्रीमत्काश्युपाध्यसूरिसूनयज्ञेश्वरोपाध्यायानुजानन्तोपाध्यायसूरिसुतकाशीनाथोपाध्यावावरचिते धर्मसिं० तृतीय० परिच्छेदे पूर्वार्धः समाप्तः ॥