शिवास अर्पण केलेला नैवेद्य, पत्र, पुष्प, फल व जल ही अग्राह्य आहेत. पण शालिग्राम-शिलेच्या संसर्गाने शिवाचे नैवेद्य पवित्र होत. शिव व सूर्य यांचा नैवेद्य भक्षण केला असता चांद्रायण प्रायश्चित्त करावे. अभ्यास असल्यास दुप्पट चांद्रायण करावे. बुद्धिपूर्वक अभ्यास असल्यास सांतपन करावे, आपत्ति नसेल तर देवतांच्या निर्माल्यग्रहणाविषयी हाच निर्णय जाणावा. ज्योतिर्लिंग, स्वयंभू लिंग व सिद्धपुरुषांनी स्थापिलेले लिंग यावाचून असलेल्या स्थावर लिंगाविषयी हा शिवनिर्माल्यग्रहणाचा निषेध जाणावा. ज्योतिर्लिंग, स्वयंभू लिंग, इत्यादिकांच्या बाबतीत पूजकाने दिलेले फल व तीर्थादिक भक्तियुक्त अंतःकरणाने शुद्ध होण्यासाठी ग्रहण करावे. लोभाने ग्रहण करू नये. पंचायतनातील चार बाणलिंगे व प्रतिमा यांचा अन्नादिक नैवेद्य स्वतः ग्रहण केला तरी दोष नाही. ज्योतिर्लिंगाव्यतिरिक्त असलेल्या स्थिर लिंगाचे तीर्थोदक व चंदन हे भक्तिमान शिवोपासकांनीच ग्रहण करावे. ज्योतिर्लिगादिकांचे ठायी पूजकाने दिलेले अन्नही भक्षण करावे. असे कित्येक म्हणतात.