बंधूक, कंद, अतिमुक्त, केतकी, कपित्थ, बकुल, शिरषि व निंब ही शिवास निषिद्ध होत. पत्र, पुष्प व फल ही जशी उतन्न होतात तशी अर्पण करावीत असे वचन असल्यामुळे त्यांची अग्रे आपणाकडे करून ती उताणी अशी परमेश्वरास अर्पण करावीत, पण बिल्वपत्राचे अग्र आपणाकडे करून ते उपडे वहावे. पक्व आम्रफल शिवास अर्पण केल्यास दहा हजारवर्षे पर्यंत शिवपुरीत वास होतो. शिवाय प्रदक्षिणा करताना उजव्या बाजूने प्रणाली-पर्यंत (पन्हाळ) जावे व तेथून परत फिरून डाव्या बाजूने प्रणालीपर्यंत जावे. प्रणालीचे उल्लंघन करू नये. स्थिर लिंगाविषयीच्या प्रदक्षिणेचा हा प्रकार सांगितला. लिंग जर चल असेल तर उजव्या बाजूने प्रदक्षिणा करावी. बकुल व कुंदादि पुष्पे ही देवीस (पार्वतीस) प्रिय आहेत. धान्यवृक्षांची सर्व पत्रे व पुष्पे, दूर्वा, कुंद, निर्गुडी, बंधूक व अगस्ती यांच्या पुष्पांनीही देवीची पूजा करावी. केवळ बिल्वमात्राने पूजा केली असता राजसूयाचे फल मिळते. कण्हेरीच्या फुलांच्या माळेने अग्निष्टोमाचे; बकुल पुष्पांच्या माळेने वाजपेयाचे फल मिळते. द्रोणपुष्पांच्या मालेने राजसूयाचे पल मिळते. याप्रमाणे सूर्य, गणपति इत्यादि देवतांची प्रिय पुष्पे सामान्यतः विष्णूप्रमाणे जाणावीत म्हणजे विष्णूला प्रिय असलेली पुष्पे व सूर्य व गणपती यांसही प्रिय आहेत असे समजावे.