शुक्लपक्षापासून तिथी, वार व नक्षत्रे मोजून त्यांची बेरीज करावी व त्यास ७।८ व ३ या अंकांनी भागिले असता सर्वांचा शेष जर अंक राहील तर तो सर्व काम देणारा होतो. तिन्हीही वेळी जर शेष शून्य राहिले तर क्रमाने दुःख, दारिद्र्य व मृत्यु देणारे होते. एकाच दिवशी एका नगरातून दुसर्या नगरात प्रयाण केल्यास प्रवेशकालाची शुद्धि पहावी. प्रयाणकालाचि शुद्धि पाहण्याचे कारण नाही. जय इच्छिणार्या पुरुषाने प्रयाण दिवसापासून ९ व्या वारी, ९ व्या तिथीस व ९ व्या नक्षत्री स्वगृही प्रवेश करू नये; व प्रवेश केल्या दिवसापासून ९ व्या वारी, ९ व्या तिथीस व ९ व्या नक्षत्री प्रयाण करू नये. कुंभ व मीन राशीस चंद्र असता दक्षिणेस गमन, माचा अगर बाज विणणे व गवत आणि लाकडे यांचा संग्रह करू नयेत. अग्नि, मित्र, ब्राह्मण व स्त्री यांची तृप्ती करून स्वतः तृप्त होऊन प्रयाण करावे. स्वस्त्रीस, परस्त्रीस किंवा पुरुषास ताडण करून अथवा ब्राह्मणांचा अवमान करून किंवा रोगग्रस्त व क्षुधित असताना प्रयाण करील तर मरण येईल.